Tuesday, 14 March 2017

वास्तु आणि वस्तु ...


एखादी वास्तु पाहात असताना कोणती खोली कुठल्या दिशेला येत आहे,त्यातही विशेष करुन शयनगृह यांना महत्व दिले जाते. त्या पाठोपाठ प्रामुख्याने शौचालय व त्या खालोखाल न्हाणीघराची दिशा तपासली जाते . प्रवेशद्वारालाही अगदी अनन्य साधारण महत्व दिले जाते. पण वास्तुशास्त्र एवढ्यावरच सिमीत आहे का? तर निश्चितच नाही. या पुर्वीही अनेक लेखांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे पृथ्वीतलावरील प्रत्येक सजीव निर्जीव गोष्ट एक वास्तु आहे. आणि म्हणुनच नुसत्या खोल्या योग्य दिशेला येऊन उपयोगी नाही तर खोलीतील प्रत्येक वस्तुची रचना - योजना योग्य दिशेला असायला हवी.

आपण प्रवेशद्वारापासुन सुरवात करु. प्रवेशद्वारात मध्यावर अथवा उजव्या कोपऱ्यात रांगोळी हवी. चपलांचा स्टॅन्ड बाहेर करायचा असल्यास डाव्या भागात करावा. उंबरठ्यावर लक्ष्मीची आत येणारी पावले असावीत. प्रवेशद्वारावर प्रथम स्त्रीचे नाव व मग पुरुषाचे नाव असावे. चौकटीच्या वरती बाहेरील बाजुने श्री गणेशाचे चित्र असावे. दिवाणखान्यात आग्नेय कोपऱ्यात पूर्व भिंतीला टीव्ही असावा. मुख्य बैठक पश्चिमेला तर उप बैठक दक्षिणेला व उत्तरेला असावी. दिवाणखाना उत्तर, ईशान्य अथवा पुर्व भागात आला असल्यास जास्त वजनाचे फर्निचर करु नये. मात्र दक्षिण, नैऋत्य अथवा पश्चिम भागात आला असता अधिकाधिक फर्निचर करावे. फर्निचर नेहमी दक्षिण अथवा पश्चिम भिंतीला लागुन करावे. दिवाणखान्यामध्ये एखादा आरसा ठेवायचा असल्यास पूर्व अथवा उत्तर भिंतीला ठेवावा. देवाचा एखादा फोटो लावल्यास उत्तर भिंतीवर लावावा. टीपॉय अथवा टेबल अगदी मध्यात न ठेवता दक्षिण अथवा पश्चिम भागात ठेवावे.

स्वयंपाक घरात मुख्य ओटा शक्यतो पूर्व दिशेलाच असावा. नाहीच जमल्यास पश्चिमेकडे चालेल. दक्षिणेपेक्षा उत्तरेचा पर्याय अधिक सोयीस्कर. फ्रीज वगळता इतर इलेक्ट्रिक उपकरणांची रचना आग्न्येय भागात करावी. तर फ्रीजची रचना उत्तर वायव्य भागात करावी. धान्यांसाठीचा रॅक पश्चिम वायव्य भागात असावा. तर हाताला लागणाऱ्या भांड्यांचा रॅक पूर्व उत्तर भागात केलात तरी चालेल. माळा पूर्व अथवा उत्तर भागात आल्यास त्याचा कमीत कमी वापर करावा तसेच तो अधिकाधिक स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा. दक्षिण पश्चिम भागात आल्यास मात्र जुनी भांडी अथवा अडगळीचे सामान ठेवण्यास हरकत नाही. छोटा पाण्याचा पिंप/माठ ईशान्य भागात असावा. साठवण्याचे पाणी खुपच जास्त असल्यास दक्षिण भिंतीस ठेवावे.

