Sunday, 23 October 2016

चतुर्थ स्थान

 
सुख स्थान - मातृ स्थान असेही या स्थानाला म्हणले जाते. वास्तु - वाहन सुखा विषयी सांगणारे हे स्थान आहे. वास्तुपासुन मिळणारे सुख, वास्तु दोष यांचा अभ्यास या स्थानावरुन करता येतो. विद्या अभ्यासाचा विचार या स्थानावरुन होतो. आयुष्याच्या शेवटच्या काळातील परिस्थितीही या स्थानावरुन कळते.

हे केंद्र स्थान असुन पंचमेश अथवा भाग्येश इथे असता किंवा चतुर्थेश पंचमात अथवा भाग्यात असता राजयोगी होतो. चतुर्थेश द्वितीयात असता स्वस्थानापासुन लाभात जाउन धनप्राप्ती चांगली होती. चतुर्थेश पंचमात स्वपराक्रमाने श्रीमंती दाखवतो. सप्तमात जाता विवाह लवकर होतो. दशमात येता मान हुद्दा तसेच वरिष्ठ दर्जाची नोकरी मिळते. षष्ठात, अष्टमात अथवा व्ययात जाता मात्र चतुर्थ स्थानाच्या फलितांमध्ये कमतरता आणतो.

चतुर्थ स्थान हे मातृ स्थान असुन इथे चंद्र दिग्बली ठरतो. गुरु हा शुभ ग्रह असुन सुखाचा कारक आहे. चतुर्थातील गुरूला राशीची साथ मिळता तो विशेष फलदायी ठरतो. वैवाहिक सुखाचा कारक चतुर्थात शुभ फलदायी ठरतो. विशेष करुन तुळेतला अथवा मीनेतला शुक्र कला क्षेत्रात मोठे यश देतो. तुळ लग्नाला चतुर्थातील योगकारक शनि राजयोगी ठरतो. इथे रवि विशेष फलदायी ठरत नाही. चतुर्थातील राहु केतु सुखात कमतरता आणतात. चतुर्थातील नेपच्युन आयुष्याचा शेवटचा काळ कष्टदायी करतो. तर हर्षल सातत्याने वास्तुतील बदल दर्शवतो.

वाहन सुखाचा विचार करताना चतुर्थ स्थान,चतुर्थ स्थानाचा स्वामी कारक ग्रह शुक्र यांचा विशेषत्वाने विचार करावा. त्याच प्रमाणे चतुर्थाला पाहणारे ग्रह, चतुर्थेशला पाहणारे ग्रह, चतुर्थातील ग्रह यांचा अभ्यास महत्वाचा ठरतो. त्याच पद्धतीने पंचम नवम स्थानाचा अभ्यासही करावा. वास्तु सुखाचा विचार करताना चतुर्थ स्थान, स्थानाचा स्वामी कारक ग्रह मंगळ याचा विचार करावा. तसेच आधी म्हणाल्याप्रमाणेच चतुर्थाला पाहणारे ग्रह, चतुर्थेशला पाहणारे ग्रह, चतुर्थातील ग्रह यांचा अभ्यास करावा. वास्तु सुखाचा अभ्यास लग्न लग्नेशाशिवाय अपुर्ण आहे. वास्तु - वाहन योगाचा विचार करताना चतुर्थेश - चतुर्थातील बलवान ग्रह - कारक ग्रह मंगळ/शुक्र यांच्या दशा भुक्ती काळाचा अभ्यास करावा. तसेच यांच्या गोचर स्थितीचा अभ्यासही महत्वाचा ठरतो. बुद्धिमत्तेचा दर्जा - शिक्षणाचे योग याचाही अभ्यास याच पद्धतीने केला जातो. बुद्धीचा कारक ग्रह बुध आहे.        

विविध स्थांनांविषयी बोलत असताना एक गोष्ट जी मी सातत्याने मांडत आलो आहे, ते म्हणजे एखाद्या स्थानाच्या फलिता मध्ये वृद्धी करण्याची अथवा कमतरता आणण्याची ताकद/सूत्रे लग्न-लग्नेशाकडे आहेत. त्यामुळे कुठल्याही स्थानाचे फलित वर्तवण्या आधी लग्न लग्नेशाचे बल तपासणे गरजेचे आहे. वास्तु वाहन हे आजच्या काळात महत्वाचे टप्पे आहेत. तर आयुष्यात धावत असताना सुखाची समाधानाची आस सर्वांना असते. याचसाठी केला अट्टाहास, शेवटचा दिन गोड व्हावा, हा विचार सर्वांच्याच मनी असतो. आणि म्हणुनच आयुष्यात पुढे जात असताना चतुर्थ स्थान तपासणे महत्वाचे ठरते.  

