Sunday, 28 January 2018

वास्तु योग आणि जन्म कुंडली


स्वतःची वास्तु होणे हा आयुष्यातला खुप महत्वाचा टप्पा असतो. काही जण हा टप्पा विवाहा आधीच गाठतात तर काही जण विवाहा नंतर. काही जण रोख रक्कम देऊन स्वतःची वास्तु घेतात तर काही जण कर्ज काढुन. काही जणांच्या वास्तु खरेदीमध्ये वैवाहिक जोडीदार आर्थिक रुपाने भागीदार असतो, तर काही जण एकट्याच्या बळावर वास्तु खरेदी करतात. काही जण करिअरच्या सुरवातीच्या टप्प्यात वास्तु खरेदी करतात तर काही मध्यल्या तर काही निवृत्तीनंतर स्वतःची वास्तु करतात.

हे एक यश असते जे सर्वांना मिळवायचे असते. या यशा पर्यंत पोहोचायचा मार्ग सोप्पा नसतो. आर्थिक कौटुंबिक स्तरावर मोठी कसरत चालु असते. वास्तु विषयी प्रत्येकाच्या मनात काही स्वप्न असतात आणि वास्तु खरेदी करताना हि स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. घरातल्या सर्वांनाच खूश करता येत नाही पण प्रत्येकाला आवडेल असा निर्णय ह्यवा लागतो. हा निर्णय घेताना सध्या घरांच्या वाढत्या किमती हा हि एक प्रश्न आहेच. त्यामुळे प्रत्येक वेळी मनातील स्वप्न प्रत्यक्षात उतरेलच असे नाही.

हा जो वास्तु योग आहे, हि जी स्वप्नपूर्ती आहे, हा जो महत्वाचा टप्पा आहे, हा कधी येईल, कसा येईल व कुठे येईल हे आपली जन्म कुंडली सांगत असते. लग्न लग्नेश आपली इच्छाशक्ती दाखवते, धन स्थान आपली आर्थिक कुवत दाखवते, चतुर्थ स्थान वास्तु सुख आहे किंवा नाही आणि असेल तर कसे या विषयी सांगते, भाग्य स्थान आपल्या वास्तु योगाचा मार्ग सांगते, लाभ स्थान इच्छा पूर्ती होईल कि नाही हे सांगते तर व्यय स्थान कर्ज तसेच कायदेशीर बाबींविषयी सांगते. या सर्व स्थानांचा अभ्यास करता आपल्याला वास्तू योग कळतो.

हा विषय अधिक स्पष्ट करण्यासाठी एक उदाहरण सोबत देत आहे. यातील तांत्रिक भाग सर्व वाचकांना नाही कळणार मात्र वास्तु योगाचे महत्व निश्चितच लक्षात येईल. या जातकाने २०१७ च्या सप्टेंबरमध्ये वास्तु घेतली. हि पुनःर्विक्री केलेली वास्तु आहे. कर्क लग्नाची हि कुंडली असुन लग्नेश चंद्र भाग्य स्थानामध्ये शनिच्या नक्षत्री नीच नवमांशी राजयोगी आहे. तो नीच नवमांशी असल्याने या राजयोगाचे बळ कमी होते. या जातकाच्या धन स्थानामध्ये सिंह रास असुन धनेश रवि व्यय स्थानामध्ये आहे. यामुळे सततच्या कर्जाच्या अंगाने जाणारी हि कुंडली आहे. चतुर्थात शुक्राची तुळ रास असुन चतुर्थेश शुक्र लाभ स्थानामध्ये स्वराशीचा उच्च नवमांशी आहे. यामुळे वास्तु वाहन सुखाला उत्तम कुंडली आहे. अष्टमेश शनि चतुर्थात आल्याने व तो तिथे केतु बरोबर असल्याने जातकाने जुने व पुनःर्विक्री केलेले घर खरेदी केले. भाग्य स्थानामध्ये चंद्र राजयोगी आहे, तर भाग्येश गुरु सप्तमात राजयोगी आहे. इथे गुरु नीच राशीमध्ये असला तरी तो उच्च नवमांशी आहे. लाभ स्थानामध्ये लाभेश शुक्र स्व राशीचा उच्च नवमांशी आहे. तर व्यय स्थानामध्ये रवि मंगळ व व्ययेश बुध लग्नी असा योग आहे.

२०१७ मध्ये जातकाची शुक्राची महादशा म्हणजेच वास्तुकारक चतुर्थेशाची महादशा चालु होती. शुक्र महादशेमध्ये शुक्र अंतर्दशेत जातकाने वास्तु नियोजित केली, तर सप्टेंबर २०१७ मध्ये रविच्या अंतर्दशेमध्ये म्हणजे धनेशाच्या अंतर्दशेमध्ये वास्तु खरेदी केली. रवि अंतर्दशेत देखील चंद्राची म्हणजेच लग्नेशाची तसेच भाग्यातील ग्रहाची विदशा चालु असताना व्यवहार पुर्ण होऊन वास्तु प्रवेश झाला.

आपण खुपदा म्हणतो कि मी वास्तु घेतली, पण ती घेण्यासाठी वास्तुतील ग्रहयोगही तितकेच कारणीभुत असतात. या उलट आपण आपली वास्तु व्हाव्ही म्हणुन खुप धडपड करतो पण व्यवहार मार्गी लागत नाही, कारण त्यावेळी आपला वास्तु योग आलेला नसतो. हा लेख खास करुन त्या  लोकांसाठी आहे ज्यांचा अद्याप वास्तुयोग आलेला नाही. धीर सोडु, नका हताश होऊ नका आपल्याही कुंडलीमध्ये वास्तु योग निश्चितच येईल.


- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://www.facebook.com/BhagyankJyotishVVastushastraSallaKendra/ 

No comments:

Post a Comment