Monday, 19 September 2016

शनि - मंगळाची सुटली युती ...



फेब्रुवारी २०१६ ला मंगळाने वृश्चिक राशीमध्ये प्रवेश केला. १७ जुनला वक्री मार्गे मंगळ मागे तुळ राशीमध्ये प्रवेश केला. तद नंतर तो पुन्हा मार्गी होऊन १२ जुलैला त्याने वृश्चिकेत प्रवेश केला. आणि आज १९ सप्टेंबर २०१६ ला मंगळाने धनु राशीमध्ये प्रवेश केला.

या काळात शनि वृश्चिक राशीमध्येच होता. विशेष करुन २५ मार्च ते १३ ऑगस्ट या काळात वृश्चिकेतच शनि वक्री होता. ह्या सर्व प्रवासात २४ ऑगस्टला शनि मंगळाची अंशात्मक युती झाली. इतर वेळेस अंशात्मक युती नसली तरी, वृश्चिक सारख्या स्फोटक राशीमध्ये स्फोटक मंगळ आणि विलंब व अडथळ्यांचा द्योतक शनि फार मोठा काळ एकत्र होते.

याची दाहकता विशेषत्वाने साडेसाती चालु असलेल्या तुळ, वृश्चिक व धनु राशींनी अनुभवली. त्याच वेळी पनौती चालु असलेल्या मेष व सिंह राशीलाही याचा त्रास झाला. कुंभ राशीला दशमात तर मकरेला लाभात राशिस्वामी शनिचा मंगळाशी सहयोग झाल्याने करिअरच्या दृष्टीने हा काळ खडतर गेला. कर्केला पंचमातुन हा योग झाल्याने संतती सौख्यासाठी तर मीनेला सप्तमातुन हा योग झाल्याने विवाहयोगासाठी वाट पहावी लागली. मिथुनेला षष्ठातून तर मेषेला अष्टमातुन हा योग झाल्याने आरोग्याचे प्रश्न उभे राहिले. काहींना शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले तर त्यातही काहींच्या शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्या.

जसे विविध राशींनी याचे परिणाम भोगले तसेच विशोंत्तरी दशांनाही याची झळ पोहचली. ज्यांचा कुंडलीत शनि अथवा मंगळाची महादशा/अंतर्दशा/विदशा चालु होती त्यांना मोठ्या प्रमाणावर अडचनींना सामोरे जावे लागले. शनि वक्री असताना याची परिणामकारकता अधिक होती. ज्यांचा कुंडलीमध्ये शनिच्या महादशे मध्ये मंगळाची अंतर्दशा अथवा अंतर्दशेमध्ये विदशा किंवा मंगळ महादशेमध्ये शनिची अंतर्दशा अथवा अंतर्दशेमध्ये विदशा चालु होती त्यांना हे परिणाम अधिक अधोरेखित झाले.

या काळात राजकीय पटलावर सत्ताधारी पक्षाचे अनेक डावपेच अपयशी ठरताना आपण पहिले. महामार्गावर अपघात होत असतात पण त्यांच्या संख्येतील वाढ या काळात अनुभवास आली. संरक्षण क्षेत्राचा विचार करत असताना सैन्यावरचे व पोलिसांवरचे वाढते हल्लेही आपण या काळात पाहिले.

आता मंगळ धनु राशीमध्ये मार्गस्थ झालेला आहे. व पुढचा फार मोठा काळ शनि मंगळाची युती होणार नाहीये. त्यामुळे विशेषत्वाने ज्या राशींना साडेसाती अथवा पनौती असणार आहे, त्यांनी सुटकेचा निःश्वास टाकायला हरकत नाही.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ ।  info.bhagyank@gmail.com

Thursday, 15 September 2016

व्यावसायिक जागा आणि नैऋत्य दिशा

मागच्या आठवड्यात नैऋत्य दिशेचे महत्व सांगणारा लेख लिहिला होता. त्या लेखात नैऋत्य दिशेविषयी लिहितांना अधिकांश संदर्भ घराचा दिला होता. या लेखात व्यावसायिक जागेच्या अनुषंगाने काही मुद्दे देत आहे.

