Thursday, 15 September 2016

व्यावसायिक जागा आणि नैऋत्य दिशा

मागच्या आठवड्यात नैऋत्य दिशेचे महत्व सांगणारा लेख लिहिला होता. त्या लेखात नैऋत्य दिशेविषयी लिहितांना अधिकांश संदर्भ घराचा दिला होता. या लेखात व्यावसायिक जागेच्या अनुषंगाने काही मुद्दे देत आहे.

काल एका बेकरी उत्पादने विकणाऱ्या दुकानाची वास्तु पाहण्याचा योग आला. या पुर्वीही एका बेकरीची उत्पादने विकणाऱ्या ब्रँडच्या काही शाखांची वास्तु भेट केली होती. तो पूर्वानुभव गाठीशी होताच.  जातकाने खरं तर दोन एक आठवड्या मागेच या वास्तु संदर्भात फोन केला होता. सदर व्यवहार पुढे न्यायच्या दृष्टीने किमान चर्चा फोनवरुन झाली. जातकाने दुकानाच्या दिशा सांगताच, आधीच्या मालकाला येत असलेल्या अडचणी सांगताच वास्तुमध्ये काय महत्वाचा दोष असेल हे पूर्वानुभवावरुन सांगितले. ज्यात विशेष करुन कॅश बॉक्स वायव्येला असु शकतो अधिकतर वजन पूर्व - उत्तर भागात असेल, असे दोन वास्तु दोष सांगितले होते. मात्र यात सहज बदल करणे शक्य असुन व्यवहार पुढे न्यायला हरकत नाही असेही सुचवले.

जातकाने व्यवहार पुढे नेला काल मला प्रत्यक्ष वास्तु पाहण्यास बोलावले. खरे तर वास्तु पाहण्यासाठी आधी मागील आठवड्यात ऋषीपंचमीला दुपारी ०२:०० च्या दरम्यान जाणार होतो. पण मी नेहमीच मानत आलोय कि वास्तु आणि कुंडलीचा निश्चितच परस्पर संबंध आहे. या जातकाच्या बाबतीत तेच अनुभवास आले. काही वैयक्तिक कारणाने ऋषी पंचमीला होणारी भेट रद्द झाली. त्या वेळी निसर्ग कुंडलीमध्ये पुण्यात धनु लग्न चालु होते. काल संध्याकाळची भेट अचानक ठरली. आणि काल सांयकाळी पुणे येथे निसर्ग कुंडलीमध्ये मीन लग्न चालु असताना वास्तु भेट झाली. जातकाच्या कुंडलीचा अभ्यास करता दशमामध्ये म्हणजेच कर्म स्थानामध्येही मीन रासच आहे.

आता त्या वास्तु विषयी बोलु. सोबत दोन चित्रे जोडली आहेत. एकामध्ये वास्तुची सद्य स्थिती तर एकामध्ये आम्ही सुचवलेले बदल दिले आहेत. वास्तूचे प्रवेशद्वार उत्तरेला असुन मुख्य रस्ताही उत्तरेलाच आला आहे. अधिक वजन हे पश्चिम भागात आहे. तर पूर्व भाग पूर्ण मोकळा आहे. या वास्तुच्या सर्वात जमेच्या बाजू आहेत. वास्तु आयता कृती असुन कुठलीच दिशा कमी अथवा जास्त झालेली नाही. या वास्तुचा मालक वास्तु पासुन दुर राहात असुन त्याच्या अशा अनेक शाखा आहेत. मात्र या शाखेला त्याला म्हणावा तसा वेळ देता येत नाहीये. व्यवसायातील गुंतवणुकीच्या तुलनेत उत्पन्न मात्र कमी आहे.

उत्तर प्रवेशद्वार असताना किंवा इतर जमेच्या बाजु असतानाही या अडचणी का? हा प्रश्न स्वाभाविकपणे येतो आणि मग आठवण येते ती नैऋत्य दिशेची. वास्तु शास्त्राच्या नियमानुसार वस्तुमानाची तुलना करताना नैऋत्य दिशेला अधिक जडत्व हवे. मात्र इथे फ्रीजची रचना करताना वायव्य भागातुन फ्रीज चालु होतो आणि त्याचा काही भाग नैऋत्येला येतो. या उलट नैऋत्येला काउंटरच्या आत येण्या-जाण्यासाठी जागा सोडली आहे. त्यामुळे आपोआपच नैऋत्य दिशा जडत्वाच्या मानाने हलकी झाली. व्यावसायिक प्रगतीसाठी मालकाने नैऋत्येला असायला हवे. इथे मात्र नैऋत्येपासून येण्या जाण्याची जागा सोडल्याने आपसुकच मालक वायव्येला आला. वायव्य दिशा वायु देवतेची असुन इथुन ऊर्जा बाहेर जाते. यामुळे हि शाखा ज्यांची आहे, त्यांनाच तिथे थांबायला वेळ मिळत नाही. मालकाची जागा वायव्येला आल्याने आपसुकच कॅश बॉक्स वायव्येला आला. त्यामुळे आलेला पैसा टिकणे हा अनुभव येऊ लागला. त्यातुनच आवक कमी आणि जावक जास्त अशी स्थिती झाली. आणि त्यातूनच शेवटी त्याने ती शाखा दुसऱ्याला म्हणजेच माझ्या सद्य जातकाला देण्याचा निर्णय घेतला.

या वास्तुत प्रवेश करताच एक भाग मला जाणवला कि या वास्तुत शुभत्व असुन लक्ष्मी योग आहे. अडचण आहे ती चुकीच्या वस्तुमानाची. त्यामुळे आम्ही जातकाला सहज सोपे दोन बदल सांगितले. एक म्हणजे फ्रीज पुर्ण नैऋत्य भागात सरकवावा. आत येण्या जाण्यासाठी वायव्येकडून जागा मोकळी सोडावी. दुसरा बदल असा कि कॅश बॉक्स दक्षिण भागात ठेवावा तो उत्तरेकडे उघडेल अशी योजना करावी. या व्यतिरिक्त प्रवेशद्वार जे अगदीच कोपऱ्यामध्ये आले आहे, ते थोडे पुढे ओढुन घ्यावे.

व्यावसायिक जागेमध्येही नैऋत्य जागेला अनन्य साधारण महत्व आहे कारण ती मालकाची जागा आहे. कार्यालयीन जागा असल्यास नैऋत्येकडे पण दक्षिण भागात मुख्य मालकाची केबिन असावी. त्या खालोखाल जबादारी नुसार अधिकाऱ्यांच्या केबिन दक्षिण पश्चिम दिशेने वाढवत जाव्यात. कारखान्याच्या ठिकाणी नैऋत्य भागात पण अधिकतर दक्षिण दिशेने कामकाजाचे मुख्य कार्यालय असावे. तर कामाच्या रचनेला महत्व देत अधिक जड यंत्रांची योजना नैऋत्य भागात त्या खालोखाल पश्चिम भागातुन नंतर दक्षिण भागातुन यंत्रांची रचना करावी.

दिशांचा विचार करुन पुढे गेल्यास निश्चितपणे व्यवसायात सुख-समाधान-प्रगती साधता येते.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र वास्तुशास्त्र रमलशास्त्र होराशास्त्र हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९   info.bhagyank@gmail.com

No comments:

Post a Comment