शयनगृहाचा विचार अनेकार्थाने करावा लागतो. छोट्या घरांमध्ये शयनगृह हिच मुख्य खोली सुद्धा असते. शयनगृह कोणत्याही दिशेला येवो, पलंगाची योजना मात्र नैऋत्य भागात येईल असे पाहावे. झोपताना डोके दक्षिणेकडे तर पाय उत्तरेकडेच येतील याची काळजी घ्यावी. अपवादात्मक परिस्थितीत (हल्ली अपवादच जास्त झालेत) डोके पश्चिमेकडे तर पाय पूर्वेकडे यावेत. पैशाचे, दागदागिन्यांचे तसेच महत्वाच्या कागदपत्रांचे कपाट दक्षिण भिंतीला तर तोंड उत्तरेकडे घडाळ्याच्या विरुद्ध दिशेने उघडणारे हवे. त्यातच कपड्यांचे कपाट असल्यास हरकत नाही. मात्र कपड्यांचे स्वतंत्र कपाट करायचेच झाल्यास पश्चिम वायव्य भागात करावे. ड्रेसिंग टेबल विथ मिरर पूर्व भागात असावे. पलंगासमोर मात्र आरसा येणार नाही याची काळजी घ्यावी. माळ्यासाठी नियम तोच. दक्षिण पश्चिम भागात असल्यास अधिकाधिक सामान ठेवावे तर पूर्व उत्तर भागात असल्यास कमीत कमी सामान ठेवावे. शयनगृहात अभ्यासाचे अथवा कामकाजाचे टेबल करायचे असल्यास शक्यतो उत्तर भिंतीला त्या खालोखाल पूर्व भिंतीला करावे. शयनगृहात इलेक्ट्रॉनिक उपकरणे टाळावीत. असल्यास ती आग्न्येय भागात दक्षिण भिंतीला असावीत.

आपण सकाळी घरातुन ऊर्जा घेऊन बाहेर पडतो, या उर्जेतूनच दिवसभर बाहेर श्रम करतो व संध्याकाळी घरी परततो. घरी परतेपर्यंत आपल्यातली ऊर्जा गेलेली असते आणि आपल्याला ती पुन्हा हवी असते. हि ऊर्जा म्हणजे घरातला प्राणवायू, घरातले सकारात्मक वातावरण. हा प्राणवायु घरामध्ये टिकवुन ठेवण्यासाठी हि सकारात्मकता चिरकाल राहण्यासाठी घरामध्ये इलेकट्रीक उपकरणांचा वापर अत्यंत नियंत्रित असणे गरजेचे आहे. वापर झाल्यानंतर हि उपकरणे बंद करावीत. कारण या उपकरणांमधुन सातत्याने कार्बन बाहेर पडत असतो, जो घरातील प्राणवायूचे प्रमाण कमी करुन नकारात्मकता निर्माण करतो. वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक वस्तुची स्वतःची अशी दिशा आहे. हि दिशा बव्हंशी आकारमान, वस्तुमान तसेच वापर यावरुन ठरवली जाते. ती ती वस्तु त्या त्या दिशेत ठेवली असता ती दीर्घकाळ टिकुन त्याचा अधिकाधिक लाभ आपण घेऊ शकतो.


- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://bhagyankjyotishvvastushastrasalla.blogspot.in/

Monday, 6 March 2017

कुठल्या ग्रहाचे रत्न घालावे?


राशी रत्न हा शब्द आपण नेहमीच ऐकतो. आपल्याला आपले जन्म टिपण माहिती असेल तर त्यावरुन रास काढता येते. जी रास येते त्या राशीचा जो स्वामी असेल त्याचे रत्न म्हणजे राशी रत्न. असंख्य ज्वेलर्स, रत्नशास्त्राचा अभ्यास नसलेले ज्योतिषी याच पद्धतीने आपल्याला रत्न सांगतात.ज्यांच्याकडे जन्म टिपण नाही, त्यांच्या नावाच्या आद्याक्षरावरून रास ठरवली जाते आणि मग त्या राशीस्वामीच रत्न तुम्हाला सर्सास सांगितलं जातं.
आपल्याकडे एकुण १२ राशी आहेत, आणि संपुर्ण जग हे या १२ राशींमध्ये विभागलेले आहे. अशावेळी एखाद्या राशीच्या सर्व व्यक्तींना एकसारख्या अडचणी असतील असे कसे म्हणता येईल. किंवा त्या सर्वांच्या अडचणींवर एकच उपाय असे कसे म्हणता येईल. एकाच राशीचे एखादे लहान मुलं असते ज्याला शारीरिक तसेच बौद्धिक प्रगती महत्वाची असते, त्याच राशीचे तरुण/तरुणी असतात ज्यांना विवाह/करिअर यांचे प्रश्न असतात. `त्याच राशीचे मध्यमवयीन असतात ज्यांना त्यांच्यावरील जबाबदाऱ्या यशस्वी पार पाडायच्या असतात. तर त्याच राशीचे वयोवृद्ध असतात ज्यांना आरोग्य आणि सुखी शेवट एवढेच ध्येय असते. मग अशावेळी या सर्वांना एकच राशी रत्न कसे उपयुक्त ठरु शकेल. 

