सध्या आपले समाज जीवन मोठया प्रमाणात बिघडत चालले आहे. विशेषतः कुटुंब
संस्थेवर याचा खुप मोठा परिणाम होत आहे. आपले कामकाजाचे जीवन अधिकाधिक
गतिमान होत आहे, नवनविन तंत्रज्ञान दररोज आपल्या समोर येत आहे आणि यातुन
आपली निर्णय क्षमताही गतिमान होत आहे. हि कामकाजाच्या ठिकाणी असलेली
निर्णयांची गतिमानता आपल्या वैयक्तिक आयुष्यातही डोकावत आहे. आणि त्यातुन
वेळ घेऊन घ्यावयाचे निर्णय, विचार करुन घ्यावयाचे निर्णय, चर्चा करुन
घ्यावयाचे निर्णय आपण एखादा व्यावहारिक गुंता सोडवल्यासारखे चुटकीसरशी घेत
आहोत. त्याचा भविष्यात स्वतःवर, समोरच्यावर, कुटुंबावर आणि समाजावर
होणाऱ्या परिणामांचा जराही विचार न करता आपण हे निर्णय घेत आहोत. या
निर्णयांपैकी सगळ्यात मोठा परिणाम करणारा निर्णय कुठला असेल तर तो पती
पत्नींनी वेगळं होण्याचा - घटस्फोट घेण्याचा निर्णय.
सध्या
घटस्फोटाचा कालावधी अवघ्या काही महिन्यांचा झाला आहे. आपण अशी अनेक उदाहरणे
आजुबाजुला पाहिली असतील ज्यात विवाहानंतर अवघ्या काही दिवसांत मुलगी
माहेरी परत येते. नंतर काही काळ अबोला वादविवाद आणि मग थेट घटस्फोटाचा
निर्णय. त्यानंतर काही महिने काही वर्ष चालणारी घटस्फोटाची केस, दावे
प्रतिदावे आणि शेवटी तडजोड करुन विभक्त होणे. यानंतर तो त्याच्या वाटेला ती
तिच्या वाटेला. वय पुढे निघुन गेलेले असते. यामुळे दुसरा जोडीदार शोधताना
अधिक अडथळे येतात. काहीवेळेस अपेक्षांना मुरड घालावी लागते. काहींच्या
बाबतीत आधीचे बरे होते अशीही परिस्थिती येते. दुसऱ्या विवाहात तरी सुख
मिळेल याची शाश्वती नाहीच. आपणच आपल्या आयुष्याशी पुन्हा एकदा जुगार खेळुन
बघायचा एवढच. काहींचा तर दुसरा विवाह देखील होत नाही आणि मग उरलेले आयुष्य
एकटेच जगण्याची परिस्थिती येते. आणि हो ... या सगळ्याचा परिणाम करिअरवर
होतो तो वेगळाच. काहीजण तर करिअरमुळे वेगळे होण्याचा निर्णय घेतात आणि
मानसिक ताणतणावातून करिअरवरच परिणाम करुन बसतात.
अशा वेगवेगळ्या
उदाहरणांशी एक ज्योतिषी म्हणुन माझा संपर्क येत असतो. जेव्हा या जातकांच्या
कुंडल्या अभ्यासतो, त्यातली ग्रहस्थिती समोर येते, तेव्हा एकच प्रश्न
मनामध्ये येतो - घटस्फोटाची घाई कशाला?
आपली जन्म कुंडली चंद्र,
रवि, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहु-केतु, हर्षल, नेपच्युन व प्लुटो या
ग्रहांनी भरलेली असते. बारा भाव, बारा राशी व सत्तावीस नक्षत्रांतुन या
ग्रहांच्या होणाऱ्या भ्रमणावर आपल्या प्रत्येकाचे आयुष्य ठरलेले आहे. या
प्रत्येक ग्रहस्थितीतुन थोड्याफार फरकाने प्रत्येकाला जायचे आहे. फरक इतकाच
आहे, कि प्रत्येकाच्या आयुष्यात या ग्रहयोगांचा येणारा कालावधी वेगवेगळा
आहे. आणि हा कालावधी समजुन आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा आपला प्रवास
समाधानी होतो. मग विवाहसुखाचा विचार करत असताना, विवाहसुखाचाही एक कालावधी
आहे. ते कसे व किती मिळणार याचेही एक गणित आहे. आणि ते समजुन घेणे खुप
गरजेचे आहे.
