Sunday, 24 July 2016

वास्तु आणि वास्तुशास्त्र



नुकताच एका वास्तूला भेट देण्याचा योग आला. तशी तर आमची वेगवेगळ्या वास्तूंना भेट चालूच असते. पण काही वास्तूचं अशा असतात की ज्यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. हि वास्तू तसे पाहता इतर वास्तूंसारखीच आहे ... 1BHK चा फ्लॅट आहे.



विशेष उल्लेख एवढ्यासाठीच की माझ्या आधीही एका वास्तूतज्ञाने या वास्तूस भेट दिली होती. वास्तुशास्त्राचे मोठमोठे नियम सांगून खूप चुका काढल्या होत्या त्यावर उपाय म्हणून तब्बल चाळीस हजाराचा खर्चही सांगितला होता. एवढाच काय पण यापेक्षाही अधिक खर्च करायची जातकाची ऐपत होती. मात्र त्याला हा खर्च रास्त वाटला नाही आणि म्हणून त्याने आमच्याशी संपर्क साधला.
आणि

रीतसर भेटीची वेळ वगैरे ठरल्यानंतर आम्ही या वास्तूस भेट दिली. उत्तराभिमुख वास्तू आहे. प्रवेशद्वार उत्तरेला ईशान्य कोपऱ्यामध्ये, तिथेच पूर्व भागात दिवाणखाना आहे. स्वयंपाक घराची योजना दक्षिणभागात करण्यात आली आहे. शौचालय स्नानगृह उत्तर भागात आहे. शयनगृह पश्चिम भागात आले आहे.

वास्तुशास्त्रानुसार प्रवेशद्वारासाठी कुठलीच मुख्य दिशा अशुभ नाही. फक्त प्रत्येक दिशेचे नऊ भाग पाडले असून त्यातील काही भागांना शुभ तर काही भागांना अशुभ म्हणले आहे. आता आपले प्रवेशद्वार यातील कोणत्या भागात येते, यावर त्याचे शुभाशुभत्व ठरते. त्याचवेळी वास्तुशास्त्रात असेही सांगितले आहे की प्रवेशद्वार हे उपदिशांना म्हणजेच कोपऱ्यात असता कामा नये. आता आपल्याकडे फ्लॅट सिस्टीम मध्ये 1BHK, 2BHK मध्ये प्रवेशद्वार हे ९९% ठिकाणी कोपऱ्यामध्ये येते. 3BHK मध्ये काही वेळेस कोपऱ्यात तर काही वेळेस मुख्य दिशांना येते. अशा वेळेस जातकास प्रवेशद्वार चुकले आहे असे सांगून घाबरवणे कितपत योग्य आहे? त्यामुळे माझे सर्वच वाचकांना सांगणे आहे की अशावेळेस प्रवेशद्वाराचा फारसा विचार करू नये. काही ठिकाणी Virtual Door वगैरे चा उपाय सांगितला जातो अशा उपायांमागे खर्च करू नयेत. जे आपले पारंपरिक उपाय आहेत - जसे की दारावर शुभ चिन्हे लावणे, चौकटीच्या वर अथवा बाजूला श्री गणेशाचे चित्र लावणे, प्रवेशद्वाराला उंबरठा करणे, उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले असणे, दारात रांगोळी असणे तसेच दारात सतत प्रकाश असणे - हे सर्व उपाय चुकता करावेत. यामुळे जर आपल्या प्रवेशद्वारात काही दोष असेल तर तो निघून जातो.

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर हे आग्नेय भागात असायला हवे. मात्र ते प्रत्येकवेळी असतेच असे नाही. अशावेळी या गोष्टीचा खूप बाऊ करता अंतर्गत रचनेमध्ये काही बदल करता येऊ शकतो का ते आधी तपासावे. तसे नाहीच शक्य झाले तर जी रचना उपलब्ध आहे, त्यात दिशांचा अभ्यास करून कोणती दिशा कशासाठी वापरता येईलयाचा विचार करावा.