एखाया व्यक्तीला कुठले रत्न उपयुक्त ठरेल हे ठरवताना त्या व्यक्तीच्या सद्य समस्या व उद्दिष्टे समजुन घेणे खुप महत्वाचे ठरते. त्या नंतर त्या समस्येचा कारक ग्रह जन्म कुंडलीमध्ये कसा आहे आणि गोचरीने कसा आहे याचा अभ्यास महत्वाचे ठरते. कारक ग्रहाची कुंडलीतील सद्य ग्रहदशांशी सांगड घालावी लागते. मग या सगळ्यातुन कुठला ग्रह सद्य परिस्थीला वरचढ आहे हे ठरवावे लागते. आणि त्यानुसार त्या व्यक्तीचे भाग्योदायी रत्न ठरते.
ज्या ग्रहाचे रत्न घालावयाचे आहे त्या ग्रहाचा सद्य ग्रहदशेशी काय संबंध आहे या वरुन ते रत्न घालावे कि नाही हे ठरवावे. जसे कि मंगळाच्या दशेमध्ये शुक्र, बुध अथवा शनिचे रत्न घालु नये. किंवा शनिच्या दशेमध्ये रविचे अथवा मंगळाचे रत्न घालु नये. या प्रमाणे प्रत्येक ग्रहाचे मित्र आणि शत्रु ग्रह पाहुन त्या काळात ते रत्न घालु नये. एखादा ग्रह जन्म कुंडलीमध्ये ६, ८, १२ स्थानामध्ये असेल तरी त्याचे रत्न घातले जात नाही. एखादा ग्रह वक्री असताना, अस्तंगत असताना, तसेच शत्रुगृही अथवा नीच राशीमध्ये असताना त्या काळापुरते त्याचे रत्न प्रभाव दाखवत नाही.

सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे कुठल्या ग्रहाचे रत्न घालावे - बलशाली कि बलहीन? या मुद्द्यावर मात्र सर्व ज्योतिषांमध्ये मतमतांतरे आहेत. मी माझे मत इथे मांडतो. मी कायम या मताचा राहिलो आहे कि जी आपली कमकुवत बाजु आहे तीची ताकद वाढवत बसण्यापेक्षा जी आपली सगळ्यात ताकदवर बाजु आहे तिची ताकद अधिक कशी वाढवता येईल, तिचा अधिकाधिक वापर कसा करता येईल, यावर जोर दिला पाहिजे. जसे कि आपल्याकडे एक कलाकार आहे जिने आयुष्यातले सर्व सरवोचच पुरस्कार मान सन्मान मिळवले आहेत, मात्र तिचा विवाह झालेला नाही किंवा तिला वैवाहिक आयुष्याचे सुख मिळालेले नाही. अशावेळी तिला वैवाहिक सुख मिळावे म्हणुन रत्न देण्यापेक्षा तिच्या करिअर मध्ये अजुन पुढे जाण्यासाठी एखादे रत्न तिला सुचवले तर ते जास्त फायदेशीर ठरेल. त्याचप्रमाणे आपल्याकडे एक क्रीडापटू आहे, त्यानेही आयुष्यातले सर्व सर्वोच्च पुरस्कार मिळवले आहेत. मात्र त्याचे शिक्षण जेमतेम दहावी झाले आहे. अशावेळी त्याला अजूनही शिक्षण पूर्ण करता यावे म्हणुन रत्न सुचवावे कि ज्या खेळामध्ये तो सक्रिय आहे, त्या खेळाला तो अधिक योगदान कसे देऊ शकेल यासाठी रत्न सुचवावे. त्यामुळे कुंडलीमध्ये जो ग्रह बलशाली आहे त्या ग्रहाचेच रत्न घालावयास हवे.

