फेब्रुवारी २०१६ ला मंगळाने वृश्चिक राशीमध्ये प्रवेश केला. १७ जुनला वक्री मार्गे मंगळ मागे तुळ राशीमध्ये प्रवेश केला. तद नंतर तो पुन्हा मार्गी होऊन १२ जुलैला त्याने वृश्चिकेत प्रवेश केला. आणि आज १९ सप्टेंबर २०१६ ला मंगळाने धनु राशीमध्ये प्रवेश केला.
या काळात शनि वृश्चिक राशीमध्येच होता. विशेष करुन २५ मार्च ते १३ ऑगस्ट या काळात वृश्चिकेतच शनि वक्री होता. ह्या सर्व प्रवासात २४ ऑगस्टला शनि मंगळाची अंशात्मक युती झाली. इतर वेळेस अंशात्मक युती नसली तरी, वृश्चिक सारख्या स्फोटक राशीमध्ये स्फोटक मंगळ आणि विलंब व अडथळ्यांचा द्योतक शनि फार मोठा काळ एकत्र होते.
याची दाहकता विशेषत्वाने साडेसाती चालु असलेल्या तुळ, वृश्चिक व धनु राशींनी अनुभवली. त्याच वेळी पनौती चालु असलेल्या मेष व सिंह राशीलाही याचा त्रास झाला. कुंभ राशीला दशमात तर मकरेला लाभात राशिस्वामी शनिचा मंगळाशी सहयोग झाल्याने करिअरच्या दृष्टीने हा काळ खडतर गेला. कर्केला पंचमातुन हा योग झाल्याने संतती सौख्यासाठी तर मीनेला सप्तमातुन हा योग झाल्याने विवाहयोगासाठी वाट पहावी लागली. मिथुनेला षष्ठातून तर मेषेला अष्टमातुन हा योग झाल्याने आरोग्याचे प्रश्न उभे राहिले. काहींना शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले तर त्यातही काहींच्या शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्या.
जसे विविध राशींनी याचे परिणाम भोगले तसेच विशोंत्तरी दशांनाही याची झळ पोहचली. ज्यांचा कुंडलीत शनि अथवा मंगळाची महादशा/अंतर्दशा/विदशा चालु होती त्यांना मोठ्या प्रमाणावर अडचनींना सामोरे जावे लागले. शनि वक्री असताना याची परिणामकारकता अधिक होती. ज्यांचा कुंडलीमध्ये शनिच्या महादशे मध्ये मंगळाची अंतर्दशा अथवा अंतर्दशेमध्ये विदशा किंवा मंगळ महादशेमध्ये शनिची अंतर्दशा अथवा अंतर्दशेमध्ये विदशा चालु होती त्यांना हे परिणाम अधिक अधोरेखित झाले.
या काळात राजकीय पटलावर सत्ताधारी पक्षाचे अनेक डावपेच अपयशी ठरताना आपण पहिले. महामार्गावर अपघात होत असतात पण त्यांच्या संख्येतील वाढ या काळात अनुभवास आली. संरक्षण क्षेत्राचा विचार करत असताना सैन्यावरचे व पोलिसांवरचे वाढते हल्लेही आपण या काळात पाहिले.
आता मंगळ धनु राशीमध्ये मार्गस्थ झालेला आहे. व पुढचा फार मोठा काळ शनि मंगळाची युती होणार नाहीये. त्यामुळे विशेषत्वाने ज्या राशींना साडेसाती अथवा पनौती असणार आहे, त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकायला हरकत नाही.
- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ । info.bhagyank@gmail.com
No comments:
Post a Comment