Wednesday, 20 December 2017

नवमांशाचे महत्व




एखाद्या जातकाची कुंडली अभ्यासत असताना सर्व प्रथम लग्न कुंडली महत्वाची असते खालोखाल महत्व येते ते चंद्र कुंडलीचे. आणि त्या नंतर महत्वाची ठरते ती नवमांश कुंडली. या तीनही कुंडल्यांचा सखोल अभ्यास केल्याशिवाय फलित सांगणे चुकीचे ठरेल.

आपण आधी जाणुन घेऊ यात कि नवमांश म्हणजे काय? आपल्या पृथ्वीला केंद्र स्थानी धरुन आपण इतर ग्रहांचा, चंद्र या उपग्रहाचा रवि या ताऱ्याचा विचार करतो. वर्तुळाचे ३६० अंश असतात. या अशांना आपण १२ राशींमध्ये समसमान वाटले आहे. प्रत्येक राशीच्या वाट्याला ३० अंश येतात. या तीस अशांना पुन्हा एकदा नऊ अंशांमध्ये विभागले जाते. याला नवमांश असे म्हणले जाते. प्रत्येक नवमांशाच्या वाटेला अंश २० कला येतात. एका नक्षत्रामध्ये चार नवमांश असतात. या नवमांशाना १२ राशींचाच संबंध जोडला आहे. मेष राशीतील पहिला नवमांश मेषेचा असे सुरवात करुन मीन राशीतील शेवटचा नवमांश मीनेचा असा हा प्रवास आहे.

हि नवमांश कुंडली बनविण्यासाठी जातकाची जन्म तारीख, जन्म वेळ जन्म ठिकाण निश्चित असावे लागते. या माहितीवरुन लग्न कुंडली बनविली जाते. या मध्ये लग्न स्थान सर्व ग्रहांचे स्पष्ट अंश कला काढल्या जातात. त्या नंतर लग्न स्थान ज्या नवमांशात असेल तो नवमांश, नवमांश कुंडलीतील लग्न स्थान होतो. आणि मग इतर राशी मांडल्या जातात. या नंतर जो ग्रह ज्या नवमांशामध्ये असेल त्या स्थानात मांडला जातो. आणि तयार होते नवमांश कुंडली. जो ग्रह लग्न कुंडलीमध्ये नवमांश कुंडलीमध्ये एकाच राशीमध्ये असतो त्याला वर्गोत्तम म्हणले जाते. तर ग्रह उच्च नवमांशी, स्व नवमांशी, अथवा मित्र नवमांशी असता त्याला बल प्राप्त होते.

आता या नवमांशाचे महत्व सांगणारे एक उदाहरण सोबत जोडले आहे. लग्न कुंडलीमध्ये पंचमेश मंगळ चतुर्थामध्ये गेल्याने राजयोगी झाला आहे. मात्र तो शत्रु राशीमध्ये असल्याने वर वर पाहता अशुभ फलदायी अथवा निर्बली वाटतो. मात्र हाच मंगळ कुठल्या नवमांशामध्ये आहे हे तपासले असता तो मकर नवमांशी म्हणजेच उच्च नवमांशी असल्याचे लक्षात येते. एकीकडे लग्न कुंडलीतील स्थानामुळे राजयोगी त्यात उच्च नवमांशी यामुळे ह्याच मंगळाला बल प्राप्त होते.
हाच भाग शनि गुरु विषयी सांगता येईल. सप्तमेश गुरु पंचमात राजयोगी मात्र शत्रु राशीमध्ये तर भाग्येश गुरु सप्तमात राजयोगी मात्र नीच राशीमध्ये. वर करणी पाहता हे ग्रह अशुभ फलदायी अथवा निर्बली वाटतात. पण त्यांच्या नवमांशाचा विचार करता ते आपल्या उच्च नवमांशी असल्याचे लक्षात येते. आणि इथेच त्यांना नवमांशातुन बल प्राप्त होते.