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र वास्तुशास्त्र रमलशास्त्र होराशास्त्र हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९   info.bhagyank@gmail.com

विवाह योग

वाढती महागाई, भ्रष्टाचार, अच्छे दिनचा पडलेला विसर या शब्दांनी वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरत असले तरी माझ्या सारख्या ज्योतिषाचे तरी असे मत झाले आहे कि विवाहयोगा इतका दुसरा कुठलाच मोठा प्रश्न माणसाच्या जीवनात असु शकत नाही. हे असे वाटण्याचे कारण म्हणजे सातत्याने याच विषयासंदर्भात भेटणारे जातक. म्हणजे आज आमच्याकडे येणाऱ्या जातकांच्या प्रश्नांचे वर्गीकरण केले असता निम्म्याहुन अधिक प्रमाणात जातक विवाहयोग विचारण्यासाठीच येत असतात. आणि म्हणुन माझे एक मत बनले आहे कि बाकी काही म्हणो सध्यातरी विवाहयोग हाच महत्वाचा प्रश्न आहे.
पण त्याचवेळी हा हि विचार मनात येतो कि हे असे का? इतर जटिल प्रश्न समोर असताना हाच प्रश्न इतका महत्वाचा का? याच्या उत्तराचा विचार करताना दोन पिढ्यांमधील अंतराचा आपण विचार केला पाहिजे. आत्ता विवाहयोग्य असलेल्या मुलामुलींचे पालक ज्या पिढीतले आहेत त्या पिढीत २१ व्य वर्षी लग्न तर २५ व्या वर्षी पदरी दोन मुल अशी सामाजिक पद्धती होती. पदवी पर्यंतचे शिक्षण हीच खुप मोठी बाब होती आणि तेवढ्या शिक्षणावरही सहज नोकरी मिळत होती. नोकरी आली कि छोकरीही निश्चित होती. काही अपवाद वगळता सर्वसाधारण गणित हे असेच होते. सध्या मात्र परिस्थिती वेगळी आहे. सर्वत्र स्पर्धा इतकी वाढली आहे कि कितीही शिक्षण घेतले तरी ते अपुरेच वाटते. यामुळे शिक्षणाचे वय २५ ते अगदी ३० पर्यंत जाऊन पोहचले आहे. त्या पुढे किमान दोन वर्ष करिअर आणि मग लग्न. या अर्थाने बहुतांशी लग्नाचे वय हे कमीत कमी २६ पर्यंत पुढे आले आहे. आणि हे २१ ते २६ मधलं पाच वर्षाचं अंतर पालकांना अधिक चिंतेत टाकत. आणि हे अंतर जसं जस वाढत जात तस तास हा प्रश्न ऐरणीवर येऊ लागतो. आणि मग मी वर म्हणल्या प्रमाणे याच्या इतका दुसरा कुठलाच महत्वाचा प्रश्न जातकाच्या आयुष्यात राहात नाही. मग जातक पालक असोत कि स्वतः मुलगा/मुलगी.
मग या प्रश्नातुन बाहेर पडण्याचा मार्ग काय? आपण आपल्या मुलाची/मुलीची कुंडली अधिकारी ज्योतिषाकडे दाखविणे. त्यांच्याकडुन विवाहाचे योग जाणुन घेणे. आणि योग्य वेळी विवाहासाठी प्रयत्न सुरु करणे. काय आहे कि स्टेशनवर येणाऱ्या गाडीची वेळ असते. जो दोन तास आधी येऊन थांबतो, त्याला ती दोन तासाने आली असे वाटते. तर एखादा ऐनवेळी येतो, अगदी चालत्या गाडीत चढतो. त्याला वाटत आपण आलो आणि लगेच गाडी मिळाली. आपल्याला एवढं ऐनवेळी जरी जायचं नसलं तरी गाडी स्टेशनवर यायची वेळ आणि आपण स्टेशनवर जायची वेळ यात योग्य अंतर असेल तर हे मधले अंतर निश्चितच तणावरहित व आनंदाचे असु शकते. आता हे मधले अंतर किती असावे याचा निर्णय जरी ज्याचा त्यानी घ्यायचा असला तरी गाडीची वेळ मात्र आपण अधिकारी ज्योतिषालाच विचारायला हवी.
या चिंतेमागे अजुन एक कारण दिसुन येते ते म्हणजे या काळात विविध ज्योतिषांकडुन केला जाणारा विविध उपायांचा मारा. हे सर्व उपाय यथाशक्ती (अनेकदा तर यथाशक्तीच्याही पुढे) करुन सुद्धा जेव्हा विवाह योग जुळुन येत नाही तेव्हा चिंतेत अधिक भर पडते. उपायांच्या बाबतीत एक मत माझे ठाम राहिलेले आहे कि, "An Astrologer can Read Your Future, He cannot Change Your Future." एखाद्या उपायाने जर गाडी वेळेच्या आधी येणार असती तर भारताने सुपरफास्ट इंजिन घेण्या ऐवजी प्रत्येक स्टेशनवर एक ज्योतिषीच बसवला असता. पण असे होऊ शकत नाही. काही उपाय निश्चित माणसाला मानसिकता बदलायला मदत करतात.ज्याचा उपयोग त्याला निर्णय प्रक्रियेमध्ये मदत करतो. तसेच काही उपाय जातकाला ऊर्जा देणारेही असतात. या कारणास्तव एखादा उपाय कोणी सांगत असेल तर तो जरुर करावा. मात्र एखाद्या उपायाने विवाहयोग लवकर येईल असा दावा कोणी करु पाहात असेल तर त्यावर विश्वास ठेवु नये. यातुन निराशाच पदरी पडते.
या सर्वाचा सार इतकाच विवाह योग हा पूर्वनियोजित आहे. त्यामुळे त्या विषयी पालकांनी अथवा मुलांनी/मुलींनी चिंता बाळगु नये. हा योग कधी आहे हे जाणुन घेतल्यास कदाचित विवाहापर्यंतचा प्रवास अधिक सुखकर होऊ शकतो.
- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ । info.bhagyank@gmail.com