जाता जाता एक उदाहरण देतो. सोबत दिलेली कुंडली एका गृहिणीची असुन भविष्यात तिला घराच्या प्रगतीमध्ये हातभार लावायचा आहे. सध्या तिच्या कुंडलीमध्ये राहूची महादशा चालु असुन राहु मध्ये शनीची अंतर्दशा चालू आहे. तिच्या कुंडलीमध्ये शनि स्वगृही, राजयोगी, कर्मधर्म योगामध्ये कुंडलीमधील योगकारक ग्रह आहे. अशावेळी या व्यक्तीने शनीचे नीलम रत्न धारण केले असता राहूच्या अडथळ्यांच्या शर्यतीमध्येसुद्धा तिला यशाचा मार्ग सापडु शकेल. चंद्राच्या पंचमात शनि असल्याने मुलांच्या प्रगतीमध्येही ती योग्य हात लावु शकेल. तिच्या राशीचा विचार करता कन्या रास असुन राशिस्वामी बुध अष्टमात शत्रु नवमांशी आहे. अशावेळी राशीरत्न पाचु तिला अधिक अपायकारक ठरेल.

म्हणूनच थेट राशी रत्नाच्या आहारी न जाता, आपली कुंडली तपासुन त्या पद्धतीने खऱ्या अर्थाने भाग्योदायी रत्ना धारण करावे.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://bhagyankjyotishvvastushastrasalla.blogspot.in/

औद्योगिक वास्तुशास्त्र - Industrial Vastushastra


औद्योगिक वास्तुशास्त्र म्हणजेच औद्योगिक जागेचे वास्तुशास्त्र. जेथे कच्च्या मालावर प्रक्रिया करुन नविन उत्पादन तयार केले जाते अशा जागेचे वास्तुशास्त्र. वास्तु मग ती कुठलीही असो, पंचमहाभुतांचे नियम तेच आणि तसेच असतात. फक्त त्यांचा वास्तुसापेक्ष विचार वेगळा केलेला असतो. घरामध्ये नैऋत्य भागामध्ये घराच्या मालकाचे शयनगृह - मुख्य शयनगृह करुन त्या दिशेचे जडत्व वाढवले जाते. कारखान्यामध्ये नैऋत्य भागात व्यवसायाच्या मालकाचे कार्यालय करुन अथवा तुलनेने अधिक वस्तुमान असलेलले यंत्र ठेवुन अथवा कच्चा माल ठेवुन त्या दिशेचे जडत्व वाढवले जाते. असे प्रत्येक दिशेविषयी स्वतंत्र सांगता येईल.
खरं तर औद्योगिक वास्तुशास्त्राविषयी या पुर्वीही लेख लिहिले आहेत. तरी पुन्हा लेख लिहिण्याची उठाठेव कशाला? खुपदा वास्तुशास्त्रातील काही बाबींविषयी सविस्तर लिहायचे राहुन जाते. नुकत्याच एका कारखान्याची वास्तु तपासण्याचा योग आला. त्यावेळी अशाच काही महत्वाच्या मुद्द्यांवर पुनर्भ्यास झाला. त्याविषयीचं हा लेख आहे.
कारखाना म्हणले कि अनेक छोटया-मोठ्या यंत्रांनी तो बनलेला असतो. अशा वेळी कार्यालयीन कामकाजासाठी तसेच मालकाच्या कामकाजासाठी कार्यालय कुठे करायचे असा प्रश्न पडतो. असे कार्यालयासाठी सर्वप्रथम दक्षिण दिशेला प्राधान्य द्यावे. दक्षिण मध्य भागात पण दक्षिण सीमेला लागुन असे कार्यालय केल्यास अधिक उत्तम. त्या खालोखाल पश्चिम मध्यम भागाला पश्चिम सीमेला लागुन कार्यालय करण्याला महत्व द्यावे. दक्षिण अथवा पश्चिम मध्य भागात न जमल्यास नैऋत्य भागात सीमारेषेच्या काहीसे पुढे असे कार्यालय करावे. कार्यालयातील विशेष करुन मालकाच्या जागेची रचना करताना मालकाला बसल्या जागेवरुन संपुर्ण कारखान्यावर नजर टाकता येईल असे पहावे. मालकाची पाठ दक्षिण अथवा पश्चिम दिशेला तर तोंड उत्तर अथवा पूर्व दिशेला यायला हवे. 

