दहावी - बारावीच्या परीक्षा
अगदीच उद्यावर आल्या आहेत. तर शालेय तसेच उच्च माध्यमिक परीक्षांचे आता वेध
लागु लागतील. वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक कार्यासाठी दिशांचा स्वतंत्र
अभ्यास उपलब्ध आहे. प्रत्येक दिशेचे स्वतःचे असे महत्व आहे आणि ते ओळखुन
त्या त्या दिशेचा वापर केला तर यश निश्चित आहे. ईशान्य दिशेविषयी यापुर्वी
मी स्वतंत्र लेख लिहिला आहे. त्यात नव संकल्पांची दिशा असे वर्णन करत
असतानाच अभ्यासाविषयीच या दिशेचं महत्वही विशद केलं आहे. त्याचा स्वतंत्र अभ्यास आपण पुढे वाचु.
अभ्यासाची खोली म्हणल्या नंतर दोन गोष्टी प्रकर्षाने हव्यात. एक म्हणजे
खेळती हवा आणि दुसरं म्हणजे भरपुर प्रकाश. अभ्यास हि सुद्धा एक साधना असुन
तो करत असताना शांत व प्रसन्न वातावरण पाहिजे. अभ्यास हा शरीरामध्ये
ऊर्जेच्या रुपाने स्थिर होत असतो. असावेळी जिथे बसुन आपण अभ्यास करतो तिथे
भरपुर पण सकारात्मक ऊर्जा हवी. अगदी मंत्रांचा गजर नसला तरी चालेल पण शुभ
शब्दांचा उच्चार हवा. अपशब्दांचा वावर जवळपासही नको. टीव्ही अथवा
मनोरंजनाची इतर साधने नकोत. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर जरुर असावा, मात्र
गरजे पुरताच. आणि वापर झाल्या झाल्या हि उपकरणे बंद करुन ठेवावीत. कारण
यातुन बाहेर पडणारा कार्बन खोलीतील वातावरण नकारात्मक करतो. वर म्हणाल्या
प्रमाणे हवा खेळती हवी असल्याने खिडक्या सातत्याने उघड्या असाव्यात. पडदे
लावल्यास फिक्या रंगाचे लावावेत. भिंतींनाही फिके रंग वापरावेत. निळ्या व
पिवळ्या रंगाचा वापर शुभत्व वाढवणारे ठरेल. लाल रंगाचा वापर करण्यास हरकत
नाही मात्र तो अधिक गडद नसावा.
आता अभ्यासाची खोली/जागा कुठे
असावी? हि खोली ईशान्य भागात असावी. जिथे स्वतंत्र खोली करणे शक्य नाही
तिथे अभ्यासासाठी एकुण घराचा ईशान्य भाग निवडावा. जिथे तेही शक्य नाही तिथे
किमान जी खोली अभ्यासासाठी निवडणार आहे, त्या खोलीच्या ईशान्य भागात
अभ्यासाला बसावे. अभ्यासाला बसताना पाठ पश्चिमेकडे तर तोंड पुर्वेकडे
करावे. स्वतंत्र अभ्यासाची खोली असल्यास पश्चिम भिंतीला पाठ टेकवावी.
स्वतंत्र खोली नसल्यास मात्र ईशान्य भागातच बसावे. इथे पाठ पश्चिम भिंतीला
येणार नाही. मात्र तोंड पुर्वेकडेच राहील. अभ्यासाची पुस्तकांचा रॅक
केल्यास तोही पश्चिम/दक्षिण भिंतीला असावा. बीमच्या अथवा कपाटाच्या खाली
बसुन अभ्यास करु नये. अनेकदा अभ्यासाच्या टेबलच्या वरती पुस्तकांचे कपाट
असते. या कपाटाची रुंदी ठरवताना अभ्यास करताना डोकं कपाटा खाली येणार नाही
याची काळजी घ्यावी.
विद्यार्थ्यांनी प्रत्यके वेळी अभ्यासाला
बसताना गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे तर दिवसातुन एकदा (विशेष करुन
संध्याकाळी) रामरक्षा म्हणावी.
यातील सर्वच नियमांचा वापर करता येईल असे नाही. मात्र अधिकाधिक नियमांचा वापर करण्याचा प्रयत्न जरुर करावा.
- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७ | info.bhagyank@gmail.com