मुख्य शयनगृह वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य भागात असावयास हवे त्याची लांबी दक्षिणोत्तर असावयास हवी. आता हे प्रत्येकवेळी शक्य होईलच असे नाही. अशावेळी शयनगृहाच्या अंतर्गत रचनेसंदर्भात जे नियम सांगितले आहेत त्यांचा जास्तीजास्त वापर करण्याचा प्रयत्न करावयास हवा. जसे की झोपताना आपले डोके दक्षिणेकडे तर पाय उत्तरेकडे असावे सांगितले आहे. किंवा एकूण शयनगृहात नैऋत्य भागात आपण झोपले पाहिजे. मग किमान या नियमांचा आपण वापर कसा करू शकतो हे तपासावे.

शौचालय तसेच स्नानगृहाविषयी आवर्जून बोलले पाहिजे. शौचालयाची रचना आपल्याकडे वायव्य भागात पश्चिमेकडे सांगितली आहे. अशावेळेस शौचालय पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे आल्यास खूप मोठा दोष ठरवला जातो. मात्र अशावेळी शुभाशुभत्वाचा निर्णय घेताना एकूण पूर्व किंवा उत्तर दिशेची व्याप्ती तपासली पाहिजे. त्यातील शुभत्वाचे प्रमाण अशुभत्वाचे प्रमाण तपासले पाहिजे. जर अशुभत्वाचे प्रमाण शुभत्वापुढे कमी किंवा अगदीच नगण्य असेल तर त्याचा फारसा विचार होता कामा नये.

एक गोष्ट लक्षात ठेवा जागांचे वाढते भाव आणि कमी होत चाललेली उपलब्धता या कात्रीत सामान्य माणसास वास्तुशास्त्राच्या दृष्टीने १००% योग्य असे घर घेणे अशक्य आहे. अशावेळेस आपल्या घरात काही ना काही वास्तूदोष असणार. मग आपली वास्तू १००% योग्य करण्यासाठी नानाविध उपाय करण्याचा अट्टाहास सोडा. आपल्या वास्तूच्या दिशा समजून घ्या, त्यात काय काय उपयुक्त आहे हे समजून घ्या. आणि सर्वात महत्वाचे आपल्या दैनंदिन कृतीतून वास्तूचे शुभत्व वाढवा.

शेवटी शरीरसौष्ठव वाढवण्यासाठी बाजारातील उत्तेजक औषधे घेण्यापेक्षा आपला आपण व्यायाम करणे अधिक उपयुक्त नाही का?

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र वास्तुशास्त्र रमलशास्त्र होराशास्त्र हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९   info.bhagyank@gmail.com

Sunday, 17 July 2016

राजकीय पटावर गुरु व शनि बदल

राजकीय पटावर गुरु व शनि बदल

येत्या काळात देशात व राज्यात महत्वाच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकी पूर्वीचा व निवडणुकी नंतरचा काळ हा गुरु व शनी या महत्वाच्या ग्रहांच्या राशी बदलाच्या सावटाखाली असणार आहे. आणि म्हणूनच राजकीय व्यक्तींनी, मुत्सद्यांनी तसेच या निवडणुकांशी ज्यांचा ज्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध आहे, त्यांनी या ग्रह बदलांचा आपल्या कुंडलीवर काय परिणाम होतो हे तपासून बघणे गरजेचे आहे.

गुरु ११ ऑगस्ट २०१६ ला कन्या राशीमध्ये प्रवेश करत आहे. हा गुरु बदल वृषभ, सिंह, वृश्चिक, मकर व मीन राशींना शुभ फलदायी ठरेल. मिथुन, कुंभ, व तूळ या राशींना गुरुबल नसल्याने अशुभ फलदायी ठरेल. अर्थात हा फक्त चंद्र राशीवरून विचार झाला. जन्म गुरु तसेच गुरुचे कुंडलीतील स्थान यांचा गोचर गुरूशी असलेला संबंध याचाही विचार करणे आवश्यक आहे.