कारखान्यामध्ये वास्तुशास्त्राचे नियम लावत असताना उत्पादनाच्या प्रक्रियेचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. प्रत्येक यंत्राचे आकारमान व वस्तुमान विचारात घ्यायला हवे. काही यंत्रे आकारामानानी मोठी असतात पण वस्तुमान हलके असते, तर काही यंत्रे आकारमानाने अगदीच लहान असतात पण त्यांचे वस्तुमान अधिक असते. याचा एकत्रित मेळ उत्पादनाच्या प्रक्रियेशी लावुन यंत्रांची जागा निश्चित करावी. अग्नीशी संदर्भातील प्रक्रिया दक्षिण आग्नेय भागात व्हायला हवी. ज्वलनशील रासायनिक प्रक्रियाही दक्षिण आग्नेय भागात व्हायला हवी. वस्तुमान दक्षिणेकडुन पुर्वेकडे अथवा पश्चिमेकडून उत्तरेकडे कमी होत जाणारे हवे. मोठी यंत्रे ब्रह्मस्थानात येणार नाहीत याचा प्रयत्न असावा. याउलट तुलनेने लहान यंत्रे ब्रह्मस्थानात आली तर हरकत नाही. उत्पादनाची प्रक्रिया वायव्य भागात संपुन वायव्येला तयार उत्पादन बाहेर पडायला हवे. तयार उत्पादनाचा साठा प्राधान्याने पश्चिम उत्तर भागात असावा. त्या पुढे वाढत जाऊन उत्तर पश्चिम भागात न्यावा.
माननीय पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाने सर्वच प्रेरित झाले आहेत. हे अभियान कारखान्यापर्यंत यायला हवे. कारखाना नेहमीच नीटनेटका असावा. प्रत्येक वस्तु कामानंतर जागच्या जागी ठेवलेली असावी. आपल्यावर (आपल्या कारखान्यावर) श्री महालक्ष्मी देवीचा आशीर्वाद नेहमीच असावा असे वाटत असेल तर कारखान्यात कमालीची स्वच्छता ठेवायला हवी. पाण्याची तसेच विश्रांतीची व्यवस्था ईशान्य भागात असावी. कारखान्यामध्ये कुठल्याच धर्माचे उपासना मंदिर असु नये. करावयाचे झाल्यास ते ईशान्य भागात पण अगदीच छोटेखानी असावे.
।।अणुपासुनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे।। असे संतश्रेष्ठ समर्थ रामदासांचे वचन आहे. त्याप्रमाणे या जगातील प्रत्येक अणुरेणु एक वास्तु आहे. कारखाना हा त्यातीलच एक भाग आहे. आपल्या वास्तुत आपल्याला थांबावेसे काम करावेसे वाटले पाहिजे, आपल्या कामगाराला वाटले पाहिजे. जे उप्तादन आपण करु ते गुणवत्तेच्या बाबतीत श्रेष्ठ पाहिजे. तरच आपली प्रगती होऊ शकते. आणि म्हणुनच कारखान्याची रचना करताना औद्योगिक वास्तुशास्त्रालाही महत्व दिले पाहिजे.
सोबत नुकत्याच भेट दिलेल्या वास्तुची आम्ही केलेली रचना जोडत आहे. 

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://bhagyankjyotishvvastushastrasalla.blogspot.in/

प्रचिती रमल शास्त्राची ...



