Sunday, 24 July 2016

वास्तु आणि वास्तुशास्त्र



नुकताच एका वास्तूला भेट देण्याचा योग आला. तशी तर आमची वेगवेगळ्या वास्तूंना भेट चालूच असते. पण काही वास्तूचं अशा असतात की ज्यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. हि वास्तू तसे पाहता इतर वास्तूंसारखीच आहे ... 1BHK चा फ्लॅट आहे.



विशेष उल्लेख एवढ्यासाठीच की माझ्या आधीही एका वास्तूतज्ञाने या वास्तूस भेट दिली होती. वास्तुशास्त्राचे मोठमोठे नियम सांगून खूप चुका काढल्या होत्या त्यावर उपाय म्हणून तब्बल चाळीस हजाराचा खर्चही सांगितला होता. एवढाच काय पण यापेक्षाही अधिक खर्च करायची जातकाची ऐपत होती. मात्र त्याला हा खर्च रास्त वाटला नाही आणि म्हणून त्याने आमच्याशी संपर्क साधला.
आणि

रीतसर भेटीची वेळ वगैरे ठरल्यानंतर आम्ही या वास्तूस भेट दिली. उत्तराभिमुख वास्तू आहे. प्रवेशद्वार उत्तरेला ईशान्य कोपऱ्यामध्ये, तिथेच पूर्व भागात दिवाणखाना आहे. स्वयंपाक घराची योजना दक्षिणभागात करण्यात आली आहे. शौचालय स्नानगृह उत्तर भागात आहे. शयनगृह पश्चिम भागात आले आहे.

वास्तुशास्त्रानुसार प्रवेशद्वारासाठी कुठलीच मुख्य दिशा अशुभ नाही. फक्त प्रत्येक दिशेचे नऊ भाग पाडले असून त्यातील काही भागांना शुभ तर काही भागांना अशुभ म्हणले आहे. आता आपले प्रवेशद्वार यातील कोणत्या भागात येते, यावर त्याचे शुभाशुभत्व ठरते. त्याचवेळी वास्तुशास्त्रात असेही सांगितले आहे की प्रवेशद्वार हे उपदिशांना म्हणजेच कोपऱ्यात असता कामा नये. आता आपल्याकडे फ्लॅट सिस्टीम मध्ये 1BHK, 2BHK मध्ये प्रवेशद्वार हे ९९% ठिकाणी कोपऱ्यामध्ये येते. 3BHK मध्ये काही वेळेस कोपऱ्यात तर काही वेळेस मुख्य दिशांना येते. अशा वेळेस जातकास प्रवेशद्वार चुकले आहे असे सांगून घाबरवणे कितपत योग्य आहे? त्यामुळे माझे सर्वच वाचकांना सांगणे आहे की अशावेळेस प्रवेशद्वाराचा फारसा विचार करू नये. काही ठिकाणी Virtual Door वगैरे चा उपाय सांगितला जातो अशा उपायांमागे खर्च करू नयेत. जे आपले पारंपरिक उपाय आहेत - जसे की दारावर शुभ चिन्हे लावणे, चौकटीच्या वर अथवा बाजूला श्री गणेशाचे चित्र लावणे, प्रवेशद्वाराला उंबरठा करणे, उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले असणे, दारात रांगोळी असणे तसेच दारात सतत प्रकाश असणे - हे सर्व उपाय चुकता करावेत. यामुळे जर आपल्या प्रवेशद्वारात काही दोष असेल तर तो निघून जातो.

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हे आग्नेय भागात असायला हवे. मात्र ते प्रत्येकवेळी असतेच असे नाही. अशावेळी या गोष्टीचा खूप बाऊ करता अंतर्गत रचनेमध्ये काही बदल करता येऊ शकतो का ते आधी तपासावे. तसे नाहीच शक्य झाले तर जी रचना उपलब्ध आहे, त्यात दिशांचा अभ्यास करून कोणती दिशा कशासाठी वापरता येईलयाचा विचार करावा.

मुख्य शयनगृह वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य भागात असावयास हवे त्याची लांबी दक्षिणोत्तर असावयास हवी. आता हे प्रत्येकवेळी शक्य होईलच असे नाही. अशावेळी शयनगृहाच्या अंतर्गत रचनेसंदर्भात जे नियम सांगितले आहेत त्यांचा जास्तीजास्त वापर करण्याचा प्रयत्न करावयास हवा. जसे की झोपताना आपले डोके दक्षिणेकडे तर पाय उत्तरेकडे असावे सांगितले आहे. किंवा एकूण शयनगृहात नैऋत्य भागात आपण झोपले पाहिजे. मग किमान या नियमांचा आपण वापर कसा करू शकतो हे तपासावे.

शौचालय तसेच स्नानगृहाविषयी आवर्जून बोलले पाहिजे. शौचालयाची रचना आपल्याकडे वायव्य भागात पश्चिमेकडे सांगितली आहे. अशावेळेस शौचालय पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे आल्यास खूप मोठा दोष ठरवला जातो. मात्र अशावेळी शुभाशुभत्वाचा निर्णय घेताना एकूण पूर्व किंवा उत्तर दिशेची व्याप्ती तपासली पाहिजे. त्यातील शुभत्वाचे प्रमाण अशुभत्वाचे प्रमाण तपासले पाहिजे. जर अशुभत्वाचे प्रमाण शुभत्वापुढे कमी किंवा अगदीच नगण्य असेल तर त्याचा फारसा विचार होता कामा नये.

एक गोष्ट लक्षात ठेवा जागांचे वाढते भाव आणि कमी होत चाललेली उपलब्धता या कात्रीत सामान्य माणसास वास्तुशास्त्राच्या दृष्टीने १००% योग्य असे घर घेणे अशक्य आहे. अशावेळेस आपल्या घरात काही ना काही वास्तूदोष असणार. मग आपली वास्तू १००% योग्य करण्यासाठी नानाविध उपाय करण्याचा अट्टाहास सोडा. आपल्या वास्तूच्या दिशा समजून घ्या, त्यात काय काय उपयुक्त आहे हे समजून घ्या. आणि सर्वात महत्वाचे आपल्या दैनंदिन कृतीतून वास्तूचे शुभत्व वाढवा.

शेवटी शरीरसौष्ठव वाढवण्यासाठी बाजारातील उत्तेजक औषधे घेण्यापेक्षा आपला आपण व्यायाम करणे अधिक उपयुक्त नाही का?

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र वास्तुशास्त्र रमलशास्त्र होराशास्त्र हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९   info.bhagyank@gmail.com

No comments:

Post a Comment