Monday, 6 March 2017

कुठल्या ग्रहाचे रत्न घालावे?


राशी रत्न हा शब्द आपण नेहमीच ऐकतो. आपल्याला आपले जन्म टिपण माहिती असेल तर त्यावरुन रास काढता येते. जी रास येते त्या राशीचा जो स्वामी असेल त्याचे रत्न म्हणजे राशी रत्न. असंख्य ज्वेलर्स, रत्नशास्त्राचा अभ्यास नसलेले ज्योतिषी याच पद्धतीने आपल्याला रत्न सांगतात.ज्यांच्याकडे जन्म टिपण नाही, त्यांच्या नावाच्या आद्याक्षरावरून रास ठरवली जाते आणि मग त्या राशीस्वामीच रत्न तुम्हाला सर्सास सांगितलं जातं.
आपल्याकडे एकुण १२ राशी आहेत, आणि संपुर्ण जग हे या १२ राशींमध्ये विभागलेले आहे. अशावेळी एखाद्या राशीच्या सर्व व्यक्तींना एकसारख्या अडचणी असतील असे कसे म्हणता येईल. किंवा त्या सर्वांच्या अडचणींवर एकच उपाय असे कसे म्हणता येईल. एकाच राशीचे एखादे लहान मुलं असते ज्याला शारीरिक तसेच बौद्धिक प्रगती महत्वाची असते, त्याच राशीचे तरुण/तरुणी असतात ज्यांना विवाह/करिअर यांचे प्रश्न असतात. `त्याच राशीचे मध्यमवयीन असतात ज्यांना त्यांच्यावरील जबाबदाऱ्या यशस्वी पार पाडायच्या असतात. तर त्याच राशीचे वयोवृद्ध असतात ज्यांना आरोग्य आणि सुखी शेवट एवढेच ध्येय असते. मग अशावेळी या सर्वांना एकच राशी रत्न कसे उपयुक्त ठरु शकेल. 

एखाया व्यक्तीला कुठले रत्न उपयुक्त ठरेल हे ठरवताना त्या व्यक्तीच्या सद्य समस्या व उद्दिष्टे समजुन घेणे खुप महत्वाचे ठरते. त्या नंतर त्या समस्येचा कारक ग्रह जन्म कुंडलीमध्ये कसा आहे आणि गोचरीने कसा आहे याचा अभ्यास महत्वाचे ठरते. कारक ग्रहाची कुंडलीतील सद्य ग्रहदशांशी सांगड घालावी लागते. मग या सगळ्यातुन कुठला ग्रह सद्य परिस्थीला वरचढ आहे हे ठरवावे लागते. आणि त्यानुसार त्या व्यक्तीचे भाग्योदायी रत्न ठरते.
ज्या ग्रहाचे रत्न घालावयाचे आहे त्या ग्रहाचा सद्य ग्रहदशेशी काय संबंध आहे या वरुन ते रत्न घालावे कि नाही हे ठरवावे. जसे कि मंगळाच्या दशेमध्ये शुक्र, बुध अथवा शनिचे रत्न घालु नये. किंवा शनिच्या दशेमध्ये रविचे अथवा मंगळाचे रत्न घालु नये. या प्रमाणे प्रत्येक ग्रहाचे मित्र आणि शत्रु ग्रह पाहुन त्या काळात ते रत्न घालु नये. एखादा ग्रह जन्म कुंडलीमध्ये ६, ८, १२ स्थानामध्ये असेल तरी त्याचे रत्न घातले जात नाही. एखादा ग्रह वक्री असताना, अस्तंगत असताना, तसेच शत्रुगृही अथवा नीच राशीमध्ये असताना त्या काळापुरते त्याचे रत्न प्रभाव दाखवत नाही.

सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे कुठल्या ग्रहाचे रत्न घालावे - बलशाली कि बलहीन? या मुद्द्यावर मात्र सर्व ज्योतिषांमध्ये मतमतांतरे आहेत. मी माझे मत इथे मांडतो. मी कायम या मताचा राहिलो आहे कि जी आपली कमकुवत बाजु आहे तीची ताकद वाढवत बसण्यापेक्षा जी आपली सगळ्यात ताकदवर बाजु आहे तिची ताकद अधिक कशी वाढवता येईल, तिचा अधिकाधिक वापर कसा करता येईल, यावर जोर दिला पाहिजे. जसे कि आपल्याकडे एक कलाकार आहे जिने आयुष्यातले सर्व सरवोचच पुरस्कार मान सन्मान मिळवले आहेत, मात्र तिचा विवाह झालेला नाही किंवा तिला वैवाहिक आयुष्याचे सुख मिळालेले नाही. अशावेळी तिला वैवाहिक सुख मिळावे म्हणुन रत्न देण्यापेक्षा तिच्या करिअर मध्ये अजुन पुढे जाण्यासाठी एखादे रत्न तिला सुचवले तर ते जास्त फायदेशीर ठरेल. त्याचप्रमाणे आपल्याकडे एक क्रीडापटू आहे, त्यानेही आयुष्यातले सर्व सर्वोच्च पुरस्कार मिळवले आहेत. मात्र त्याचे शिक्षण जेमतेम दहावी झाले आहे. अशावेळी त्याला अजूनही शिक्षण पूर्ण करता यावे म्हणुन रत्न सुचवावे कि ज्या खेळामध्ये तो सक्रिय आहे, त्या खेळाला तो अधिक योगदान कसे देऊ शकेल यासाठी रत्न सुचवावे. त्यामुळे कुंडलीमध्ये जो ग्रह बलशाली आहे त्या ग्रहाचेच रत्न घालावयास हवे.

जाता जाता एक उदाहरण देतो. सोबत दिलेली कुंडली एका गृहिणीची असुन भविष्यात तिला घराच्या प्रगतीमध्ये हातभार लावायचा आहे. सध्या तिच्या कुंडलीमध्ये राहूची महादशा चालु असुन राहु मध्ये शनीची अंतर्दशा चालू आहे. तिच्या कुंडलीमध्ये शनि स्वगृही, राजयोगी, कर्मधर्म योगामध्ये कुंडलीमधील योगकारक ग्रह आहे. अशावेळी या व्यक्तीने शनीचे नीलम रत्न धारण केले असता राहूच्या अडथळ्यांच्या शर्यतीमध्येसुद्धा तिला यशाचा मार्ग सापडु शकेल. चंद्राच्या पंचमात शनि असल्याने मुलांच्या प्रगतीमध्येही ती योग्य हात लावु शकेल. तिच्या राशीचा विचार करता कन्या रास असुन राशिस्वामी बुध अष्टमात शत्रु नवमांशी आहे. अशावेळी राशीरत्न पाचु तिला अधिक अपायकारक ठरेल.

म्हणूनच थेट राशी रत्नाच्या आहारी न जाता, आपली कुंडली तपासुन त्या पद्धतीने खऱ्या अर्थाने भाग्योदायी रत्ना धारण करावे.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://bhagyankjyotishvvastushastrasalla.blogspot.in/

No comments:

Post a Comment