Saturday, 20 August 2016

चांडाळ योगाचा फेरा सुटला ...

चांडाळ योगाचा फेरा सुटला ...

१४ जुलै २०१५ ला गुरुने सिंह राशीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी ०९ जानेवारी २०१६ ला राहुने सिंह राशीमध्ये प्रवेश केला.

तेव्हा आदल्या दिवशीच गुरु सिंह राशीमध्ये २९ अंशावर वक्री झालेला. त्यामुळे राहु गुरुची थेट भेट होऊन चांडाळ योगाची सुरवात झाली. गुरुची गतिमानता राहुपेक्षा अधिक असल्याने तो वेगाने राहुच्या पुढे जात होता.

०९ मे ला गुरु मार्गी झाला. एकीकडे राहु त्याच्या वक्री गतीने पुढे सरकत होता तर गुरु मार्गी होऊन राहुकडे सरकत होता. वटपौर्णिमेला पुन्हा एकदा गुरु राहुची अंशात्मक युती झाली.

त्यानंतर मात्र गुरु व राहु एकमेकांशी पाठ करुन वेगवेगळ्या दिशेने वाटचाल करु लागले. आणि ११ ऑगस्टला गुरुने कन्या राशीत प्रवेश केला. 

गुरु हा नवनिर्मितीचा कारक असल्याने सर्वांनाच थोड्याफार फरकाने या योगाचा त्रास झाला. विशेषतः नव्या संधींचा शोध घेणाऱ्यांच्या हाती या काळात निराशा आली. बाहेर म्हणाव्या तशा संधी उपलब्ध होत नव्हत्या, आणि ज्यांना संधी मिळाल्या त्यांना त्यातुन समाधान मिळाले नाही.

वैवाहिक सौख्याच्या बाबतीतही अनेकांनी अनेक स्थित्यंतरे पहिली. काहींचे वाद तुटेपर्यंत ताणले गेले, काहींचे तुटता तुटता वाचले. विवाहयोगाला हा चांडाळ योग जरा अधिकच मारक ठरला.

तिसरा आणि अधिक महत्वाचा भाग म्हणजे संतती सुखाच्या दृष्टीने अनेक दाम्पत्यांची परीक्षाच या योगाने पाहिली.

आता मात्र गुरुने कन्या राशीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि गेले तब्बल सात महिने या चांडाळ योगाने निर्माण केलेली संभ्रमावस्था संपली. हा गुरु बदल काहींना मारक तर काहींना तारक ठरेल.  पण एक नक्की चांडाळ योगातुन नवनिर्मितीमध्ये आलेले अडथळे आता दुर होऊ लागले आहेत.

भारताच्या महिला खेळाडूंनी ऑलम्पिकमध्ये मिळवलेले विजय हे सुद्धा भारतीय क्रीडा विश्वात एका नव्या युगाची सुरवात करणारेच आहेत.

आपल्या कुंडलीतील नव्या संधींचा शोध घेण्यासाठी एकदा संपर्क नक्की करा ...

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ ।  info.bhagyank@gmail.com

Tuesday, 16 August 2016

आणि शनि मार्गी झाला ...

आणि शनि मार्गी झाला ... 



२५ मार्च २०१६ ला वृश्चिकेत वक्री झालेला शनि तब्बल साडेचार महिन्यांनी १३ ऑगस्ट २०१६ ला वृश्चिकेतच मार्गी झाला.

या काळात अनेक व्यक्तींना पराकोटीचा मनस्ताप, अडचणी व संकटे भोगावी लागली. विशेष करून ज्यांच्या कुंडलीत शनिची दशा चालु होती त्यांना याचा अधिक त्रास झाला. आत्ताही शनि वृश्चिकेतच असल्याने अडचणींची यात्रा संपली नसली तरी किमान तो मार्गी झाल्याने त्याची दाहकता निश्चितच कमी झाली आहे.

विशेष करून मेष व सिंह राशी पनौतीमधुन जात असुन शनि मार्गी झाल्याने किमान त्यांना मान वर काढता येईल.
गुरूच्या कन्या प्रवेशाने सिंहेला अडचणी मार्गी लागत असल्याचे एव्हाना संकेत मिळु लागले असतील. मात्र जानेवारीच्या शनि बदलानंतरच ते सुटकेचा निःश्वास टाकू शकतील.