Saturday, 15 October 2016

गुणमेलन अधिक ग्रहमेलन

खरं तर हा विषय मी सातत्याने मांडत आलोय कि गुण मेलना इतकेच महत्व ग्रहमेलनालाही देणे गरजेचे आहे, पण काही ठिकाणी हा विषय टाळला जातो. आणि मग केलेले भाकीत चुकण्याची शक्यता निर्माण होते.

गुणमेलन हे चंद्र राशीवरुन केले जाते. चंद्र हा मनाचा कारक आहे, त्यामुळे या पद्धतीतुन वधुवर स्वतःला सुयोग्य आहेत कि नाही हे ठरते. परंतु विशेषत्वाने सध्याच्या काळात जिथे स्त्री पुरुषांना स्वतंत्र निर्णय स्वातंत्र्य आहे, बहुतांशी अर्थार्जनाने स्वतंत्र आहेत तिथे फक्त मनाचा विचार न करता कुंडलीतील इतर स्थानांचा विचारही महत्वाचा ठरतो. आणि म्हणुनच चंद्रा इतकच इतर ग्रहांचे योग तपासणंही महत्वाचं ठरत.

विषय अधिक स्पष्ट करण्यासाठी सोबत एक उदाहरण देत आहे.


इथे पारंपरिक गुणमेलन पद्धती मध्ये २० गुण जुळतात, ज्या नियमाने पुढे जाण्यास हरकत नसावी.

ग्रहमेलनाचा विचार करता लग्न राशींचा नवपंचम योग आहे मात्र लग्नेश एकमेकांच्या केंद्रात आहेत. सप्तमेशांची प्रतियुती आहे. व दशमेश देखील प्रतियुती मध्ये आहेत.पंचमेश व कुटुंबेश लाभात तर चतुर्थेश नवपंचमात हीच काय जमेची बाजु आहे. रवि, मंगळ व शुक्र षडाष्टक योगात आहेत. चंद्र प्रतियुती तर गुरुचा एक राश्यांतर योग आहे. बुध नवपंचम तर शनि एका राशीत हीच काय ती जमेची बाजु आहे.

ग्रहमेलनाचा विचार करता मात्र हे स्थळ पुढे जाण्यास तितकेसे योग्य नाही.