आपल्या जन्म कुंडलीमधील सप्तम स्थान हे विवाहाचे मुख्य
कारक स्थान आहे. त्यामुळे सप्तमातील रास, त्या राशीचा स्वामी,
राशिस्वामीची कुंडलीतील तसेच गोचर स्थिती, जन्म कुंडलीतील सप्तमातील ग्रह
तसेच गोचरीने सप्तमातुन जाणारे ग्रह, सप्तमाला व सप्तमेशाला पाहणारे ग्रह
हे आपल्या विवाहाविषयी बोलतात. शुक्र या ग्रहाकडे विवाहाचे मुख्य कारकत्व
दिलेले आहे. त्या जोडीला स्त्री कुंडलीमध्ये चंद्र, रवि तर पुरुष
कुंडलीमध्ये चंद्र, गुरु यांची स्थितीही महत्वाची ठरते. कुठलीही जन्म
कुंडली अभ्यासताना लग्न व लग्नेशाला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे
त्यांची कुंडलीतील स्थितीही वैवाहिक सुखाविषयी बोलत असते. सप्तमाचे सप्तम
म्हणुनही लग्न स्थानाला महत्व आहे. जन्म कुंडलीतील द्वितीय स्थानावरुन
कुटुंबाचा विचार केला जातो. अष्टम स्थान हे सप्तमाचे धन स्थान आहे. भाग्य
स्थान हे धर्म त्रिकोणाचा भाग आहे. लाभ स्थान हे इच्छापुर्ती स्थान असुन ते
मित्रांचेही स्थान आहे. त्यामुळे वैवाहिक सुखाचा विचार करताना या
स्थानांचाही विचार करणे महत्वाचे ठरते. लग्न कुंडली इतकेच महत्व चंद्र
कुंडली व नवमांश कुंडलीलाही आहे. त्यामुळे चंद्राचे सप्तम सप्तमेश
अभ्यासणेही महत्वाचे ठरते.
हा झाला जन्म स्थित ग्रहांचा विचार.
कुठलाही ग्रह त्याच्या महादशेत, अंतर्दशेत अथवा विदशेमध्ये फलित देत असतो.
तसेच त्या ग्रहाचा ज्या ग्रहांशी योग होतो त्या ग्रहांच्या दशेमध्येही तो
फलित देत असतो. अशावेळी कुंडलीमधील शुभ अथवा अशुभ योग हे त्या त्या
ग्रहांच्या दशेत फलित देत असतात. जसा दशांचा विचार आहे, तसाच गोचर
भ्रमणाचाही. ज्या स्थानाचा आपण विचार करत आहोत त्या स्थानाच्या स्वामीची
गोचर स्थिती तसेच स्थानातुन गोचर भ्रमण करणाऱ्या ग्रहाच्या गोचर स्थितीवरही
त्याचे फलित अवलंबुन असते. विवाहसुखाचा विचार करत असताना याचाच विचार करणे
अधिक महत्वाचे ठरते.
विवाह झाल्यानंतर जेव्हा एक मुलगी एका नविन
कुटुंबामध्ये प्रवेश करते तेव्हा तिला त्या कुटुंबाशी जुळवुन घ्यायला तसेच
त्या कुटुंबाला तिच्याशी जुळवुन घ्यायला निश्चितच काही कालावधी जावा लागतो.
