Saturday, 2 February 2019

राशीनिहाय नव्हे तर समस्यानिहाय रत्न विषयक मार्गदर्शन

काल एकाच दिवशी मकर राशीच्या दोन व्यक्तींना रत्नविषयक मार्गदर्शन करण्याचा योग आला. त्या निमित्ताने रत्न चंद्र राशीवर नाही तर आपल्या जन्म कुंडलीमधील ग्रहस्थितींवर ठरते या सिद्धांताचे एक उत्तम उदाहरण मला आपल्या पुढे ठेवता येत आहे. दोन्ही व्यक्तींच्या जन्म कुंडली सोबत जोडल्या आहेत. पहिली व्यक्ती खासगी कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर आहे, तर दुसरी व्यक्ती खासगी कंपनीमध्ये प्लॅन्ट मॅनेजर आहे. मात्र दोघांच्या अडचणी, गरजा विभिन्न आहेत.

आपण पहिली जन्म कुंडली पाहुयात. या व्यक्तीला भरमसाठ असे वैयक्तिक स्वरूपाचे कर्ज झाले आहे व त्याचीच चिंता त्याला सतावत आहे. यातून काही मार्ग निघावा यासाठी या व्यक्तीने आपल्याकडून रत्न विषयक मार्गदर्शन घेतले. या व्यक्तीच्या जन्म कुंडलीमध्ये गुरु ग्रह दशमेश आहे. तो तृतीयामध्ये अग्नी तत्वाच्या राशीमध्ये आपल्या उच्च नवमांशी आहे. गुरुची भाग्य स्थान व लाभ स्थानावर दृष्टी आहे. सध्या जन्म कुंडलीमध्ये गुरु महादशा बुध अंतर्दशा आहे. बुध लग्नेश असला तरी तो षष्ठात शत्रू राशीचा आहे. बुधानंतर केतू व केतू नंतर शुक्र अंतर्दशा आहे. शुक्र हा कर्ज स्थानाचा कारक असून शुभ स्थितीमध्ये आहे. त्यामुळे शुक्र अंतर्दशेमध्ये कर्जांचे योग्य नियोजन होऊन चिंता कमी होतील. मात्र तो पर्यंत काय? वादळात तर पाय रोवून उभे रहावेच लागतेना.

यासाठी जातकाला गुरु ग्रहाचे सिट्रिन हे रत्न सुचविले. हे रत्न कर्ज सोडवू शकत नाही. पण त्यासाठीचे नियोजन करायला जातकाला नक्कीच मदत करेल. ज्यामुळे शुक्र अंतर्दशा येऊन परिस्थिती स्थिर होई पर्यंत जातक टिकाव धरु शकेल.

आता दुसऱ्या जन्म कुंडली विषयी. ह्या जातकाने कंपनीमध्ये अनुकूल वातावरण व्हावे, गुप्त शत्रूंवर मात करता यावी व या सगळ्या पातळ्यांवर लढता लढता आर्थिक प्रगती व्हावी यासाठी आपाल्याकडून रत्न विषयक मार्गदर्शन घेतले. ह्या जातकाच्या भाग्य स्थानामध्ये बुधाची कन्या रास असून बुध लग्न स्थानामध्ये राजयोगी व उच्च नवमांशी आहे. बुध नोकरी स्थानाचा कारक देखील आहे. सध्या जातकाच्या जन्म कुंडलीमध्ये शनि महादशा शनि अंतर्दशा चालु आहे. तर नजीकच्या काळामध्ये बुध अंतर्दशा सुरु होत आहे.

यासाठी जातकाला बुध ग्रहाचे जेड रत्न सुचविले. हे रत्न जातकाला नियोजनातून यश मिळवण्यासाठी मदत करेल. या रत्नाने जातकाची संवाद क्षमता वाढेल. ज्यामुळे सहकाऱ्यांमध्ये संपर्क वाढून कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण निर्माण होईल. ज्याचा उपयोग गुप्त शत्रूंवर मात करण्यासाठी तसेच पुढील आर्थिक प्रगतीसाठी होईल.