मेषेला मात्र अडचणींची दाहकता कमी झाली असली तरी त्यात आरोग्याच्या तक्रारींची भर पडणार आहे.
तुळ राशीची लोकांनी आता तारखा मोजायला सुरवात करायला हरकत नाही. कारण साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात ते पोहचले आहेत. मात्र व्ययातला गुरु नव्या अडचणी निर्माण करू शकतो.

वृश्चिकेला शनि मार्गी झाल्याचा विशेष फरक पडणार नसला तरी गुरु बदल मात्र काहीसा दिलासा देणारा ठरेल.
धनु राशी साडेसातीच्या पहिल्या टप्प्यातून जात आहे. त्यात वक्री शनिने साडेसातीची पुरेपूर जाणीव करून दिला आहे. शनि मार्गी झाल्याने अडचणींमधून मार्ग सापडायला मदत होईल.

असेच काहीसे प्रत्येक राशी बाबतीत सांगता येईल. अर्थात हे विवेचन फक्त चंद्र राशीवरून असुन लग्न राशी, जन्म शनि, सद्य दशा यावरून फलितांमध्ये बदल होऊ शकतो.

अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करावा.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ । info.bhagyank@gmail.com

Friday, 5 August 2016

गुरूचा कन्या भ्रमणाचा मार्ग

गुरूचा कन्या भ्रमणाचा मार्ग


दाते पंचांगानुसार, श्रावण शुक्ल अष्टमी ११ ऑगस्ट २०१६ ला रात्री ०९।२९ ला गुरु कन्या राशीमध्ये प्रवेश करत आहे. ११ सप्टेंबर २०१७ गुरुचे कन्या राशीमधील भ्रमण संपेल. त्याचे कन्या राशींमधील भ्रमण पुढील प्रमाणे असेल.

कन्या राशीमध्ये एकूण तीन नक्षत्रे आहेत. उत्तरा नक्षत्राची तीन चरणे, हस्त नक्षत्राची चार चरणे, तर चित्रा नक्षत्राची दोन चरणे आहेत.

११ ऑगस्ट २०१६ ते २८ सप्टेंबर २०१६ या काळात गुरुचे उत्तरा नक्षत्राच्या तीन चरणांमधुन भ्रमण होईल.

२९ सप्टेंबर २०१६ ते ०५ डिसेंबर २०१६ या काळात हस्त नक्षत्रातून गुरु भ्रमण करणार आहे.

०६ डिसेंबर २०१६ ते १४ एप्रिल २०१७ गुरु चित्रा नक्षत्रात असेल. या काळात ०६ फेब्रुवारी २०१६ ला चित्रा नक्षत्रातच गुरु वक्री होईल.

१५ एप्रिल २०१७ ला गुरु वक्री मार्गाने हस्त नक्षत्रात प्रवेश करेल. ०८ जून २०१७ पर्यंत हस्त नक्षत्रात तो वक्री असेल.

०९ जून २०१७ ला गुरु मार्गी होईल.  तो हस्त नक्षत्रातच ०४ ऑगस्ट २०१७ पर्यंत असेल.

०५ ऑगस्टला २०१७ ला चित्रा नक्षत्रात गुरु प्रवेश करेल. तिथेच तो ११ सप्टेंबर २०१७ ला कन्या राशीतला प्रवास संपवेल.

या काळात ऑगस्ट २०१६ च्या शेवटास रवि, बुध व शुक्र यांबरोबर तो मार्ग क्रमण करेल.

नोव्हेंबरच्या उत्तरार्धात गुरु हर्षल प्रतियुती, तर गुरु मंगळाचा नवपंचम योग होईल.

गुरुचे हस्त नक्षत्रात वक्री भ्रमण चालु असतानाच मे महिन्याच्या पूर्वार्धात मंगळाशी त्याचा नवपंचम योग होईल, तर उत्तरार्धात शुक्राशी प्रतियुती होईल. 

गुरु हस्त नक्षत्रात मार्गी असताना जुलैच्या उत्तरार्धात त्याचा शुक्राशी नवपंचम योग होईल.