काल एका बेकरी उत्पादने विकणाऱ्या दुकानाची वास्तु पाहण्याचा योग आला. या पुर्वीही एका बेकरीची उत्पादने विकणाऱ्या ब्रँडच्या काही शाखांची वास्तु भेट केली होती. तो पूर्वानुभव गाठीशी होताच.  जातकाने खरं तर दोन एक आठवड्या मागेच या वास्तु संदर्भात फोन केला होता. सदर व्यवहार पुढे न्यायच्या दृष्टीने किमान चर्चा फोनवरुन झाली. जातकाने दुकानाच्या दिशा सांगताच, आधीच्या मालकाला येत असलेल्या अडचणी सांगताच वास्तुमध्ये काय महत्वाचा दोष असेल हे पूर्वानुभवावरुन सांगितले. ज्यात विशेष करुन कॅश बॉक्स वायव्येला असु शकतो अधिकतर वजन पूर्व - उत्तर भागात असेल, असे दोन वास्तु दोष सांगितले होते. मात्र यात सहज बदल करणे शक्य असुन व्यवहार पुढे न्यायला हरकत नाही असेही सुचवले.

जातकाने व्यवहार पुढे नेला काल मला प्रत्यक्ष वास्तु पाहण्यास बोलावले. खरे तर वास्तु पाहण्यासाठी आधी मागील आठवड्यात ऋषीपंचमीला दुपारी ०२:०० च्या दरम्यान जाणार होतो. पण मी नेहमीच मानत आलोय कि वास्तु आणि कुंडलीचा निश्चितच परस्पर संबंध आहे. या जातकाच्या बाबतीत तेच अनुभवास आले. काही वैयक्तिक कारणाने ऋषी पंचमीला होणारी भेट रद्द झाली. त्या वेळी निसर्ग कुंडलीमध्ये पुण्यात धनु लग्न चालु होते. काल संध्याकाळची भेट अचानक ठरली. आणि काल सांयकाळी पुणे येथे निसर्ग कुंडलीमध्ये मीन लग्न चालु असताना वास्तु भेट झाली. जातकाच्या कुंडलीचा अभ्यास करता दशमामध्ये म्हणजेच कर्म स्थानामध्येही मीन रासच आहे.

आता त्या वास्तु विषयी बोलु. सोबत दोन चित्रे जोडली आहेत. एकामध्ये वास्तुची सद्य स्थिती तर एकामध्ये आम्ही सुचवलेले बदल दिले आहेत. वास्तूचे प्रवेशद्वार उत्तरेला असुन मुख्य रस्ताही उत्तरेलाच आला आहे. अधिक वजन हे पश्चिम भागात आहे. तर पूर्व भाग पूर्ण मोकळा आहे. या वास्तुच्या सर्वात जमेच्या बाजू आहेत. वास्तु आयता कृती असुन कुठलीच दिशा कमी अथवा जास्त झालेली नाही. या वास्तुचा मालक वास्तु पासुन दुर राहात असुन त्याच्या अशा अनेक शाखा आहेत. मात्र या शाखेला त्याला म्हणावा तसा वेळ देता येत नाहीये. व्यवसायातील गुंतवणुकीच्या तुलनेत उत्पन्न मात्र कमी आहे.