या नवमांश कुंडलीचा अभ्यास करता आणखी एक राजयोग समोर येतो. इथे चंद्र गुरुच्या नवमांशी तर गुरु चंद्राच्या नवमांशी आहे. या दोन ग्रहांमध्ये नवमांशातुन अन्योन्य योग झाला असुन हा राजयोग आहे. या योगानेही या दोन्ही ग्रहांना बल प्राप्त झाले आहे. लग्न कुंडलीमध्ये चंद्र वृषभ राशीमध्ये उच्चीचा दिसत असला तरी तो कृत्तिका या क्रुर नक्षत्री आहे. त्यामुळे त्याचे बल कमी झाले आहे. हे कमी झालेले बल नवमांशातील या राजयोगाने वाढविले आहे.

म्हणुनच एखाद्या ग्रहाचे लग्न कुंडलीतील बलाबल ठरवताना अथवा शुभाशुभत्व ठरवताना त्याच्या नवमांशाचा अभ्यास करणे महत्वाचे ठरते.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र वास्तुशास्त्र रमलशास्त्र होराशास्त्र हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://www.facebook.com/BhagyankJyotishVVastushastraSallaKendra/

Friday, 15 December 2017

बांधकाम व्यवसाय आणि वास्तुशास्त्र



अनेकांचा असा गैरसमज असतो कि वास्तुशास्त्र हे फक्त वास्तुमध्ये राहणाऱ्या लोकांशी निगडित आहे. वास्तु बांधणाऱ्यांचा याच्याशी काही संबंध नाही. पण हे वास्तव नाही. काही बांधकाम व्यावसायिक एखादी जागा विकत घेऊन विकसित करतात. तिथे निवासी इमारती बांधतात. व्यवसायिक संकुले उभी करतात. हे करत असताना जागा खरेदी केल्यापासुन ते जागेत बांधलेल्या वास्तूचे हस्तांतरण करे पर्यंत त्या जागेच्या वास्तुशास्त्राशी बांधकाम व्यावसायिकाचा संबंध असतो.

आपण बघतो कि अनेक प्रोजेक्ट सुरवातीलाच बुक होतात तर काही प्रोजेक्ट बांधुन पूर्ण झाली तरी तिथल्या सदनिका किंवा व्यावसायिक गाळे विकले जात नाहीत. काही प्रोजेक्ट्सचे बांधकाम तर जोमाने सुरु होते पण ते अर्ध्यातच थांबते. त्यात बांधकामाच्या मालकाचे तसेच तिथे आगाऊ बुकिंग केलेल्यांचे पैसे अडकुन पडतात. काही प्रोजेक्टस्मध्ये कायदेशीर अडथळे येतात. तर काही प्रोजेक्टस्मध्ये बांधकाम व्यावसायिकाचे नुकसान होते. काही बांधकाम व्यावसायिक असे आहेत कि ज्यांची प्रोजेक्ट्स सातत्याने यशाची नवनविन शिखरे गाठत आहेत. तर काही बांधकाम व्यावसायिक या क्षेत्रात येतात खरे, पण अपयश आल्याने दुसरीकडे वळतात.

या यशामागे किंवा अपयशामागे जसे त्या त्या व्यावसायिकाची वैयक्तिक जन्म कुंडली कारणीभूत आहे तसेच ज्या जागेत तो बांधकाम करत आहे, त्या जागेचे वास्तुशास्त्रही कारणीभूत आहे. एखाद्या वास्तूच्या बांधकामाचे नियोजन करताना सर्वप्रथम त्या वास्तूच्या बांधकामाच्या आकाराचा विचार करणे गरजेचे आहे. त्यानंतर ये जा करण्यासाठी वापरावयाच्या रस्त्याची निवड करणे गरजेचे आहे. मग त्या जागेचे कुंपण कसे असेल प्रवेशद्वार कुठे असेल याचा विचार करणे गरजेचे आहे. बांधकामाचे साहित्य कुठे असेल, सुरक्षा रक्षक तसेच ऑफिस कुठे असेल, कामगार राहते असल्यास त्यांची घरे कुणीकडे असतील याचे नियोजन महत्वाचे आहे. त्यानंतर बांधकाम कुठून सुरवात होईल कुठे संपेल याचे नियोजन महत्वाचे. जागेवर आपला जाहिरातीचा फलक कुठे असेल इथपासून त्याचा रंग त्यावरील आद्याक्षरे यांचा विचारही महत्वाचा.