या दोन जन्म कुंडल्यांचे उदाहरण आपल्या समोर मांडण्याचे कारण म्हणजे आपण आपल्या समस्यांनुसार गरजांनुसार तसेच ग्रहस्थितीनुसार रत्न धारण केल्यास येणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करायला रत्न आपल्याला निश्चितच मदत करु शकते.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://www.facebook.com/BhagyankJyotishVVastushastraSallaKendra/ | https://www.facebook.com/PerfectlyMatchingGemstone/

Friday, 28 September 2018

सहज सोपे वास्तुशास्त्र


सहज सोपे वास्तुशास्त्र

आजकाल वास्तुशास्त्र म्हणले कि अनेकांच्या मनात धडकी भरते. येणारा वास्तुतज्ञ काय दोष सांगेल, ते दोष निवारणासाठी काय उपाय सांगेल आणि ते उपाय करायला किती खर्च होईल या प्रश्नांची चिंता जातकाला असते. परंतु  रंगीबेरंगी महाखर्चिक उपायांच्या पलीकडेही एक वास्तुशास्त्र आहे, जे तुमच्या वास्तूच्या मूळ रचनेला धक्का लावताही वास्तुदोष दूर करायचा प्रयत्न करते.

काल अश्याच एका वास्तूला भेट देण्याचा योग आला. जातक हॉटेल व्यावसायिक असून त्याने एका प्रसिद्ध मंदिराच्या जवळ एक मोठे हॉटेल पहिले होते. ते हॉटेल त्याने भागीदारीमध्ये भाड्याने चालवण्यास घेण्याचा विचार केला होता.. मात्र त्याचा सर्वस्वी निर्णय माझ्या वास्तुभेटीवर अवलंबून होता. नेहमी प्रमाणे जातक अर्ध्या वाटेमध्ये घ्यायला आला. तिथून पुढचा प्रवास त्यांच्या गाडीनेच करायचा होता. प्रवासामध्ये प्राथमिक चर्चा करत असताना जातकाच्या बोलण्यामध्ये एक तणाव जाणवला. अधिक चर्चे नंतर कळले कि त्यांना काळजी होती कि काय वास्तुदोष असतील त्यासाठी काय उपाय करावे लागतील.

आम्ही प्रत्यक्ष वास्तूमध्ये पोहचलो आणि मी एकदम आनंदाने म्हणले कि गोमुखी वास्तू आहे. जातकाच्या मनावरील तणाव निवळायला याची मदतही झाली. वास्तू पूर्व पश्चिम पसरलेली होती. पश्चिमेकडून प्रवेशद्वार होते. वास्तूचे अधिकतर बांधकाम पूर्व भागात झालेले होते. तरीही काहीप्रमाणात पूर्व भाग मोकळा सोडला होता. पश्चिम भाग मात्र मोठ्या प्रमाणामध्ये मोकळा होता. आम्ही वास्तू भोवती एक फेरफटका मारला. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने कमी अधिक महत्वाच्या मुद्द्यांपैकी जमिनी खालील पाण्याची टाकी सेप्टिक टॅंक या मुद्द्यांवर आधी चर्चा केली. हे दोन्ही योग्य दिशेला आले होते. त्या नंतर आम्ही वास्तूमध्ये प्रवेश केला.

हॉटेलच्या दिशांचा विचार करता नैऋत्य भागामध्ये जिना तर वायव्य भागामध्ये स्वागतकक्ष तसेच रोखपालाची जागा केली होती. त्यानंतर सर्व खोल्यांची रचना होती. जातकाने खोल्या  दाखविण्या आधीच जातकाला सांगितले कि हॉटेल मालकाने खोल्यांच्या अंतर्गत रचनेचा फारसा विचार करायचा नसतो. कारण हॉटेल धार्मिक स्थळी आहे. इथे भक्त लोक एकटे अथवा सहकुटुंबीय येणार. मग ते राहून राहून किती दिवस राहणार. त्यामुळे खोल्यांची अंतर्गत रचना वास्तुशास्त्राप्रमाणे करण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा कमीत कमी जागेत अधिकाधिक खोल्यांचा फॉर्म्युलाच योग्य. इथे फक्त अडचण इतकीच आली होती कि उत्तर भागातील खोल्यांचे शौचालय देखील उत्तर भागात येत होते.

