Friday, 25 August 2017

राहु केतु दशा विचार

राहु केतु विषयी समाजात नेहमीच भीती राहिली आहे. हे पाप ग्रह असुन त्यांचा भ्रमणाचा मार्ग नागमोडी वळणाचा आहे. त्यामुळे त्यांच्यापासुन मिळणारी फले हि संमिश्र स्वरुपाचीच असतात. या ग्रहांच्या दशांविषयीही अनेक समज गैरसमज आहेत. या ग्रहांच्या दशा नेहमीच वाईट असतात असे नाही. त्यांच्या कुंडलीतील स्थितीवर त्यांच्या दशांचे फलित अवलंबुन असते.
सर्वप्रथम आपल्या कुंडलीमध्ये लग्नस्थानी कोणती रास आहे हे पहावे. बुध (मिथुन व कन्या), शुक्र (वृषभ व तुळ) व शनि (मकर व कुंभ) या ग्रहांच्या लग्नाला राहु केतुच्या दशा शुभ फलदायी जातात. गुरुचे (धनु व मीन) लग्न असता संमिश्र फलदायी जाई. चंद्र (कर्क), रवि (सिंह) व मंगळ (मेष व वृश्चिक) या ग्रहांच्या लग्नाला या दशा अशुभ फलदायी जातात.
एवढ्यावरच निर्णय घेता आला असता तर ते ज्योतिष शास्त्र कुठले? या नंतर आपल्याला तपासायचे आहे कि आपल्या जन्म कुंडलीमध्ये कोणत्या राशीमध्ये तसेच कोणत्या स्थानामध्ये राहु केतु स्थित आहेत.
हे ग्रह स्वक्षेत्री (राहु कन्येमध्ये तर केतु मीनेमध्ये) अथवा उच्च क्षेत्री (राहु मिथुनेमध्ये तर केतु धनुमध्ये) असता यांच्या दशा शुभ फलदायी जातात. आपल्या प्रश्नाचे जे कारक स्थान आहे, जन्म कुंडलीमध्ये त्या स्थानी जी रास आली असेल त्या राशीच्या स्वामीशी हे ग्रह काय योग करतात ते पहावे. वरील स्थिती असताना हे ग्रह शुभ योग करत असतील तर आपल्या प्रश्नासंदर्भात शुभ फले मिळतील. अशुभ योग करत असतील तर मात्र आपल्या प्रश्नासंदर्भात अशुभ फले मिळतील.
जन्मकुंडलीमध्ये जन्माच्या वेळी चंद्र राहुच्या/केतुच्या नक्षत्री (आर्द्रा, स्वाती, शततारका राहु तर अश्विनी, मघा, मुळ केतु) असता जन्मतः त्यांची महादशा असते. अथवा राहुची महादशा मंगळा नंतर तर केतुची महादशा बुधाच्या नंतर येते. हाच नियम अंतर्दशा व विदशांना लागु आहे. राहुची महादशा १८ वर्षे तर केतुची महादशा सात वर्षे असते.
अंतर्दशांचा विचार करता रवि, चंद्र व मंगळाच्या महादशेमध्ये राहु/केतुच्या अंतर्दशा अशुभ फलदायी जातात. बुध, गुरुच्या महादशेमध्ये संमिश्र तर शुक्र, शनि तसेच स्वतःच्या महदशेमध्ये शुभ फलदायी जातात. राहु/केतुच्या महादशेमधीलही रवि, चंद्राची अंतर्दशा अशुभ फलदायी, मंगळाची ठीक, तर बाकी सर्व ग्रहांच्या शुभ फलदायी जातात.
राहु केतुच्या दशा तरुण वयात येणे कधीही चांगले असे माझे मत आहे. कारण तेव्हा परिस्थितीशी दोन हात करायची माणसाची मानसिक तयारी असते. तसेच अपयशातुन खुप काही शिकायला तर मिळतेच मिळते पण पुन्हा उभे राहण्यासाठी कालावधीही असतो. मनुष्य राव असो कि रंक, त्याला प्रत्येक महादशा भोगावी लागते. अशावेळी आपल्या जन्म कुंडलीमध्ये कोणत्या ग्रहाची महादशा चालु आहे हे तपासुन कार्याचे नियोजन केल्यास आपण समाधानाने नक्कीच जगु शकतो.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://bhagyankjyotishvvastushastrasalla.blogspot.in/

No comments:

Post a Comment