उत्तर प्रवेशद्वार असताना किंवा इतर जमेच्या बाजु असतानाही या अडचणी का? हा प्रश्न स्वाभाविकपणे येतो आणि मग आठवण येते ती नैऋत्य दिशेची. वास्तु शास्त्राच्या नियमानुसार वस्तुमानाची तुलना करताना नैऋत्य दिशेला अधिक जडत्व हवे. मात्र इथे फ्रीजची रचना करताना वायव्य भागातुन फ्रीज चालु होतो आणि त्याचा काही भाग नैऋत्येला येतो. या उलट नैऋत्येला काउंटरच्या आत येण्या-जाण्यासाठी जागा सोडली आहे. त्यामुळे आपोआपच नैऋत्य दिशा जडत्वाच्या मानाने हलकी झाली. व्यावसायिक प्रगतीसाठी मालकाने नैऋत्येला असायला हवे. इथे मात्र नैऋत्येपासून येण्या जाण्याची जागा सोडल्याने आपसुकच मालक वायव्येला आला. वायव्य दिशा वायु देवतेची असुन इथुन ऊर्जा बाहेर जाते. यामुळे हि शाखा ज्यांची आहे, त्यांनाच तिथे थांबायला वेळ मिळत नाही. मालकाची जागा वायव्येला आल्याने आपसुकच कॅश बॉक्स वायव्येला आला. त्यामुळे आलेला पैसा टिकणे हा अनुभव येऊ लागला. त्यातुनच आवक कमी आणि जावक जास्त अशी स्थिती झाली. आणि त्यातूनच शेवटी त्याने ती शाखा दुसऱ्याला म्हणजेच माझ्या सद्य जातकाला देण्याचा निर्णय घेतला.

या वास्तुत प्रवेश करताच एक भाग मला जाणवला कि या वास्तुत शुभत्व असुन लक्ष्मी योग आहे. अडचण आहे ती चुकीच्या वस्तुमानाची. त्यामुळे आम्ही जातकाला सहज सोपे दोन बदल सांगितले. एक म्हणजे फ्रीज पुर्ण नैऋत्य भागात सरकवावा. आत येण्या जाण्यासाठी वायव्येकडून जागा मोकळी सोडावी. दुसरा बदल असा कि कॅश बॉक्स दक्षिण भागात ठेवावा तो उत्तरेकडे उघडेल अशी योजना करावी. या व्यतिरिक्त प्रवेशद्वार जे अगदीच कोपऱ्यामध्ये आले आहे, ते थोडे पुढे ओढुन घ्यावे.

व्यावसायिक जागेमध्येही नैऋत्य जागेला अनन्य साधारण महत्व आहे कारण ती मालकाची जागा आहे. कार्यालयीन जागा असल्यास नैऋत्येकडे पण दक्षिण भागात मुख्य मालकाची केबिन असावी. त्या खालोखाल जबादारी नुसार अधिकाऱ्यांच्या केबिन दक्षिण पश्चिम दिशेने वाढवत जाव्यात. कारखान्याच्या ठिकाणी नैऋत्य भागात पण अधिकतर दक्षिण दिशेने कामकाजाचे मुख्य कार्यालय असावे. तर कामाच्या रचनेला महत्व देत अधिक जड यंत्रांची योजना नैऋत्य भागात त्या खालोखाल पश्चिम भागातुन नंतर दक्षिण भागातुन यंत्रांची रचना करावी.

दिशांचा विचार करुन पुढे गेल्यास निश्चितपणे व्यवसायात सुख-समाधान-प्रगती साधता येते.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र वास्तुशास्त्र रमलशास्त्र होराशास्त्र हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९   info.bhagyank@gmail.com

Sunday, 11 September 2016

लग्न स्थानाची प्रतिभा

लग्न स्थानाची प्रतिभा



होराशास्त्रामध्ये तीन राशी महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत. चंद्र रास, सूर्य रास, व लग्न रास.

यातील लग्न रास म्हणजे जन्म समयी पूर्व क्षितिजावर जी रास उदित पावत असते, त्या राशीला लग्न रास असे म्हणतात. ही रास कुंडलीमध्ये प्रथम स्थानी लिहिली जाते. हे झाले कुंडलीतील लग्नस स्थान. लग्न स्थानाला तनु स्थान तसेच व्यक्तिमत्व स्थानही म्हणले आहे. होराशास्त्रामध्ये चंद्र राशीपेक्षाही अधिक महत्व लग्न राशीला आहे. लग्न राशीच्या स्वामीला लग्नेश अशी संज्ञा आहे. जो भाग चंद्र राशीचा तोच चंद्राचाही. इथे चंद्रापेक्षाही अधिक महत्व लग्नेशाला आहे. लग्न बिंदुचे नक्षत्र व नवमांश यावरही फलितात मोठा बदल होतो.

