शेतातील घर आणि वास्तुशास्त्र
या शनिवारी अहमदनगर जिल्ह्यातील
श्रीगोंदा येथे एका वास्तूला भेट देण्याचा योग आला. इथे वास्तूला म्हणणे
तितके योग्य ठरणार नाही,कारण अद्याप वास्तू कागदावर देखील उभी नाही.
श्रीगोंदा येथील एका शेतकऱ्याने शेतातच घर बांधण्याचे ठरवले आणि त्या घराची
रचना वास्तुशास्त्रानुसार करण्यासाठी मला बोलावले.
त्यांची एकूण
जागा आयताकृतीच होती पण काही ठिकाणी किंचित कललेली होती. त्यामुळे सगळ्यात
पहिले त्यांना सांगितले कि कुंपण करताना मात्र आयताकृतीच केले जाईल याची
काळजी घ्यावी. खूपदा आपण इंच इंच जागेसाठी भांडतो अर्थात ती कष्टाची असते
म्हणूनच. पण नैऋत्य सारख्या दिशेमध्ये वास्तू पश्चिमेकडून आतमध्ये कलली
असल्यास तो खूप मोठा वास्तुदोष मानला जातो तर ईशान्येला पूर्वेकडून आतमध्ये
वास्तू कलली असल्यास ते शुभ मानले जाते. शक्यतो वास्तू आयताकृती अथवा चौरस
असलेली उत्तम.
दुसरा तिथे मुख्य रस्ता वास्तू समोरच उत्तरेला
होता. हे देखील एक शुभ चिन्हच आहे. खरं तर जातकाच्या तसेच त्याच्या
घरच्यांच्या मनात पूर्वेला प्रवेश द्वार करावे असे होते. पूर्वेकडील द्वार
अधिक शुभ असते अशी त्यांची धारणा होती. मात्र एकंदर वास्तूचा पसारा
पाहिल्यावर आपण त्यांना सांगितले कि जर त्यांनी पूर्वेकडे प्रवेशद्वार केले
तर त्यांना मोठी जागा रस्त्यासाठी सोडावी लागेल. तसेच उत्तरेकडे रस्ता
असल्याने घरातून बाहेर पडताना डावीकडे बाहेर पडावे लागेल आणि मग गावाकडे
जाण्यासाठी उजवीकडे वळावे लागेल. या उलट आम्ही उत्तरेकडे प्रवेशद्वार
सांगितले. ते करताना शुभ पदांमध्ये प्रवेश द्वार येईल याचीही काळजी घेतली.
यामुळे त्यांना जागातर कमी लागेलच पण घरातून सरळ बाहेर पडता येईल आणि मग
गावाकडे जाण्यासाठी उजवीकडे वळता येईल. घरातून बाहेर पडताना शक्यतो आधी
उजवीकडे वळावे.
शेतात घर बांधताना घर कुठे बांधावे आणि शेती कुठे
करावी हा महत्वाचा प्रश्न असतो. हा निर्णय घेताना शेती कशाची आहे यावर
निर्णय घ्यावा. जसे कि कोकण सारख्या भागात फळझाडांची शेती असता वास्तूत उंच
झाडे दक्षिण पश्चिमेकडे सांगितल्याने नैऋत्य भागात आधी शेतीसाठी जागा
सोडावी मग वास्तूचे बांधकाम करावे. या उलट देशावर भाजीपाला-धान्य यांची
शेती होते, अशावेळी पूर्वभागात शेती करावी तर पश्चिमेकडे घराचे बांधकाम
करावे. सोबत दिलेल्या चित्रात शेतीसाठीची जागा कमी दिसत असली तरी ती पुढे
खूप आहे. वास्तू स्पष्ट दाखवता यावी यासाठी शेती छोटी दाखवली आहे.
मोकळ्या जागेत घर बांधताना जास्तीजास्त वास्तुशास्त्राचे नियम पाळावेत.
आपल्याकडे ब्रह्मस्थानावर बांधकाम करू नये असे सांगितले आहे. हा नियम
पूर्वीसारखा एखादा वाडा बांधायचा असल्यास शक्य आहे. अथवा तसे ते पूर्णपणे
शक्य नाही. अशावेळी ब्रह्मस्थानात खांब येणार नाही याची फक्त काळजी घ्यावी.
तसेच एखादी जड वस्तू अथवा सामान ब्रह्मस्थानात ठेवली जाणार नाही याची
काळजी घ्यावी.
जिन्या विषयी आपल्याकडे मुख्य नियम चढा विषयी आहे.
तो पूर्वेकडून पश्चिमेकडे अथवा उत्तरेकडून दक्षिणेकडे असावा. जीना हा
पश्चिमेकडे अथवा दक्षिणेकडे असावा असा नियम असला तरी त्याचे स्थान मात्र
एकंदर वास्तूच्या पसाऱ्यावरून ठरवावे. जसे कि इथे मी वायव्य भागात
पश्चिमेकडे जिना सांगितला आहे.
इतर नियम नेहमीचेच पाळले असल्यामुळे
त्यांचा उहापोह इथे करत नाही. वरील मुद्द्यांचा समारोप करायचा झाला तर जसे
ज्योतिषशास्त्रात नियमांचा अर्थ लावताना व्यक्ती सापेक्ष विचार करावा
लागतो. तसेच वास्तुशास्त्रामध्ये नियमांचा अर्थ लावताना वास्तुसापेक्ष
निर्णय घेणे गरजेचे आहे. आणि यासाठी वास्तुतज्ञाने आपली विषयाची प्रगल्भता
वाढवली पाहिजे.
- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ । info.bhagyank@gmail.com
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ । info.bhagyank@gmail.com
No comments:
Post a Comment