हा कालावधी व्यक्ती सापेक्ष असु शकतो. परंतु या कालावधीमध्ये आपल्या अथवा
कुटुंबियांच्या कुंडलीमध्ये काय ग्रहस्थिती चालु आहे, यावर आपले
त्यांच्याशी जुळणे न जुळणे हे अवलंबुन असते. आपल्या कुंडलीमध्ये अगदी
राजयोगी स्थिती असली तरी ज्यांच्याशी आपल्याला जुळवुन घ्यायचे आहे
त्यांच्या कुंडलीमध्ये याला पूरक अशी शुभ ग्रहस्थिती असणे गरजेचे आहे.
तेव्हाच जाउन एखादे नाते जुळते पक्के होते. स्पंदने जुळणे वगैरे काय ते
म्हणतात ते हेच असावे. अशावेळी जर एकमेकांच्या कुंडलीमध्ये एकमेकांना पूरक
अशी ग्रहस्थिती नसेल तर हि नाती जुळण्यामध्ये अडथळे येतात. यातुनच समज
गैरसमज, मतभेद होणे, वादविवाद होणे हे सुरु होते. हे जर विवाहाच्या
सुरवातीच्या कालावधीत घडले तर मग असे नातेपुढे जाण्यात अडथळे निर्माण होऊन
त्याचे पर्यवसान विभक्त होण्या पर्यंत जाते.
इथे ज्योतिष
शास्त्राची / ज्योतिषाची भुमिका महत्वाची ठरते. सप्तमात राहु केतु आहे,
किंवा सप्तमेश अष्टमात आहे, किंवा सप्तमेश द्वितीयात आहे म्हणुन थेट
घटस्फोटाचे भाकीत करणारे अनेक ज्योतिषी मी पहिले आहेत. सप्तमेश द्वितीयात
जाता पुढचा मागचा काही विचार न करता द्विभार्या योग सांगणारे अनेक योगी
आहेत. मंगळदोषाची तर कथाच वेगळी. परंतु असे सांगणे माझ्यामते चुकीचे आहे.
कुठलीच ग्रहस्थिती कायम नसते हे सर्वांनीच लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आणि
जसे आपण वर्षातुन चार महिने उन्हाळा सहन करतो, पावसाळा सहन करतो, थंडी सहन
करतो, त्याच प्रमाणे कुंडलीतील शुभ अथवा अशुभ ग्रहस्थितीलाही सामोरे जाणे
गरजेचे आहे. कारण उन्हाने तापलेल्या जमिनीला जसे पावसाचे थेंब गारव्याचा
शिडकावा करतात तसेच अशुभ ग्रहस्थिती नंतर येणारी शुभ ग्रहस्थिती आपल्याला
पुन्हा एकदा आनंदामध्ये चिंब भिजवते. फक्त त्यासाठी अशुभ ग्रहस्थितीच्या
उन्हाळ्यामधुन जाणे गरजेचे राहते.
मुख्यत्वे करुन सप्तमेशाच्या
गोचर भ्रमणाप्रमाणे आपल्या वैवाहिक आयुष्यात बदल होत राहतात. मग चंद्र दर
सव्वा दोन दिवसांनी आपली रास बदलत असतो. अशावेळी ज्यांच्या सप्तमात कर्क
रास असेल त्यांना प्रत्येक दिवस वेगळा वाटेल. तर शनिला एक रास बदलायला अडीच
वर्ष लागतात. ज्यांच्या कुंडलीमध्ये सप्तमात मकर किंवा कुंभ रास आहे,
त्यांना जी जी अडीच वर्षे शनि स्व अथवा उच्च अथवा मित्र राशीमध्ये असेल ती
ती अडीच वर्ष शुभ ठरतील तर शत्रु अथवा नीच राशीमध्ये असता अशुभ ठरतील. हाच
भाग ग्रह दशांचाही आहे. शुक्राची दशा सर्वाधिक म्हणजे तब्बल वीस वर्षांची
असते. असा हा शुक्र कुंडलीमध्ये वैवाहिक सुखाच्या दृष्टीने शुभ असता हि वीस
वर्ष परमानंदाची ठरतील तर अशुभ स्थितीत असता या उलट अनुभव येईल. त्यामुळे
जेव्हा जेव्हा आपल्या वैवाहिक आयुष्यामध्ये कटुतेचे, वादविवादाचे,
असमाधानाचे क्षण येतात तेव्हा तेव्हा समजुन चालावे कि आपली ग्रहस्थिती
काहीशी बिघडली आहे. पण त्याच वेळी मनाला हे हि ठाम पणे सांगावे हि
ग्रहस्थितीही बदलणार आहे. तेव्हा त्यासाठी वाट पहायलाच हवी.