आता आपण फक्त गुणमेलनाचा विचार करुन पुढे जा असे म्हणले असते तर ते तितकेसे योग्य ठरले नसते.
म्हणुनच विवाहासारखा महत्वाचा निर्णय घेताना, गुणमेलना बरोबरच ग्रहमेलनाचाही विचार केला गेला पाहिजे.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ । info.bhagyank@gmail.com

Tuesday, 4 October 2016

पैशाची पेटी / तिजोरी आणि वास्तुशास्त्र


आज सर्वत्रच प्लॅस्टिक मनी किंवा कार्ड बँकिंग किंवा ऑनलाईन ट्रँझॅकशन चा सुळसुळाट असला तरी काही व्यावसायिक क्षेत्रांमध्ये रोख रकमेचा संबंध आहेच. अर्थ क्षेत्रातील संस्था, रिटेल दुकाने, दागिन्यांची दुकाने, हॉटेल अथवा भाजीपाल्याची दुकाने या सर्वच व्यवसायांत रोज रोख रकमेचा संबंध येतो. अशावेळी हि रोख रक्कम ठेवायची पेटी अथवा मोठ्या अर्थाने तिजोरी कोणत्या दिशेस असावी याचा विचार वास्तुशास्त्रामध्ये केला आहे.



सोबत दिलेल्या चित्राप्रमाणे आपल्या वास्तुचे नऊ भाग पाडले असता, पैशाची पेटी / तिजोरी उत्तर भागात दक्षिण भिंतीला उत्तरेकडे उघडणारी असावी. व्यावसायिक जागेचा आकारमान लहान असता कदाचित हे शक्य होणार नाही. मागे नैऋत्य भागाचे महत्व सांगणारा लेख लिहिताना आपण दुकानात मालकाची जागा नैऋत्य भागात सांगितली आहे. आणि पैशाची पेटीही मालकाच्या जवळ असते. त्यामुळे थेट उत्तर भागात पैशाची पेटी करणे शक्य होत नाही. अशावेळी मालकाच्या इथेच पण दक्षिण दिशेला उत्तरेकडे उघडणारी पैशाची पेटी ठेवावी. शक्य झालं तर दोन पेट्या कराव्यात. एक मालकाच्या इथे दिवस भराच्या व्यवहारासाठी तर मुख्य पेटी वर सांगितल्या प्रमाणे उत्तर भागात.

पैशाच्या पेटीच्या बाबतीत एक महत्वाचा नियम लक्षात ठेवावा. पैशाची पेटी कधीही मोकळी नसावी. त्यात किमान काही ना काही रक्कम असावी. पैशाच्या पेटीमध्ये रोख रकमेबरोबर काही सुट्टी नाणीही ठेवावीत. पैशाची पेटीही नेहमी स्वच्छ व सुंदर असावी. त्यात पैशाव्यतिरिक्त इतर सामान टाकु नये. फाटक्या नोटा/जुन्या नोटा/खराब झालेली नाणी अशा वस्तु पैशाच्या पेटित ठेवु नयेत. शक्य झाल्यास पैशाच्या पेटीत रोज ताजे फुल ठेवावे. त्यावर मालकाने अथवा व्यवसायाच्या प्रमुखाने रोज स्वस्तिक काढावे. हिंदु धर्मीयांव्यतिरिक्त इतर धर्मीयांनी आपापल्या धर्माचे शुभं चिन्ह ठेवावे.

घरामध्येही सध्या काही उच्च वर्गीय कुटुंबे वगळता मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम अशी कोणी घरात ठेवत नाही. मात्र जिथे ती ठेवली जाते, तिथे अथवा ज्या घरात किमान रक्कम ठेवली जाते त्या घरातही वरील नियम पाळावेत. शक्य झाल्यास घराच्या उत्तरेकडील खोलीत दक्षिण भिंतीला असे कपाट असावे. अथवा शयनगृहात दक्षिणेकडील भिंतीला उत्तरेकडे उघडणारे कपाट असावे. आपले दागदागिने, बँक खात्याची पुस्तके हे सुद्धा याच दिशेला असावे.

हे झाले मुळ नियम. मात्र ज्योतिष शास्त्राप्रमाणेच वास्तुशास्त्राचे नियम हे वास्तुसापेक्ष असुन वेगवेगळ्या वास्तुमध्ये या नियमांत कमी अधिक प्रमाणांत बदल करावे लागतात. त्यामुळे एकदा आपली वास्तु वास्तुशास्त्राप्रमाणे जरुर तपासुन घ्यावी.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ । info.bhagyank@gmail.com