Tuesday, 4 October 2016

पैशाची पेटी / तिजोरी आणि वास्तुशास्त्र


आज सर्वत्रच प्लॅस्टिक मनी किंवा कार्ड बँकिंग किंवा ऑनलाईन ट्रँझॅकशन चा सुळसुळाट असला तरी काही व्यावसायिक क्षेत्रांमध्ये रोख रकमेचा संबंध आहेच. अर्थ क्षेत्रातील संस्था, रिटेल दुकाने, दागिन्यांची दुकाने, हॉटेल अथवा भाजीपाल्याची दुकाने या सर्वच व्यवसायांत रोज रोख रकमेचा संबंध येतो. अशावेळी हि रोख रक्कम ठेवायची पेटी अथवा मोठ्या अर्थाने तिजोरी कोणत्या दिशेस असावी याचा विचार वास्तुशास्त्रामध्ये केला आहे.



सोबत दिलेल्या चित्राप्रमाणे आपल्या वास्तुचे नऊ भाग पाडले असता, पैशाची पेटी / तिजोरी उत्तर भागात दक्षिण भिंतीला उत्तरेकडे उघडणारी असावी. व्यावसायिक जागेचा आकारमान लहान असता कदाचित हे शक्य होणार नाही. मागे नैऋत्य भागाचे महत्व सांगणारा लेख लिहिताना आपण दुकानात मालकाची जागा नैऋत्य भागात सांगितली आहे. आणि पैशाची पेटीही मालकाच्या जवळ असते. त्यामुळे थेट उत्तर भागात पैशाची पेटी करणे शक्य होत नाही. अशावेळी मालकाच्या इथेच पण दक्षिण दिशेला उत्तरेकडे उघडणारी पैशाची पेटी ठेवावी. शक्य झालं तर दोन पेट्या कराव्यात. एक मालकाच्या इथे दिवस भराच्या व्यवहारासाठी तर मुख्य पेटी वर सांगितल्या प्रमाणे उत्तर भागात.

पैशाच्या पेटीच्या बाबतीत एक महत्वाचा नियम लक्षात ठेवावा. पैशाची पेटी कधीही मोकळी नसावी. त्यात किमान काही ना काही रक्कम असावी. पैशाच्या पेटीमध्ये रोख रकमेबरोबर काही सुट्टी नाणीही ठेवावीत. पैशाची पेटीही नेहमी स्वच्छ व सुंदर असावी. त्यात पैशाव्यतिरिक्त इतर सामान टाकु नये. फाटक्या नोटा/जुन्या नोटा/खराब झालेली नाणी अशा वस्तु पैशाच्या पेटित ठेवु नयेत. शक्य झाल्यास पैशाच्या पेटीत रोज ताजे फुल ठेवावे. त्यावर मालकाने अथवा व्यवसायाच्या प्रमुखाने रोज स्वस्तिक काढावे. हिंदु धर्मीयांव्यतिरिक्त इतर धर्मीयांनी आपापल्या धर्माचे शुभं चिन्ह ठेवावे.

घरामध्येही सध्या काही उच्च वर्गीय कुटुंबे वगळता मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम अशी कोणी घरात ठेवत नाही. मात्र जिथे ती ठेवली जाते, तिथे अथवा ज्या घरात किमान रक्कम ठेवली जाते त्या घरातही वरील नियम पाळावेत. शक्य झाल्यास घराच्या उत्तरेकडील खोलीत दक्षिण भिंतीला असे कपाट असावे. अथवा शयनगृहात दक्षिणेकडील भिंतीला उत्तरेकडे उघडणारे कपाट असावे. आपले दागदागिने, बँक खात्याची पुस्तके हे सुद्धा याच दिशेला असावे.

हे झाले मुळ नियम. मात्र ज्योतिष शास्त्राप्रमाणेच वास्तुशास्त्राचे नियम हे वास्तुसापेक्ष असुन वेगवेगळ्या वास्तुमध्ये या नियमांत कमी अधिक प्रमाणांत बदल करावे लागतात. त्यामुळे एकदा आपली वास्तु वास्तुशास्त्राप्रमाणे जरुर तपासुन घ्यावी.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ । info.bhagyank@gmail.com

No comments:

Post a Comment