घटस्फोटाकडे जाणारी अनेक प्रकरणे या पद्धतीचे मार्गदर्शन करुन आम्ही परतवली
आहेत. व आज ते ते जातक आपापल्या आयुष्यात सुखीही आहेत. असेच नुकतेच समोर
आलेले उदाहरण सोबत देत आहे. हि स्त्री जातकाची कुंडली असुन विवाहानंतर
अवघ्या काही महिन्यातच सासरच्यांशी पटत नाही, विशेषतः नवऱ्याशी पटत नाही
म्हणुन जातक घरी परत आली. त्यानंतर तीने व तिच्या घरच्यांनी घटस्फोट
घ्यायचे निश्चित केले. त्यानंतर तशी केसही कोर्टात सुरु झाली. मात्र
तारखांवर तारखा पडत होत्या पण हाती काहीच लागत नव्हते. अशावेळी हि जातक
तिची कुंडली घेउन माझ्याकडे आली. मी कुंडली पाहता क्षणीच हि कुंडली
घटस्फोटाची नसुन त्वरित केस मागे घ्यावी असे सांगितले. तीच्या कुंडलीमध्ये
गुरु महादशेमध्ये शनिची दशा चालु होती. तर शनि गोचरीने लग्नी शत्रु
राशीमध्ये होता. तीला नवऱ्याशी मोकळे पणाने चर्चा करुन सासरी परत जाण्यास
सांगितले. जानेवारीत शनि बदलानंतर शनिचे जन्म शनि वरुन भ्रमण सुरु होईल.
त्यानंतर वैवाहिक सुखातील अडथळे कमी होऊ लागतील. तर शनि नंतर येणारी बुधाची
अंतर्दशा वैवाहिक जीवन मार्गी करेल असे सांगितले. जातकाच्या कुंडलीमध्ये
बुध व शुक्र राशींमधून तर मंगळ व शुक्र नवमांशातुन परिवर्तन या
राजयोगामध्ये आहेत. भाग्येश चंद्र सप्तमात उच्चीचा राजयोगी आहे हि
कुंडलीमध्ये सर्वात जमेची बाजु आहे. तसेच लाभेश बुधाचे सप्तमात असणेही
महत्वाचे आहे. गुरु षष्ठात मेषेचा अस्तंगत आहे, त्यामुळे त्याचा फारसा
प्रभाव नाही. शनि कुटुंब स्थानातच वक्री आहे. सध्या हि जातक सासरी सुखात
असुन तसा तीचा नुकताच फोनही आला होता. आणि खर तर म्हणुनच हा लेख लिहावयाचे
प्रयोजन केले.
माझे सर्वच नवविवाहितांना हे सांगणे आहे कि आपल्या
वैवाहिक सुखात जरी काही अडथळे आले तरी लगेच विभक्त होण्याचा घटस्फोट
घेण्याचा निर्णय घाई घाईने घेऊ नये. कारण घटस्फोटाने जोडीदार बदलायची संधी
मिळु शकते, ग्रहस्थिती बदलायची नाही. असा कोणताही निर्णय घेण्यापुर्वी तज्ञ
ज्योतिषांकडे एकदा तरी आपली कुंडली दाखवावी व मगच पुढील वाटचाल करावी.
- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com |
https://bhagyankjyotishvvastushastrasalla.blogspot.in/