गुरुचे हे विविध योग जसे गोचर ग्रहांशी होणार आहेत, तसेच ते तुमच्या जन्मकुंडलीतील ग्रहांशीही होणार आहेत. गुरूचे कन्या राशीतील टप्प्याटप्प्याने होणारे मार्गक्रमण आणि या मार्गक्रमणाचा जन्मकुंडलीवर टप्प्या टप्प्याने होणारा प्रभाव याचा अभ्यास करून या काळात आपण आपला प्रवास ठरवला पाहिजे.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ ।  info.bhagyank@gmail.com

Tuesday, 2 August 2016

वेध गुरु बदलाचा


वेध गुरु बदलाचा

११ ऑगस्टला गुरु कन्या राशीमध्ये प्रवेश करत आहे. पुढील १३ महिने म्हणजे ११ सप्टेंबर २०१७ पर्यंत गुरु कन्या राशीत असणार आहे. सिंह राशीतील सिंहस्थ या धार्मिक पर्वानंतरचा होणारा हा गुरु बदल आहे. ग्रहांच्या गोचर भ्रमणाच्या फलितांचा सर्वसाधारण विचार हा जन्मराशीवरून केला जातो. जन्मकाली चंद्र ज्या राशीमध्ये स्थित असतो त्या राशीला चंद्ररास अथवा जन्मरास असे म्हणले जाते.

जन्मराशीपासून म्हणजेच जन्म चंद्रापासून एखादा ग्रह कितव्या राशीमध्ये आहे यावर त्याचे फलित अवलंबून असते. जसे कि सिंह राशीसाठी सिंहेमध्ये गुरु असताना तो शुभ फलदायी नव्हता. तोच गुरु कन्येत प्रवेश करता तो दुसरा गुरु होतो आणि सिंह राशीसाठी त्याच्या फलितांमध्ये बदल होतो. तर कर्क राशीसाठी धनस्थानी धनदायी असलेला गुरु कन्येत प्रवेश करता तृतीय स्थानी क्लेशकारक होतो. याच पद्धतीने गुरु बदलाचा वेगवेगळ्या राशीला वेगवेगळा प्रभाव अनुभवायला येईल.

दाते पंचांगकर्त्यांनी पंचांगामध्ये सुलभ असे राशीवरून शुभाशुभ पाहण्याचे कोष्टक उपलब्ध करून दिले आहे. त्यावरून या गोचर बदलांचा साधारण अंदाज आपण घेऊ शकतो.

सुक्ष्म फलिताचा विचार करताना मात्र जन्म गुरुशी चलित गुरुचे होणारे भ्रमण तपासणे महत्वाचे ठरते. तसेच जन्म गुरुचे कुंडलीतील कारकत्व तपासून त्या कारकत्वावर होणारा परिणाम अभ्यासणे महत्वाचे ठरते. गुरूच्या भ्रमणाचा जसा आपण चंद्र राशीवरून विचार करत आहोत, तसाच तो लग्नराशीवरून करावयास हवा. ग्रह एका राशीतून भ्रमण करीत असताना तीन नक्षत्रांमधून भ्रमण करत असतो. अशावेळी नक्षत्रनिहाय देखील त्याचे फलित बदलत असते.

निसर्गकुंडलीमध्ये गुरूला नवं निर्मितीचा कारक म्हणले असल्याने गुरु बदलातून निर्माण होणाऱ्या नव्या संधी, जुळणारी नवी नाती, जन्म घेणारे नवे जीव, हे सर्व जाणून घेण्यासाठी गुरु बदलाचा आपल्या जन्म कुंडलीवर होणारा परिणाम जाणून घेणे महत्वाचे ठरते.

हा अगदीच प्राथमिक लेख असून, या विषयीचे अधिक लिखाण येत्या काळात आपणास निश्चितच वाचावयास मिळेल.       

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ ।  info.bhagyank@gmail.com

शेतातील घर आणि वास्तुशास्त्र



शेतातील घर आणि वास्तुशास्त्र

या शनिवारी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे एका वास्तूला भेट देण्याचा योग आला. इथे वास्तूला म्हणणे तितके योग्य ठरणार नाही,कारण अद्याप वास्तू कागदावर देखील उभी नाही. श्रीगोंदा येथील एका शेतकऱ्याने शेतातच घर बांधण्याचे ठरवले आणि त्या घराची रचना वास्तुशास्त्रानुसार करण्यासाठी मला बोलावले.
त्यांची एकूण जागा आयताकृतीच होती पण काही ठिकाणी किंचित कललेली होती. त्यामुळे सगळ्यात पहिले त्यांना सांगितले कि कुंपण करताना मात्र आयताकृतीच केले जाईल याची काळजी घ्यावी. खूपदा आपण इंच इंच जागेसाठी भांडतो अर्थात ती कष्टाची असते म्हणूनच. पण नैऋत्य सारख्या दिशेमध्ये वास्तू पश्चिमेकडून आतमध्ये कलली असल्यास तो खूप मोठा वास्तुदोष मानला जातो तर ईशान्येला पूर्वेकडून आतमध्ये वास्तू कलली असल्यास ते शुभ मानले जाते. शक्यतो वास्तू आयताकृती अथवा चौरस असलेली उत्तम.