 ज्या प्रमाणे वैद्यकीय शाखा स्वतंत्र असल्या तरी रोगाचे निदान एकच होत असते, त्याच पद्धतीने ज्योतिषाच्या स्वतंत्र अनेक शाखा आहेत पण त्यातुन सांगितले जाणारे फलित एकच असते. किंबहुना मी सातत्याने मांडत आलो आहे, कि ज्योतिषाची विविध अंगे एकमेकांच्या हातात हात घालुन पुढे जात असतात. माझ्या ज्योतिष कार्यालयात जेव्हा एखादा जातक येतो, तेव्हा होराशास्त्रा बरोबरच रमल शास्त्राच्या माध्यमातुनही त्याची कुंडली मांडली जाते आणि भाकीत करत असताना या दोन्ही कुंडलीचा एकमेकांशी मेळ घातला जातो. काही वेळेस जन्म कुंडली आपल्याशी पटकन बोलत नाही. अशावेळी तिला बोलकं करायला प्रश्न कुंडली मदत करते.
अशाच एका जातकाची जन्म कुंडली, मार्गदर्शनाच्या वेळी मांडलेली प्रश्न कुंडली व रमल कुंडली सोबत जोडली आहे.
जन्म कुंडलीची सिद्धता जन्म कालीन आकाशस्थ ग्रह आणि त्यांचे पृथ्वी वरुन मांडलेले गणिती अवलोकन या पद्धतीने करता येते. प्रश्न कुंडलीची सिद्धताही सद्यकालीन आकाशस्थ ग्रह आणि त्यांचे पृथ्वी वरुन मांडलेले गणिती अवलोकन या पद्धतीने करता येते. रमल कुंडलीचे मात्र तसे नाही. फासे पद्धतीने अथवा चित्र पद्धतीने काही चिन्हे मांडली जातात. पुढे त्याचे असे एक सुत्र आहे, त्या सुत्राने कुंडली सोडवत जावे लागते. इथे या कुंडलीची येणारी प्रचिती, तंतोतंत येणारे भाकीत हिच सिद्धता आहे.
सोबत दिलेल्या जन्म कुंडली मध्ये लग्नेश रवि लाभात मिथुनेचा आर्द्रा नक्षत्री म्हणजेच राहुच्या नक्षत्री मकर नवमांशी म्हणजेच शनिच्या नवमांशी आहे. यामुळे लग्नेशाला बळ नाही. त्यातच भरीस भर तृतीयात शनि वक्री असुन वक्री मार्गाने त्याची तृतीय दृष्टी लग्न स्थानावर आली आहे. यामुळे लग्न स्थानालाही बळ नाही. 


आता आपण याच जातकाची रमल कुंडली पाहु.



रमल कुंडलीतील प्रथम स्थानात पुढील शकल आले आहे.

-
-

उकला असे या शकलाचे नाव असुन ते अति अशुभ शकल आहे.
याचाच अर्थ जन्म कुंडली व रमल कुंडली एकमेकांशी साधर्म्य ठेवते.
आणखी स्थाने पाहु. जन्म कुंडली मध्ये दशमेश शुक्र व्यय स्थानामध्ये आश्लेषा नक्षत्री आहे. आपण रमल कुंडलीमधील दशम स्थान पहाल तर इथे पुढील शकल आले आहे.

-

-
कब्जतुल असे या शकलाचे नाव असुन हे हि अति अशुभ नक्षत्र आहे.
आता याही पुढे जाऊन फलिताची प्रचिती पहा.
आपण जर प्रश्न कुंडली पाहिलीत तर दशमातच शुक्र मीनेचा उच्चीचा आला आहे. तर जन्म कुंडलीमध्ये शुक्र जरी व्ययात गेला असला तरी तो गुरुने दृष्ट आहे व चंद्राशी त्याची प्रतियुती आहे. चंद्र दशमात शनि उच्चीचा आहे (मात्र तो वक्री आहे).


