वास्तुशास्त्र हे पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचतत्वावर आधारित असुन त्याचे नियम हे कालातीत आहेत. मात्र त्या नियमांचा अर्थ आणि वापर हा वास्तूसापेक्ष आहे. त्यामुळे एखाद्या वास्तूचा अभ्यास करत असताना सर्व नियम जसेच्या तसे न वापरता त्या वास्तूचा वापर काय आहे, हे जाणुन घेणे महत्वाचे ठरते. औद्योगिक उत्पादनांच्या वास्तूंबद्दल बोलायचे झाले तर उत्पादनासाठी लागणारी आवश्यक यंत्र, त्यांचा वापर, कच्चा माल-पक्का माल (उत्पादित/विक्रीयोग्य माल), उत्पादित वस्तुंचे आकारमान, यासारख्या अनेक मुद्द्यांचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतरच तिथे वास्तुशास्त्राचे नियम लावता येतात.
कच्च्या मालाचे प्रमाण वाढत आहे, याचाच अर्थ उत्पादन
वाढत आहे. आणि म्हणुन तो नैऋत्य दिशेस ठेवावयास हवा तर तयार माल जेवढ्या
लवकर विक्रीस जाईल तेवढ्या लवकर नव्या उत्पादनासाठी भांडवल उभे राहील. आणि
म्हणुन तो वायव्य दिशेला ठेवावयास हवा. वस्तुमानाचा विचार करता सर्वाधिक
वस्तुमान हे नैऋत्य भागात तर सर्वात कमी ईशान्य भागात असावे. आग्नेय व
वायव्य भागात मध्यम वस्तुमान असावे. ब्रह्मस्थान मोकळे सोडता आले तर अधिक
उत्तम अथवा तेथील वस्तुमान एकंदर वस्तुमानाच्या प्रमाणात कमी राहील किमान
याची काळजी घ्यावी. ऊर्जेचा विचार करता अग्नीशी संदर्भातील कामे हि दक्षिण
आग्नेय भागात केली जावीत. तर उप्तादनाच्या प्रक्रियेतील शेवटचा टप्पा उत्तर
वायव्य भागात आणण्याचा प्रयत्न करावा.
कारखान्यातील कार्यालयाचा विचार करता ते नेहमी पश्चिम मध्य भागात असावे. जेणेकरुन संपूर्ण कारखान्यावर लक्ष तर राहतेच पण पश्चिम दिशेमुळे मालकही स्थिर राहतो. तसेच तो थेट नैऋत्य भागात न गेल्याने एक हाती कारभार राहात नाही. कामगारांच्या आरोग्याचा विचार करता त्यांचे विश्रांतीगृह नेहमी पूर्व भागात अथवा पूर्व ईशान्य भागात असावे. यामुळे कामगाराला विश्रांतीच्या काळात ऊर्जा मिळुन तो नव्या जोमाने कामास लागतो. विजे संदर्भातील सर्व उपकरणे जसे कि मीटर रुम, जनरेटर बॅकअप हे सर्व पूर्व आग्नेय भागात असावे. या भागात वारा खेळता नसल्यामुळे शॉर्टसर्किट ने अथवा इतर कारणाने लागलेली आग सहसा पसरत नाही. तसेच ऊर्जेची हि दिशा असल्याने उपकरणे अधिक काळापर्यंत कार्यरत राहतात. गुणवत्ता तपासणीचे कार्यालय हे त्या नंतर पूर्व आग्नेय भागातच यावे.
मी सातत्याने सांगत असतो कि जेव्हा लक्ष्मी आपल्याकडे यावी अशी इच्छा आपण व्यक्त करतो, तेव्हा तीला यावंसं वाटेल असे वातावरणही आपण निर्माण करायला हवे. उत्पादन कशाचेही असो कारखान्यात स्वच्छतेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. यातुन आपली वास्तु सुंदर तर दिसतेच पण कामगारांचे आरोग्यही टिकुन राहते. तसेच इतस्ततः पडलेल्या सामानामुळे अथवा ऑइलसारख्या पदार्थांमुळे होणारे अपघातही टाळले जातात. कारखान्यातील टाकाऊ वस्तुंचेही योग्य नियोजन आवश्यक आहे. कारण अनेक कारखान्यांमध्ये याचा पुनर्वापर केला जातो तर काही ठिकाणी स्क्रॅप मालाची सुद्धा विक्री केली जाते. असा टाकाऊ माल नैऋत्येला ठेवणे अधिक योग्य.
इथे सर्वच मुद्द्यांचा परामर्श घेणे शक्य नाही.
कारण अनेक निर्णय हे ती ती वास्तु बघुनच घ्यावे लागतात. पण एक नक्की कि
वास्तुतील विविध दिशांचा आणि ऊर्जेचा अभ्यास करुन कारखान्याचे नियोजन
केल्यास उत्पादन क्षमता वाढुन अधिकाधिक प्रगती साधता येईल.
- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ । info.bhagyank@gmail.com
No comments:
Post a Comment