दुसरा तिथे मुख्य रस्ता वास्तू समोरच उत्तरेला होता. हे देखील एक शुभ चिन्हच आहे. खरं तर जातकाच्या तसेच त्याच्या घरच्यांच्या मनात पूर्वेला प्रवेश द्वार करावे असे होते. पूर्वेकडील द्वार अधिक शुभ असते अशी त्यांची धारणा होती. मात्र एकंदर वास्तूचा पसारा पाहिल्यावर आपण त्यांना सांगितले कि जर त्यांनी पूर्वेकडे प्रवेशद्वार केले तर त्यांना मोठी जागा रस्त्यासाठी सोडावी लागेल. तसेच उत्तरेकडे रस्ता असल्याने घरातून बाहेर पडताना डावीकडे बाहेर पडावे लागेल आणि मग गावाकडे जाण्यासाठी उजवीकडे वळावे लागेल. या उलट आम्ही उत्तरेकडे प्रवेशद्वार सांगितले. ते करताना शुभ पदांमध्ये प्रवेश द्वार येईल याचीही काळजी घेतली. यामुळे त्यांना जागातर कमी लागेलच पण घरातून सरळ बाहेर पडता येईल आणि मग गावाकडे जाण्यासाठी उजवीकडे वळता येईल. घरातून बाहेर पडताना शक्यतो आधी उजवीकडे वळावे.

शेतात घर बांधताना घर कुठे बांधावे आणि शेती कुठे करावी हा महत्वाचा प्रश्न असतो. हा निर्णय घेताना शेती कशाची आहे यावर निर्णय घ्यावा. जसे कि कोकण सारख्या भागात फळझाडांची शेती असता वास्तूत उंच झाडे दक्षिण पश्चिमेकडे सांगितल्याने नैऋत्य भागात आधी शेतीसाठी जागा सोडावी मग वास्तूचे बांधकाम करावे. या उलट देशावर भाजीपाला-धान्य यांची शेती होते, अशावेळी पूर्वभागात शेती करावी तर पश्चिमेकडे घराचे बांधकाम करावे. सोबत दिलेल्या चित्रात शेतीसाठीची जागा कमी दिसत असली तरी ती पुढे खूप आहे. वास्तू स्पष्ट दाखवता यावी यासाठी शेती छोटी दाखवली आहे.

मोकळ्या जागेत घर बांधताना जास्तीजास्त वास्तुशास्त्राचे नियम पाळावेत. आपल्याकडे ब्रह्मस्थानावर बांधकाम करू नये असे सांगितले आहे. हा नियम पूर्वीसारखा एखादा वाडा बांधायचा असल्यास शक्य आहे. अथवा तसे ते पूर्णपणे शक्य नाही. अशावेळी ब्रह्मस्थानात खांब येणार नाही याची फक्त काळजी घ्यावी. तसेच एखादी जड वस्तू अथवा सामान ब्रह्मस्थानात ठेवली जाणार नाही याची काळजी घ्यावी.

जिन्या विषयी आपल्याकडे मुख्य नियम चढा विषयी आहे. तो पूर्वेकडून पश्चिमेकडे अथवा उत्तरेकडून दक्षिणेकडे असावा. जीना हा पश्चिमेकडे अथवा दक्षिणेकडे असावा असा नियम असला तरी त्याचे स्थान मात्र एकंदर वास्तूच्या पसाऱ्यावरून ठरवावे. जसे कि इथे मी वायव्य भागात पश्चिमेकडे जिना सांगितला आहे.

इतर नियम नेहमीचेच पाळले असल्यामुळे त्यांचा उहापोह इथे करत नाही. वरील मुद्द्यांचा समारोप करायचा झाला तर जसे ज्योतिषशास्त्रात नियमांचा अर्थ लावताना व्यक्ती सापेक्ष विचार करावा लागतो. तसेच वास्तुशास्त्रामध्ये नियमांचा अर्थ लावताना वास्तुसापेक्ष निर्णय घेणे गरजेचे आहे. आणि यासाठी वास्तुतज्ञाने आपली विषयाची प्रगल्भता वाढवली पाहिजे.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
८९७५३१२०५९ । info.bhagyank@gmail.com