बांधकामाच्या आकाराचा विचार करताना जागेचा आकार कसाही असला तरी बांधकाम गोमुखी होईल असे पहावे. नैऋत्य कट टाळावे तर ईशान्य कट ठेवावा. अधिकाधिक बांधकाम नैऋत्य भागात तर ईशान्येकडे मोकळी जागा अथवा साईट ऑफिस सारख्या वास्तू कराव्यात. ब्रह्मस्थान अधिकाधिक मोकळी राहील असे बघावे. वास्तूमध्ये ये जा करण्यासाठी शक्यतो पूर्व अथवा उत्तरेकडील मार्ग निवडावा. प्रवेशद्वार उत्तरेकडेच असेल असे पहावे. दक्षिण अथवा पश्चिम दिशेकडुन प्रवेश टाळावा. जागेला कुंपण करायचे असल्यास पूर्व उत्तरेकडे कमी उंचीचे तसेच तारेचे अथवा जाळीचे कुंपण करावे. तर पश्चिम दक्षिण दिशेला भिंत बांधण्यास हरकत नाही. बांधकामाचे साहित्य सुरवातीला दक्षिण अथवा पश्चिम दिशेला ठेवावे. मग जसे बांधकाम पुढे सरकत जाईल तसे यापैकी एका दिशेला ठेवावे. स्क्रॅप माल, राडारोडा पश्चिम वायव्य दिशेकडे ठेवावा तो जेवढ्या लवकर काढुन टाकता येईल तेवढ्या लवकर काढत जावा.

वरती म्हणल्या प्रमाणे साईट ऑफिस, सेल्स ऑफिस सारख्या वास्तू ईशान्येकडे असाव्यात. सुरक्षा रक्षकांची केबिन तसेच सामानाची ने आण करण्याच्या नोंदी ईशान्येला असाव्यात. कामगार राहते असल्यास त्यांची घरे पूर्व भागात असावीत. बांधकामाच्या जागेत स्वच्छता गृहांचे नियोजन करायचे असल्यास ते वायव्येकडे करावे. बांधकामाची सुरवात नैऋत्येकडुन व्हायला पाहिजे. उत्तर प्रवेशद्वार असल्यास दक्षिणेकडुन उत्तरेकडे पूर्व प्रवेशद्वार असल्यास पश्चिमेकडुन पूर्वेकडे बांधकाम व्हायला  हवे. अनेकदा ग्राहकांना दाखविण्यासाठी एक सदनिका पूर्ण तयार केली जाते. अशी सदनिका नैऋत्य भागात असावी. बांधकामाच्या जागी फलक लावताना उत्तरेकडे लावावा. मात्र हा फलक आपले बांधकाम झाकोळणार नाही याची काळजी घ्यावी. बाहेरील रस्त्यापासुन ते बांधकामा पर्यंत नेणारे दिशादर्शक फलक लावताना त्यावर बाणाचे चिन्ह येणार नाही याची काळजी घ्यावी.

या यासारख्या अनेक बारीक सारीक गोष्टींचा विचार करुन बांधकामाचे नियोजन केल्यास यश निश्चित आहे. यातील सगळ्याच गोष्टी करता येतीलच असे नाही, पण जेवढ्या करता येतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न बांधकाम व्यावसायिकांनी निश्चितच ठेवायला पाहिजे. शेवटचा मुद्दा जो माझ्या वास्तुविषयक अनेक लेखांमधुन येत असतो, तो म्हणजे स्वच्छतेचा. आपल्याकडे लक्ष्मी यावी असे आपणांस वाटत असल्यास तिला यावेसे वाटेल असे प्रसन्न वातावरणही आपण केले पाहिजे. आणि यासाठीच शक्य तितकी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. बांधकामाच्या आजूबाजूला झाडे लावावीत. पाण्याच्या निचरा होण्याचे योग्य नियोजन करावे. बांधकाम साहित्य इतस्ततः पडुन राहणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी. इतकी स्वच्छता आपण ठेवली तर आणि तरच लक्ष्मी देवीला आपल्याकडे यावेसे वाटेल.


- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://www.facebook.com/BhagyankJyotishVVastushastraSallaKendra/