कुंडलीतील प्रथम स्थानाला आपण लग्न स्थान म्हणले आहे. त्यामुळे प्रथम स्थानातील ग्रहांना लग्नस्थित ग्रह म्हणले जाते. लग्नस्थित ग्रहांप्रमाणेच लग्नाला पाहणाऱ्या ग्रहांचाही विचार केला जातो. सर्व ग्रहांना सप्तम दृष्टी आहे. त्यामुळे कुंडलीतील सप्तम स्थानातील सर्व ग्रह लग्नाला पाहतात. तसेच गुरूला पाचवी व नववी दृष्टी आहे, त्यामुळे पंचमातील व भाग्यातील गुरु लग्नाला पाहतो. मंगळाला चौथी व आठवी दृष्टी आहे. त्यामुळे षष्ठातील व दशमातील मंगळ लग्नाला पाहतो. शनिला तिसरी व दहावी दृष्टी आहे. त्यामुळे चतुर्थातील व लाभातील शनि लग्नाला पाहतो. हाच विचार लग्नेशाला पाहणाऱ्या ग्रहांचाही केला जातो.

लग्न स्थान हे इमारतीचा पाया असुन जर पायाच भक्कम नसेल, तर इमारत डळमळीत उभी राहते. कुंडलीमध्ये कितीही राजयोग असले तरी लग्न/लग्नेश निर्बली असता हे राजयोग तोकडे पडतात. या उलट कुंडलीमध्ये कितीही अशुभ योग असले तरी लग्न/लग्नेश बलवान असता मनुष्य त्यावर मात करुन प्रगती मिळवतो. लग्नेश लग्नात असता, लग्न लग्नेशाने दृष्ट असता तसेच लग्नेश वर्गोत्तम असता लग्न बलवान होते. लग्नात उच्च ग्रह, वर्गोत्तम ग्रह, मित्र ग्रह अथवा त्यांची दृष्टी असताही लग्न भाव बलवान होतो. या उलट लग्नात पाप ग्रह असता अथवा लग्नेश पाप ग्रहांबरोबर असता, लग्नावर पाप ग्रहांची अथवा शत्रू ग्रहांची दृष्टी असता, अथवा लग्नेश नीचेचा किंवा नीच ग्रहांबरोबर असता लग्नस्थान बिघडते.

लग्न स्थान व्यक्तीचा स्वभाव ठरवत असते. चंद्र हा मनाचा कारक असून अधिकांश वेळा मनुष्य स्वभाव हा चंद्र राशी वरुन ठरवला जातो. मात्र त्या स्वभावाला अनुसरून व्यक्तीची क्रिया व प्रतिक्रिया कशी असेल हे मात्र लग्न स्थान ठरवते. म्हणूनच व्यक्तीच्या जीवनातली महत्वाची स्थित्यंतरे लग्नेशाच्या महादशा/अंतर्दशा/विदशेमध्ये होतात. लग्नेशाचे गोचर भ्रमण व लग्नाला/लग्नेशाला गोचरीने पाहणारे ग्रह देखील व्यक्तीच्या जीवनात महत्वाची स्थित्यंतरे घडवुन आणतात. चंद्र राशीपासुन येणाऱ्या साडेसातीपेक्षा लग्न राशीपासुन येणारी साडेसाती अधिक त्रास देताना काही कुंडल्यांच्या बाबतीत मी अनुभवली आहे.