शनी २६ जानेवारी २०१७ ला धनु राशीमध्ये प्रवेश करत आहे. हा शनी बदल मेष, सिंह, वृश्चिक, मिथुन, तूळ तसेच मीन राशीसाठी शुभ फलदायी ठरेल. कन्या, वृषभ व मकर राशीस अशुभ फलदायी ठरेल. अर्थात इथेही हा विचार फक्त चंद्र राशी वरून झाला. जन्म शनी, त्याचे कुंडलीतील स्थान व या दोहोंचे गोचर शनीशी असलेले संबंध याचाही विचार महत्वाचा आहे. 

याही पुढे जाऊन कुंडलीतील सद्य महादशा, अंतर्दशा व विदशा यांच्या स्वामींचे गुरु व शनी या ग्रहांशी होणारे संबंध तपासणे गरजेचे आहे.

या पुढील राजकारणात आपले स्थान कुठे आहे यावर या फलितांचा अर्थ काढणे उचित ठरेल.

या ग्रह बदलांचा संबंध व्यावसायिकांनीही अभ्यासणे गरजेचे ठरेल. व्यावसायिक उलाढालींचे गणित, नव्या गुंतवणुकीचे पर्याय तर जुने प्रलंबित व्यवहार यावर या ग्रह बदलांचा प्रभाव असणार आहे. नोकरदार वर्गाला पुढील नियोजन करताना तसेच महत्वाचे निर्णय घेताना या ग्रह बदलांचा प्रभाव जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ ।  info.bhagyank@gmail.com

Monday, 11 July 2016

सहीचे पहिले अक्षर आणि सही



सहीचे पहिले अक्षर आणि सही

सहीचा अभ्यास करताना सहीच्या पहिल्या अक्षराला अनन्य साधारण महत्व आहे. एखाद्या सहीकडे जेव्हा आपले लक्ष जाते,तेव्हा पहिली नजर ही आद्याक्षराकडेच जाते. त्यामुळे त्याचा अर्थबोध होणे गरजेचे असते. आपण आपल्या सहीतील अद्याक्षरं बदलू जरी शकलो नाही, तरी त्याचा अन्वयार्थ समजून घेऊन पुढील मार्गक्रमणा करू शकतो.

उदाहरणा दाखल पुढे सुरवातीच्या काही इंग्रजीच्या अक्षरांचा अन्वयार्थ दिला आहे. असा विचार सर्वच २६ इंग्रजी अक्षरांविषयी करता येतो.

याचा उपयोग जसा सही करणाऱ्याला होतो, तसाच समोरच्या व्यक्तीलाही होत असतो.

A - उत्साह, कला व नेतृत्व दाखवणारे हे अक्षर तीव्र इच्छा शक्ती दाखवते. या अक्षरापासून ज्यांची सही सुरवात होते, ते केलेला करार किंवा दिलेला शब्द पूर्ण
करण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात.

B - संवेदनशीलता व लहरीपणा दाखवणारे हे अक्षर अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारे आहे. यांच्या अंगी सहकार्याची भावना असून सर्वांना सोबत घेऊन पुढे जातात. तसेच इतरांच्या मतांचा आदर करतात. 

C - उच्चप्रतीची बौद्धिक क्षमता दाखवणारे हे अक्षर स्वभावातील उत्साह व तरतरीपणा दाखवतो. एकदा का करारावर यांची सही आली की मग कितीही अडचणी येवो ते त्यावर मात करून पुढे जातात. स्वतःला कामात गुरफटून घ्यायला आवडते.

D - बंदिस्त स्वभाव दाखवणारे हे अक्षर व्यावहारिकतेला महत्व देणारे आहे. प्रसंगी सामाजिक बंधने झुगारून पुढे जाण्याची ताकद असते. ज्यांची सही या अक्षराने सुरू होते ते स्वबळावर यश मिळवण्याची इच्छाशक्ती ठेवतात. हे सर्वस्वी स्वावलंबी असतात. 

