महत्व नैऋत्य दिशेचे
मागच्या आठवड्यात मुंबईला एका वास्तुला भेट
दिली. खरे तर जातक माझ्याकडे कुंडली घेऊन आला होता. त्याला एका मोठ्या
आजाराने ग्रासले होते. आजाराच्या औषोधोपचाराने शरीर क्रश झाल्याने त्याला
व्यवसायाकडे व्यवस्थित लक्ष देणे जमत नव्हते. त्याकारणाने आर्थिक अडचणीही
होत्या. जातकाची पत्रिका आपण तपासली. त्याप्रमाणे विवेचनही केले. मात्र
कुंडलीतील काही योग पाहता वास्तुला भेट द्यायची इच्छा व्यक्त केली. जातकाने
रीतसर दक्षिणा भरुन वास्तुभेट ठरवली.
थोडे विषयांतर होईल पण इथे
विशेष उल्लेख करावासा वाटतो कि इतर जातकांपेक्षा हा जातक खुप वेगळा होता.
आदल्या दिवशी रात्री प्रवासाची तयारी झाली का? या फोन पासुन ते रेल्वे
स्टेशन ते घरापर्यंतची व्यवस्था, परतीची व्यवस्था ते पुन्हा रात्री
व्यवस्थित पोहोचलात का? चा फोन, इतकी काळजी घेणारे जातक क्वचितच भेटतात. पण
यामुळे हि माणसे व त्यांची वास्तुभेट कायम लक्षात राहते.
पुन्हा
विषयाकडे वळु. आज एवढे वर्ष वास्तुशास्त्राचा अभ्यास करत असल्याने काही
वास्तुंचा दोष प्रवेश केल्या केल्याचं लक्षात येतो. आम्ही घरात प्रवेश
केल्या वर थेट दिवाणखान्यात आलो. काहीतरी चुकतंयची धडधड तिथेच जाणवली.
प्रवेशद्वाराविषयी बोलताना जातकाने सांगितले कि दारातच एक शौचालय आहे. सोबत
वास्तुचे चित्र जोडले आहे. आपण पाहु शकता कि प्रवेशद्वारातुन थेट
दिवाणखान्यात गेल्यास शौचालयाकडे लक्ष जात नाही. माझेही काहीसे तेच झाले.
पण जातकानेच ते लक्षात आणुन दिले.
इथे प्रवेशद्वार थेट नैऋत्य भागात
आले आहे. त्यातच तिथे सलग दोन शौचालयेही आली आहेत. नैऋत्य दिशा हि घराच्या
कर्त्यापुरुषाची दिशा मानली जाते. आजच्या काळात कर्त्या स्त्रीचीही
म्हणायला हरकत नाही. तर नैऋत्य दिशेलाच प्रवेशद्वार आल्याने आपोआपच नैऋत्य
दिशा इतर दिशांच्या मानाने मोकळी राहते, हलकी राहते. आपल्याकडे नैऋत्याकडून
ईशान्येकडे वारे वाहतात. त्यामुळे शौचालय नैऋत्येकडे असता त्याचे अशुभत्व
वाऱ्याबरोबर संपूर्ण घरावर पसरते. जे घरातल्या व्यक्तींच्या आरोग्यासाठी
शुभ नसते. त्यात शौचालय म्हणजे खड्डा आला. आपल्याकडे नैऋत्येला खड्डा नसावा
असे सांगितले आहे. या सर्वाचा परिणाम घराच्या कर्त्यापुरुषावर होतो.
विशेषत्वाने त्याचे घरातली प्रभुत्व कमी होणे. व्यवसायाच्या ठिकाणी
अपेक्षित मानसन्मान न मिळणे. अर्थार्जनात अडथळे येणे यासारखे परिणाम
जाणवतात. इथे शौचालयाने नैऋत्य दिशा अधिक बिघडली आहे. ज्याचा थेट परिणाम
जातकाच्या आरोग्यावर झाला.
नैऋत्य दिशा म्हणजे दक्षिण व पश्चिम या
मुख्य दिशांमधील उपदिशा. हि दिशा पृथ्वी तत्वाची असुन जडत्वाची दिशा आहे.
उताराचा विचार करता हि वास्तुतील उंच दिशा आहे. ऊर्जेचा विचार करता हि
स्थिर दिशा असुन इथे ऊर्जा नसते. बांधकामाचा विचार करता एकूण जागेतील
नैऋत्य भागात अधिकाधिक बांधकाम करावे. बांधकामाचा उतार ठरवताना हि दिशा उंच
राहील याची काळजी घावी. नैऋत्येला पाणी असु नये. पाण्याची टाकी जमिनी खाली
असेल तर ती नैऋत्येला करु नये. मात्र हीच टाकी उंचावर करायची असता
नैऋत्येलाच करावी. घराचा विचार करता मुख्य शयनगृह नैऋत्य भागात असावे.
त्यानंतर पश्चिमेकडून खोल्या वाढवाव्यात. अडगळीची खोली करायची असल्यास ती
या भागात करावी. फर्निचर करताना जाड सामान या भागात येईल असे पाहावे.
घरातील मुख्य शयनगृह वगळता इतर शयनगृह या दिशेस नसावे. झोपताना डोके
नैऋत्य कोपऱ्यात करु नये. दिवाणखाना या भागात नसावा. स्वयंपाकघर या भागात
येता कामा नये. आलेच तर किमान अग्नी व पाणी या कोपऱ्यात येणार नाही इतकी
काळजी घ्यावी. या भागात खड्डा खोदु नये. या भागात आंगण करु नये. मुख्य
प्रवेशद्वार या भागात नसावे. पैशाची तिजोरी थेट या कोपऱ्यात ठेवु नये.
घराच्या इतर दिशांच्या तुलनेत हि दिशा हलकी असता कामा नये. तसेच ती मोकळी
राहणार नाही याचीही काळजी घ्यावी.
नैऋत्य दिशेविषयी लिहिण्यासारखे
खुप आहे. सर्वच काही इथे लिहिता येणार नाही. एक नियम नेहमीचाच कि
वास्तुतज्ञाने निर्णय घेताना वास्तुसापेक्ष निर्णय घ्यावा. हि दिशा घराच्या
मालकाची दिशा असुन मालकाच्या आर्थिक/सामाजिक प्रगती बरोबरच त्याच्या
आरोग्यावरही हि दिशा परिणाम करत असते. आणि म्हणुनच वास्तुशास्त्रामध्ये या
दिशेला अनन्य साधारण महत्व आहे.
- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ । info.bhagyank@gmail.com
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ । info.bhagyank@gmail.com
No comments:
Post a Comment