धनाचा विचार द्वितीय स्थानावरून केला जात असला, कर्माचा विचार दशमस्थानावरुन केला जात असला तरी कर्तृत्व हे लग्न स्थानच ठरवते. रोगाचा विचार षष्ठावरून, मोठ्या आजारांचा विचार अष्टमावरून केला जात असला तरी प्रकृती हि लग्नस्थानावरूनच ठरते. वैवाहिक सुखाचा विचार सप्तम व सप्तमेशावरून केला जातो. सप्तम अथवा सप्तमेशाचे अशुभ योग असता वैवाहिक सुखात कमतरता सांगितली जाते. मात्र याच ठिकाणी लग्न/लग्नेश बलवान असता अशुभ फलांची तीव्रता कमी होते. लग्नेश पंचमात अथवा भाग्यात सुस्थितीत असता तो उच्च प्रतीचा राजयोग समजला जातो. लग्नेश केंद्रात असता संघर्षातुन यश मानले जाते. लग्नेश द्वितीयात असता जातक स्वकर्तृत्वार पैसा कमावतो. लग्नेश अष्टमात असता अचानक धनलाभाचे योग येतात.

लग्न राशीविषयी आणखी एक अनुभव सांगायचा म्हणजे ९०% वेळा जातकाच्या कुंडलीमध्ये जी लग्न रास असते, गोचरीने ते लग्न चालु असताना अथवा चंद्र त्या राशीमध्ये असताना जातक आमच्याकडे येतो.

या सर्वाचा सार एकच कि सर्व साधारण फलादेश हा चंद्र राशीवरून सांगितला जात असला तरी लग्न राशीवरुन तो तपासणे गरजेचे आहे. कुंडलीतील स्थानागत फलादेशांमध्ये सकारात्मक अथवा नकारात्मक बदल घडवण्याची ताकद लग्न/लग्नेशामध्ये आहे. आयुष्यात पुढे जाताना या दृष्टीकोनातुन आपली कुंडली एकदा जरुर तपासुन घ्यावी.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ । info.bhagyank@gmail.com

Saturday, 3 September 2016

महत्व नैऋत्य दिशेचे

महत्व नैऋत्य दिशेचे

मागच्या आठवड्यात मुंबईला एका वास्तुला भेट दिली. खरे तर जातक माझ्याकडे कुंडली घेऊन आला होता. त्याला एका मोठ्या आजाराने ग्रासले होते. आजाराच्या औषोधोपचाराने शरीर क्रश झाल्याने त्याला व्यवसायाकडे व्यवस्थित लक्ष देणे जमत नव्हते. त्याकारणाने आर्थिक अडचणीही होत्या. जातकाची पत्रिका आपण तपासली. त्याप्रमाणे विवेचनही केले. मात्र कुंडलीतील काही योग पाहता वास्तुला भेट द्यायची इच्छा व्यक्त केली. जातकाने रीतसर दक्षिणा भरुन वास्तुभेट ठरवली.
थोडे विषयांतर होईल पण इथे विशेष उल्लेख करावासा वाटतो कि इतर जातकांपेक्षा हा जातक खुप वेगळा होता. आदल्या दिवशी रात्री प्रवासाची तयारी झाली का? या फोन पासुन ते रेल्वे स्टेशन ते घरापर्यंतची व्यवस्था, परतीची व्यवस्था ते पुन्हा रात्री व्यवस्थित पोहोचलात का? चा फोन, इतकी काळजी घेणारे जातक क्वचितच भेटतात. पण यामुळे हि माणसे व त्यांची वास्तुभेट कायम लक्षात राहते.