आपणही आपल्या सहीनिशी आम्हाला संपर्क करू शकता.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ ।  info.bhagyank@gmail.com

Saturday, 9 July 2016

Weekly Bhavishya for Week 10-Jul-2016 To 16-Jul-2016



Weekly Bhavishya based on Moon Sign for Week 10-Jul-2016 To 16-Jul-2016

आषाढ शुक्ल पक्षात हा आठवडा येत आहे. पांडुरंग पांडुरंग असा नामघोष आणि पालखीची चर्चा आठवडाभर राहणार आहे. आठवड्याच्या १५ तारखेला येणारी आषाढी एकादशी महत्वाची ठरेल. आठवडा भर रवीचे भ्रमण मिथुन राशीमधून असणार आहे. आठवड्याच्या मध्यावर मंगळ वृश्चिकेत पुनःप्रवेश करेल. बुध ग्रह १२ तारखेला कर्क राशीमध्ये प्रवेश करेल तर १६ तारखेला बुधाचा उदय होईल. गुरु व राहूचे सिंह राशीमधून भ्रमण करतील. शुक्र कर्क राशीमधून भ्रमणकर्ता आहे तर शनीचे वृश्चिकेतून वक्री भ्रमण राहील.

मेष: मुलांच्या कर्तृत्वाने आनंद मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. विद्यार्थीवर्गाला आठवडा आनंदी जाईल. नोकरदारांना आठवडा यशदायी जाईल. वरिष्ठांकडून कौतुकाचे क्षण येतील. व्यावसायिकांना यशात भर आठवडा ठरेल. आर्थिक उलाढाल चांगली राहणार आहे. सरकार दरबारी प्रलंबित कामे मार्गी लागतील. सामाजिक जीवनात आनंदी वातावरण असेल. शुभ दिवस ११, १४.

वृषभ: मुलांसाठी विशेष वेळ द्यावा लागेल. कौटुंबिक जीवनात ताण राहील. विशेष करून वैवाहिक जोडीदाराशी वाद संभवतात. विद्यार्थी वर्गाला यशासाठी मेहनत घ्यावी लागेल. नोकरदारांना नव्या संधी उपलब्ध होतील. व्यावसायिकांसाठी आठवडा चांगला जाईल. आर्थिक उलाढाल अपेक्षेच्या जवळपास राहील. कामानिमीत्त प्रवासाचे योग येतील. सामाजिक जीवनात सहकार्यातून यश मिळेल. शुभ दिवस १३, १६.

मिथुन: मुलांकडून सुख मिळवून देणारा आठवडा आहे. कौटुंबिक जीवनातही समाधानाचे वातावरण राहील. प्रसंगी कुटुंबासाठी पैसे खर्च करावे लागतील. विद्यार्थी वर्गाने नव्या आव्हानांसाठी तयार राहावे. नोकरदार वर्गाला आठवडा संमिश्र जाईल. कोणताही निर्णय घाईने घेऊ नये. व्यावसायिकांसाठी आठवडा चांगला जाईल. अपेक्षेप्रमाणे उलाढाल होऊन पुनर्गुंतवणुकीचा विचार कराल. शुभ दिवस १५, १६.

कर्क: मुलांशी वादविवाद संभवतात. मात्र प्रसंग सांभाळून घ्यावे. कौटुंबिक जीवनात अस्वस्थता जाणवेल. विद्यार्थीवर्गाला यशासाठी झगडावे लागेल. नोकरदारांचे वरिष्ठांशी मतभेद होतील. आता ग्रहस्थिती पूरक नाही. त्यामुळे टोकाची भूमिका घेऊ नये. व्यावसायिकांना आठवडा चांगला जाईल. मात्र गुंतवणुकीसारखे निर्णय घेताना सावध राहावे. सामाजिक जीवनात इतरांचे सहकार्य घ्यावे लागेल. शुभ दिवस १०, १२.

सिंह: मुलांसाठी वेळ काढावा लागेल. कौटुंबिक जीवनात वादविवादाचे प्रसंग येतील. विद्यार्थी वर्गाला आठवडा चांगला जाईल. नोकरदारांना आठवडा ताणतणावाचा जाईल. मात्र पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल. व्यावसायिकांना आठवडा चांगला जाईल. आर्थिक उलाढाल चांगली राहील. ह्या आठवड्यात प्रवास शक्यतो टाळावेत. शुभ दिवस १३, १४.

