Sunday, 11 September 2016

लग्न स्थानाची प्रतिभा

लग्न स्थानाची प्रतिभा



होराशास्त्रामध्ये तीन राशी महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत. चंद्र रास, सूर्य रास, व लग्न रास.

यातील लग्न रास म्हणजे जन्म समयी पूर्व क्षितिजावर जी रास उदित पावत असते, त्या राशीला लग्न रास असे म्हणतात. ही रास कुंडलीमध्ये प्रथम स्थानी लिहिली जाते. हे झाले कुंडलीतील लग्नस स्थान. लग्न स्थानाला तनु स्थान तसेच व्यक्तिमत्व स्थानही म्हणले आहे. होराशास्त्रामध्ये चंद्र राशीपेक्षाही अधिक महत्व लग्न राशीला आहे. लग्न राशीच्या स्वामीला लग्नेश अशी संज्ञा आहे. जो भाग चंद्र राशीचा तोच चंद्राचाही. इथे चंद्रापेक्षाही अधिक महत्व लग्नेशाला आहे. लग्न बिंदुचे नक्षत्र व नवमांश यावरही फलितात मोठा बदल होतो.

कुंडलीतील प्रथम स्थानाला आपण लग्न स्थान म्हणले आहे. त्यामुळे प्रथम स्थानातील ग्रहांना लग्नस्थित ग्रह म्हणले जाते. लग्नस्थित ग्रहांप्रमाणेच लग्नाला पाहणाऱ्या ग्रहांचाही विचार केला जातो. सर्व ग्रहांना सप्तम दृष्टी आहे. त्यामुळे कुंडलीतील सप्तम स्थानातील सर्व ग्रह लग्नाला पाहतात. तसेच गुरूला पाचवी व नववी दृष्टी आहे, त्यामुळे पंचमातील व भाग्यातील गुरु लग्नाला पाहतो. मंगळाला चौथी व आठवी दृष्टी आहे. त्यामुळे षष्ठातील व दशमातील मंगळ लग्नाला पाहतो. शनिला तिसरी व दहावी दृष्टी आहे. त्यामुळे चतुर्थातील व लाभातील शनि लग्नाला पाहतो. हाच विचार लग्नेशाला पाहणाऱ्या ग्रहांचाही केला जातो.

लग्न स्थान हे इमारतीचा पाया असुन जर पायाच भक्कम नसेल, तर इमारत डळमळीत उभी राहते. कुंडलीमध्ये कितीही राजयोग असले तरी लग्न/लग्नेश निर्बली असता हे राजयोग तोकडे पडतात. या उलट कुंडलीमध्ये कितीही अशुभ योग असले तरी लग्न/लग्नेश बलवान असता मनुष्य त्यावर मात करुन प्रगती मिळवतो. लग्नेश लग्नात असता, लग्न लग्नेशाने दृष्ट असता तसेच लग्नेश वर्गोत्तम असता लग्न बलवान होते. लग्नात उच्च ग्रह, वर्गोत्तम ग्रह, मित्र ग्रह अथवा त्यांची दृष्टी असताही लग्न भाव बलवान होतो. या उलट लग्नात पाप ग्रह असता अथवा लग्नेश पाप ग्रहांबरोबर असता, लग्नावर पाप ग्रहांची अथवा शत्रू ग्रहांची दृष्टी असता, अथवा लग्नेश नीचेचा किंवा नीच ग्रहांबरोबर असता लग्नस्थान बिघडते.

लग्न स्थान व्यक्तीचा स्वभाव ठरवत असते. चंद्र हा मनाचा कारक असून अधिकांश वेळा मनुष्य स्वभाव हा चंद्र राशी वरुन ठरवला जातो. मात्र त्या स्वभावाला अनुसरून व्यक्तीची क्रिया व प्रतिक्रिया कशी असेल हे मात्र लग्न स्थान ठरवते. म्हणूनच व्यक्तीच्या जीवनातली महत्वाची स्थित्यंतरे लग्नेशाच्या महादशा/अंतर्दशा/विदशेमध्ये होतात. लग्नेशाचे गोचर भ्रमण व लग्नाला/लग्नेशाला गोचरीने पाहणारे ग्रह देखील व्यक्तीच्या जीवनात महत्वाची स्थित्यंतरे घडवुन आणतात. चंद्र राशीपासुन येणाऱ्या साडेसातीपेक्षा लग्न राशीपासुन येणारी साडेसाती अधिक त्रास देताना काही कुंडल्यांच्या बाबतीत मी अनुभवली आहे.

धनाचा विचार द्वितीय स्थानावरून केला जात असला, कर्माचा विचार दशमस्थानावरुन केला जात असला तरी कर्तृत्व हे लग्न स्थानच ठरवते. रोगाचा विचार षष्ठावरून, मोठ्या आजारांचा विचार अष्टमावरून केला जात असला तरी प्रकृती हि लग्नस्थानावरूनच ठरते. वैवाहिक सुखाचा विचार सप्तम व सप्तमेशावरून केला जातो. सप्तम अथवा सप्तमेशाचे अशुभ योग असता वैवाहिक सुखात कमतरता सांगितली जाते. मात्र याच ठिकाणी लग्न/लग्नेश बलवान असता अशुभ फलांची तीव्रता कमी होते. लग्नेश पंचमात अथवा भाग्यात सुस्थितीत असता तो उच्च प्रतीचा राजयोग समजला जातो. लग्नेश केंद्रात असता संघर्षातुन यश मानले जाते. लग्नेश द्वितीयात असता जातक स्वकर्तृत्वार पैसा कमावतो. लग्नेश अष्टमात असता अचानक धनलाभाचे योग येतात.

लग्न राशीविषयी आणखी एक अनुभव सांगायचा म्हणजे ९०% वेळा जातकाच्या कुंडलीमध्ये जी लग्न रास असते, गोचरीने ते लग्न चालु असताना अथवा चंद्र त्या राशीमध्ये असताना जातक आमच्याकडे येतो.

या सर्वाचा सार एकच कि सर्व साधारण फलादेश हा चंद्र राशीवरून सांगितला जात असला तरी लग्न राशीवरुन तो तपासणे गरजेचे आहे. कुंडलीतील स्थानागत फलादेशांमध्ये सकारात्मक अथवा नकारात्मक बदल घडवण्याची ताकद लग्न/लग्नेशामध्ये आहे. आयुष्यात पुढे जाताना या दृष्टीकोनातुन आपली कुंडली एकदा जरुर तपासुन घ्यावी.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ । info.bhagyank@gmail.com

No comments:

Post a Comment