पुन्हा विषयाकडे वळु. आज एवढे वर्ष वास्तुशास्त्राचा अभ्यास करत असल्याने काही वास्तुंचा दोष प्रवेश केल्या केल्याचं लक्षात येतो. आम्ही घरात प्रवेश केल्या वर थेट दिवाणखान्यात आलो. काहीतरी चुकतंयची धडधड तिथेच जाणवली. प्रवेशद्वाराविषयी बोलताना जातकाने सांगितले कि दारातच एक शौचालय आहे. सोबत वास्तुचे चित्र जोडले आहे. आपण पाहु शकता कि प्रवेशद्वारातुन थेट दिवाणखान्यात गेल्यास शौचालयाकडे लक्ष जात नाही. माझेही काहीसे तेच झाले. पण जातकानेच ते लक्षात आणुन दिले.
इथे प्रवेशद्वार थेट नैऋत्य भागात आले आहे. त्यातच तिथे सलग दोन शौचालयेही आली आहेत. नैऋत्य दिशा हि घराच्या कर्त्यापुरुषाची दिशा मानली जाते. आजच्या काळात कर्त्या स्त्रीचीही म्हणायला हरकत नाही. तर नैऋत्य दिशेलाच प्रवेशद्वार आल्याने आपोआपच नैऋत्य दिशा इतर दिशांच्या मानाने मोकळी राहते, हलकी राहते. आपल्याकडे नैऋत्याकडून ईशान्येकडे वारे वाहतात. त्यामुळे शौचालय नैऋत्येकडे असता त्याचे अशुभत्व वाऱ्याबरोबर संपूर्ण घरावर पसरते. जे घरातल्या व्यक्तींच्या आरोग्यासाठी शुभ नसते. त्यात शौचालय म्हणजे खड्डा आला. आपल्याकडे नैऋत्येला खड्डा नसावा असे सांगितले आहे. या सर्वाचा परिणाम घराच्या कर्त्यापुरुषावर होतो. विशेषत्वाने त्याचे घरातली प्रभुत्व कमी होणे. व्यवसायाच्या ठिकाणी अपेक्षित मानसन्मान न मिळणे. अर्थार्जनात अडथळे येणे यासारखे परिणाम जाणवतात. इथे शौचालयाने नैऋत्य दिशा अधिक बिघडली आहे. ज्याचा थेट परिणाम जातकाच्या आरोग्यावर झाला.
नैऋत्य दिशा म्हणजे दक्षिण व पश्चिम या मुख्य दिशांमधील उपदिशा. हि दिशा पृथ्वी तत्वाची असुन जडत्वाची दिशा आहे. उताराचा विचार करता हि वास्तुतील उंच दिशा आहे. ऊर्जेचा विचार करता हि स्थिर दिशा असुन इथे ऊर्जा नसते. बांधकामाचा विचार करता एकूण जागेतील नैऋत्य भागात अधिकाधिक बांधकाम करावे. बांधकामाचा उतार ठरवताना हि दिशा उंच राहील याची काळजी घावी. नैऋत्येला पाणी असु नये. पाण्याची टाकी जमिनी खाली असेल तर ती नैऋत्येला करु नये. मात्र हीच टाकी उंचावर करायची असता नैऋत्येलाच करावी. घराचा विचार करता मुख्य शयनगृह नैऋत्य भागात असावे. त्यानंतर पश्चिमेकडून खोल्या वाढवाव्यात. अडगळीची खोली करायची असल्यास ती या भागात करावी. फर्निचर करताना जाड सामान या भागात येईल असे पाहावे.
घरातील मुख्य शयनगृह वगळता इतर शयनगृह या दिशेस नसावे. झोपताना डोके नैऋत्य कोपऱ्यात करु नये. दिवाणखाना या भागात नसावा. स्वयंपाकघर या भागात येता कामा नये. आलेच तर किमान अग्नी व पाणी या कोपऱ्यात येणार नाही इतकी काळजी घ्यावी. या भागात खड्डा खोदु नये. या भागात आंगण करु नये. मुख्य प्रवेशद्वार या भागात नसावे. पैशाची तिजोरी थेट या कोपऱ्यात ठेवु नये. घराच्या इतर दिशांच्या तुलनेत हि दिशा हलकी असता कामा नये. तसेच ती मोकळी राहणार नाही याचीही काळजी घ्यावी.
नैऋत्य दिशेविषयी लिहिण्यासारखे खुप आहे. सर्वच काही इथे लिहिता येणार नाही. एक नियम नेहमीचाच कि वास्तुतज्ञाने निर्णय घेताना वास्तुसापेक्ष निर्णय घ्यावा. हि दिशा घराच्या मालकाची दिशा असुन मालकाच्या आर्थिक/सामाजिक प्रगती बरोबरच त्याच्या आरोग्यावरही हि दिशा परिणाम करत असते. आणि म्हणुनच वास्तुशास्त्रामध्ये या दिशेला अनन्य साधारण महत्व आहे.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ । info.bhagyank@gmail.com