कन्या: मुलांच्या भविष्याबद्दल महत्वाचे निर्णय घ्याल. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. प्रसंगी पैसेही खर्च करावे लागतील. विद्यार्थीवर्गाला आठवडा आनंददायी जाईल. नोकरदारांना नव्या संधी उपलब्ध होतील. व्यावसायिकांना आठवडा फलदायी जाईल. मात्र व्यवहार करताना सहजासहजी कोणावर विश्वास ठेवू नये.
सरकार दरबारी प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा. शुभ दिवस ११, १५.

तूळ: मुलांच्या अडचणी समजून घ्यावा लागतील. कौटुंबिक जीवनात वादविवादाचे प्रसंग येतील. किचकट प्रश्न पुढे ढकलावेत. विद्यार्थी वर्गाने एकाग्रता साधण्यावर भर द्यावा. नोकरदारांनी सयंमाची भूमिका ठेवावी. व्यावसायिकांना चांगल्या संधीसाठी वाट पाहावी लागेल. आर्थिक उलाढाल कमी राहील. अनुभवी लोकांच्या सल्ल्याने पुढे जावे. सामाजिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. शुभ दिवस १३, १४.

वृश्चिक: मुलांकडून आनंदवार्ता मिळतील. कौटुंबिक जीवनात समाधानी वातावरण असेल. घरात धार्मिक कार्ये संभवतात. विद्यार्थी वर्गाला आठवडा संमिश्र जाईल. नोकरदारवर्गाचे वरिष्ठांशी मतभेद होतील. अतिरिक्त जबाबदारी सांभाळावी लागेल. व्यावसायिकांना आठवडा संमिश्र जाईल. आर्थिक उलाढाल अपेक्षेपेक्षा कमी राहील. गुंतवणुकीचे निर्णय पुढे ढकलावेत. शुभ दिवस १२, १६.

धनु: मुलांसंबंधातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात आनंदादी वातावरण असेल. नात्यातल्या एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक फायदा होईल. विद्यार्थी वर्गाला यशदायी आठवडा ठरेल. नोकरदार व्यक्तींना अतिरिक्त कामाचा ताण जाणवेल. आर्थिक नियोजन कोलमडू शकते. व्यावसायिकांना आठवडा चांगला जाईल. व्यवसायात आवक चांगली राहील. शुभ दिवस १०, १३.

मकर: मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. कुटुंबासाठी वेळ काढावा लागेल. विद्यार्थी वर्गाने यश मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गांचा मोह टाळावा. नोकरदार व्यक्तींनी देखील यशासाठी प्रयत्न करताना आपण काही चुका तर करत नाहीये ना याची काळजी घ्यावी. व्यावसायिकांना आठवडा चांगला जाईल. आर्थिक उलाढाल संमिश्र जाईल. सरकार दरबारी वजन खर्ची होईल. शुभ दिवस १४, १५.

कुंभ: मुलांशी मतभेद संभवतात. कौटुंबिक जीवनात वादविवादाचे प्रसंग येतील. विद्यार्थी वर्गाला आठवडा यशदायी जाईल. नोकरदार वर्गाने सहज कोणावर विश्वास ठेवू नये. तसेच स्वबळावर यश मिळवण्याचा प्रयत्न करावा. व्यावसायिकांना आठवडा कष्टदायी जाईल. कामाचा तणाव जाणेल. आवकपेक्षा जावकचेच प्रमाण अधिक राहील. सरकार दरबाराचे काम पुढे ढकलावे. शुभ दिवस १०, १२.

मीन: मुलांच्या भविष्याचे निर्णय घ्याल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थी वर्गाला यशदायी आठवडा जाईल. नोकरदार वर्गाला संमिश्र वातावरण राहणार आहे. यशासाठी वाट पाहावी लागेल. व्यावसायिकांना आठवडा चांगला जाईल. आर्थिक उलाढाल चांगली राहील. गुंतवणुकीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. सामाजिक जीवनात मत विचारपूर्वक व्यक्त करावेत.शुभ दिवस १०, ११.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र वास्तुशास्त्र रमलशास्त्र होराशास्त्र हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९   info.bhagyank@gmail.com