जन्म कुंडली व प्रश्न कुंडली यांचा मेळ घालता दशमस्थानाचे सद्य भाकीत अगदीच अशुभ करणे योग्य ठरणार नाही. किंबहुना शुक्र मीनेत असे पर्यंत कामे मार्गी लागुन अडचणी सुटण्यास मदत होईल असेही भाकीत वर्तवता येईल. हेच फलित आपल्याला रमल कुंडलीमध्येही दिसुन येते. रमल कुंडलीमध्ये एखाद्या स्थानाचे भाकीत करताना त्या स्थानातील शकलाचा प्रथम स्थानातील शकलाशी गुणाकार करावा लागतो .
प्रथम स्थान x दशम स्थान = गुणाकार
० ० = -
- - = -
- ० = ०
० - = ०
गुणाकार करुन आलेल्या शकलाचे नाव नस्रतुल असुन हे अति शुभ शकल आहे.
या वरुनच प्रश्न कुंडलीतील ग्रहस्थिती व रमल कुंडलीतील ग्रहस्थिती ही एकमेकांशी साधर्म्य दाखवते.
असाच अभ्यास विवाह स्थानाविषयी सांगता येईल. या जातकाच्या करिअर मध्ये सध्या काही अडचणी चालु असुन त्यामुळे जातकाने विवाहाचा निर्णय लांबणीवर टाकला आहे.
इथे लग्न कुंडलीमध्ये सप्तम स्थानामध्ये कुंभ रास आली असुन सप्तमेश शनि तृतीयात म्हणजेच स्वस्थानापासुन भाग्यात उच्चीचा आहे. इथे तो वक्री असल्याने त्याच्या फलितामध्ये निश्चितच कमतरता आली आहे. सध्या जातकाची गुरुची महादशा चालु असुन त्यात शुक्र अंतर्दशा आहे. त्या नंतर येणाऱ्या रविच्या अंतर्दशेत जातकाचा विवाह होईल असे माझे फलित आहे. प्रश्न कुंडलीमध्ये सप्तमातच शनि धनु राशीचा आला आहे तर सप्तमेश गुरु चतुर्थात कन्येचा आहे. त्यामुळे तो शनि धनु राशीत असतानाच गुरु तुळ राशीत आला असता विवाह योग दर्शवतो.
आता रमल कुंडलीवरुन सप्तम स्थान तपासु. सप्तमात पुढील शकल आले आहे.
-


-
या शकलाचे नाव इज्जतमा असुन हे मध्यम शुभ आहे. जन्म कुंडलीतील विवाह स्थानाविषयी आपण वरती हेच म्हणले आहे. आता सप्तमातील शकलाचा प्रथम स्थानातील शकलाशी गुणाकार करु.
हे विश्लेषण प्रत्येक स्थानाविषयी करता येऊ शकते. इथे लग्न स्थान व दशम स्थान उदाहरणा दाखल घेतले आहे.
प्रथम स्थान x सप्तम स्थान = गुणाकार
० - = ०
- ० = ०
- ० = ०
० - = ०
गुणाकार करुन आलेल्या शकलाचे नाव तरीख असुन हे एक शुभ शकल आहे. पुन्हा एकदा रमल कुंडलीतील ग्रहस्थिती प्रश्न कुंडलीशी साधर्म्य दाखवते.
आपण इथे लग्न स्थान, विवाह स्थान, तसेच दशम स्थानाचा अभ्यास मांडला. या पद्धतीने प्रत्येक स्थानाचा स्वतंत्र अभ्यास सांगता येईल.
वरील अभ्यासातुन सर्वप्रथम ज्योतिष शास्त्राचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. दुसरा भाग असा कि जन्म कुंडलीबरोबर प्रश्न कुंडलीच्या अभ्यासाचे महत्व विशारद होते. आणि तिसरा व महत्वाचा भाग असा कि जरी आपल्याला आपले जन्म टिपण माहित नसले तरी रमल शास्त्राच्या आधारे आपले भविष्य वर्तवता येते.
टिप: ज्यांचा रमल शास्त्राचा अभ्यास असेल त्यांच्या लक्षात आले असेल कि सप्तम स्थान व प्रथम स्थानाचा गुणाकार करुन जे शकल आले ते 'कुंडलीत कुठेच दिसत नाही. हि कुंडली मांडताना जातकाने मनात फक्त करिअर संदर्भातला प्रश्न धरला होता. त्यामुळे या कुंडलीतून विवाहाचे उत्तर मिळु शकले नाही. 

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://bhagyankjyotishvvastushastrasalla.blogspot.in/