Sunday, 23 October 2016

चतुर्थ स्थान

 
सुख स्थान - मातृ स्थान असेही या स्थानाला म्हणले जाते. वास्तु - वाहन सुखा विषयी सांगणारे हे स्थान आहे. वास्तुपासुन मिळणारे सुख, वास्तु दोष यांचा अभ्यास या स्थानावरुन करता येतो. विद्या अभ्यासाचा विचार या स्थानावरुन होतो. आयुष्याच्या शेवटच्या काळातील परिस्थितीही या स्थानावरुन कळते.

हे केंद्र स्थान असुन पंचमेश अथवा भाग्येश इथे असता किंवा चतुर्थेश पंचमात अथवा भाग्यात असता राजयोगी होतो. चतुर्थेश द्वितीयात असता स्वस्थानापासुन लाभात जाउन धनप्राप्ती चांगली होती. चतुर्थेश पंचमात स्वपराक्रमाने श्रीमंती दाखवतो. सप्तमात जाता विवाह लवकर होतो. दशमात येता मान हुद्दा तसेच वरिष्ठ दर्जाची नोकरी मिळते. षष्ठात, अष्टमात अथवा व्ययात जाता मात्र चतुर्थ स्थानाच्या फलितांमध्ये कमतरता आणतो.

चतुर्थ स्थान हे मातृ स्थान असुन इथे चंद्र दिग्बली ठरतो. गुरु हा शुभ ग्रह असुन सुखाचा कारक आहे. चतुर्थातील गुरूला राशीची साथ मिळता तो विशेष फलदायी ठरतो. वैवाहिक सुखाचा कारक चतुर्थात शुभ फलदायी ठरतो. विशेष करुन तुळेतला अथवा मीनेतला शुक्र कला क्षेत्रात मोठे यश देतो. तुळ लग्नाला चतुर्थातील योगकारक शनि राजयोगी ठरतो. इथे रवि विशेष फलदायी ठरत नाही. चतुर्थातील राहु केतु सुखात कमतरता आणतात. चतुर्थातील नेपच्युन आयुष्याचा शेवटचा काळ कष्टदायी करतो. तर हर्षल सातत्याने वास्तुतील बदल दर्शवतो.

वाहन सुखाचा विचार करताना चतुर्थ स्थान,चतुर्थ स्थानाचा स्वामी कारक ग्रह शुक्र यांचा विशेषत्वाने विचार करावा. त्याच प्रमाणे चतुर्थाला पाहणारे ग्रह, चतुर्थेशला पाहणारे ग्रह, चतुर्थातील ग्रह यांचा अभ्यास महत्वाचा ठरतो. त्याच पद्धतीने पंचम नवम स्थानाचा अभ्यासही करावा. वास्तु सुखाचा विचार करताना चतुर्थ स्थान, स्थानाचा स्वामी कारक ग्रह मंगळ याचा विचार करावा. तसेच आधी म्हणाल्याप्रमाणेच चतुर्थाला पाहणारे ग्रह, चतुर्थेशला पाहणारे ग्रह, चतुर्थातील ग्रह यांचा अभ्यास करावा. वास्तु सुखाचा अभ्यास लग्न लग्नेशाशिवाय अपुर्ण आहे. वास्तु - वाहन योगाचा विचार करताना चतुर्थेश - चतुर्थातील बलवान ग्रह - कारक ग्रह मंगळ/शुक्र यांच्या दशा भुक्ती काळाचा अभ्यास करावा. तसेच यांच्या गोचर स्थितीचा अभ्यासही महत्वाचा ठरतो. बुद्धिमत्तेचा दर्जा - शिक्षणाचे योग याचाही अभ्यास याच पद्धतीने केला जातो. बुद्धीचा कारक ग्रह बुध आहे.        

विविध स्थांनांविषयी बोलत असताना एक गोष्ट जी मी सातत्याने मांडत आलो आहे, ते म्हणजे एखाद्या स्थानाच्या फलिता मध्ये वृद्धी करण्याची अथवा कमतरता आणण्याची ताकद/सूत्रे लग्न-लग्नेशाकडे आहेत. त्यामुळे कुठल्याही स्थानाचे फलित वर्तवण्या आधी लग्न लग्नेशाचे बल तपासणे गरजेचे आहे. वास्तु वाहन हे आजच्या काळात महत्वाचे टप्पे आहेत. तर आयुष्यात धावत असताना सुखाची समाधानाची आस सर्वांना असते. याचसाठी केला अट्टाहास, शेवटचा दिन गोड व्हावा, हा विचार सर्वांच्याच मनी असतो. आणि म्हणुनच आयुष्यात पुढे जात असताना चतुर्थ स्थान तपासणे महत्वाचे ठरते.  

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र वास्तुशास्त्र रमलशास्त्र होराशास्त्र हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९   info.bhagyank@gmail.com

No comments:

Post a Comment