सर्व वास्तूचे सर्वेक्षण झाल्यावर आम्ही काही दोष आहेत का? काही बदलांची गरज आहे का? काही उपाय करावे लागतील का? या विषयीची चर्चा सुरु झाली. वास्तूमध्ये एक दोष थेट दिसत होता तो म्हणजे अधिक तर बांधकाम पूर्व भागामध्ये असणे तर पश्चिम भाग मोकळा असणे. यासाठीचा उपाय खूपच सोपा होता. वास्तू हॉटेलची होती तेव्हा सुशोभीकरण आलेच. हे सुशोभीकरण करताना जातकाला पश्चिम दक्षिण भागामध्ये मोठ्या प्रमाणात नारळाची झाडे लावण्यास सांगितली. यामुळे आपोआपच पश्चिमेकडील वजन वाढले. तीच झाडे पश्चिम वायव्य भागातही लावण्यास सांगितली. वास्तू दोन मजली आहे. तर नारळाची झाडे व्यवस्थित वाढली तर त्यांची उंची तिसऱ्या मजल्या पर्यंत जाते. यामुळे आपोआपच पश्चिमेची उंचीही वाढेल.

उत्तरेकडे येणाऱ्या शौचालयांचा मुद्दा मनात गाठ मारुन होता. त्यासाठी उत्तरेकडून पूर्वे पर्यंत सर्वत्र फूल झाडे लावण्यास सांगितले. यामुळे या दिशेचे दोष कमी व्हायला त्वरित मदत होईल. पश्चिमेकडे झाडे तर लावायला सांगितली, पण तिथेच प्रवेशद्वार येत होते. हे प्रवेश द्वार पश्चिम नैऋत्य भागात होते, जिथे ते शुभ मानले जात नाही. अशावेळी प्रवेशद्वार पश्चिमेकडील तिसऱ्या चौथ्या भागात हलविण्यास सांगितले. यामुळे प्रवेशद्वाराचा दोष तर दूर झालाच पण त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावण्यास मुबलक जागाही झाली. एवढ्या मोठ्या हॉटेलला जनरेटरची गरज तर लागणारच होती. मी जनरेटरला आग्नेय भागात करायला लावलेच पण मेन स्वीचही तिथेच हालवायला लावला

हॉटेलच्या अंतर्गत रचनेमध्ये फारसे बदल करण्याची गरज नसली तरी स्वागत कक्ष व रोखपालाची जागा पश्चिम वायव्य भागात येत होती. इथे खर्चांमध्ये वाढ तर होतेच पण कर्मचारीही टिकत नाहीत. जातक एकाच वेळी अनेक हॉटेल्स चालवत असल्याने त्याची भिस्त अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर असणार होती. त्यामुळे एरवी दुर्लक्षित असणारा हा कक्ष या वास्तूच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा होता. खरे तर हा कक्ष दक्षिण नैऋत्य भागात उत्तरेकडे तोंड करुन असायला हवा होता, अथवा पश्चिम  नैऋत्य भागात पूर्वेकडे तोंड करुन असायला हवा होता. मात्र या भागात जिना आधीच बांधला असल्याने तसे करणे शक्य नव्हते. अशावेळी जातकाला कक्ष आणखी दक्षिणेकडे सरकवत अगदी प्रवेशद्वारापर्यंतची जागा वापरली. यामुळे आपोआप तो किमान पश्चिम भागात येऊन त्याचा दोष निश्चितच दूर झाला.  सोबत दिलेल्या चित्रांचा आकार छोटा असल्याने हा बदल चित्रामध्ये मात्र स्पष्ट कळून येणार नाही.

आपण विचाराल या वास्तूमध्ये खरंच दोष होते का? तर निश्चितच होते. पण त्या दोषांवरच्या उपायांना नियमित सुशोभीकरणाचा भाग बनवून त्या दोषांनाच वास्तूची मुख्य ताकद बनविण्यात यश आले. वास्तुशास्त्र म्हणजे मोठमोठे पिरॅमिड नव्हे, मोठमोठी यंत्रे नव्हे कि मोठमोठ्या पूजा अथवा ग्रहशांती नव्हे. हि वास्तू एक छोटेसे उदाहरण आहे कि सहज सोप्या कळूनही येणाऱ्या उपायांमधून सुद्धा वास्तुदोष दूर करता येतात त्या वास्तूमधून अधिकाधिक लाभ आनंद मिळवता येऊ शकतो


- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र वास्तुशास्त्र रमलशास्त्र होराशास्त्र हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://www.facebook.com/BhagyankJyotishVVastushastraSallaKendra/

Saturday, 26 May 2018

परदेश योग आणि करिअर



ज्या जातकाची लग्न कुंडली सोबत जोडली आहे, त्या जातकाच्या आईने पहिल्यांदा आपल्याशी संपर्क केला होता. हि एका तरुणीची कुंडली असुन ती एका नामांकित बी पी कंपनीमध्ये कामाला आहे. तिच्या लहानपणीच तिच्या वडिलांनी तिला आईला एकटे सोडले. तिच्या आईने मोठ्या कष्टाने तिला वाढविले.  त्या मुलीला तिच्या कंपनीतुन मागच्याच महिन्यात परदेशगमनाची संधी विचारण्यात आली. पण आईला एकटे सोडुन कसे जायचे या चिंतेने ती हो नाही करत होती. त्याच वेळी पहिल्यांदाच घरापासुन दूर जायचे असल्याने हि संधी आपल्यासाठी कशी असेल याची काळजीही मनामध्ये होती.

या जातकाच्या आईने फोनवरुन आपल्याशी संपर्क साधला. मी त्यांना आपल्याकडे उपलब्ध विविध सुविधा त्यांची दक्षिण सांगितली. On Phone Consultation चे महत्व माझ्याकडुन सांगितले त्यांना ते पटलेही. यावेळी मार्गदर्शन दोन टप्प्यात करण्यात आले. आईशी मुलीशी दोन स्वतंत्र चर्चा झाल्या. या चर्चेनंतर आलेला अभिप्राय मी मागे एकदा पोस्टही केला होता. आपल्याशी झालेल्या चर्चेनंतर जातक परदेशी जायला तयार झाली. जाण्यापूर्वी एक आशीर्वाद म्हणुन तिने आपण सुचविलेल्या रत्नाचे पेंडंटही करुन घेतले. सध्या हि जातक परदेशात असुन तिचे उत्तम चालले आहे.
 
तूळ लग्नाची हि कुंडली असुन लग्नेश शुक्र दशमात कर्केचा आहे. तृतीय स्थान म्हणजेच प्रवास स्थानाचा कारक गुरु ग्रह दशमात उच्च राशीमध्ये कर्क राशीमध्ये स्व नवमांशी आहे. दशमेश चंद्र लाभात तर लाभेश रवि भाग्यात आहे. दशमातच मंगळ नीचेचा असला तरी शनिने त्याचा नीच भंग केला असुन हा एक राजयोग आहे. शनिची थेट सप्तम दृष्टी दशमावर आहे. व्यय स्थानाचा कारक बुध भाग्यात स्वस्थानी आहे. त्याचा मंगळाशी नक्षत्रातुन अन्योन्य योग हा राजयोग झालेला आहे. सध्या रविची महादशा चालु असुन रवि भाग्य स्थानामध्ये व्ययेश बुधा बरोबर आहे. रविमध्ये शुक्र अंतर्दशा असुन शुक्र दशमामध्ये आहे. जातक मे महिन्यामध्ये परदेशी गेला असुन या काळात राहुची विदशा चालु होती. राहु तृतीय स्थानामध्ये आहे.

म्हणजेच भाग्यामध्ये लाभेश भाग्येश-व्ययेश एकत्र तर दशमामध्ये लग्नेश, धनेश तृतीयेश एकत्र अशी ग्रहस्थिती आहे. महादशा स्वामी लाभेश असुन भाग्य स्थानामध्ये, अंतर्दशा स्वामी लग्नेश असुन दशमामध्ये विदशा स्वामी राहु तृतीयामध्ये. हि ग्रहस्थिती परदेशगमनासाठी  सर्वोत्तम असल्याने परदेशगमनातुन करिअरला एक चांगले वळण देणारी असल्याने जातकास हि संधी स्वीकारण्यास सांगितले. आधी म्हणल्याप्रमाणे कंपनीमध्ये घेतलेल्या परीक्षेमध्ये प्रशिक्षणामध्ये जातक उत्तीर्ण होऊन परदेशी मार्गस्थही झाला. जाण्यापूर्वी त्याने बुध ग्रहाचा प्रभाव असलेल्या जेड या रत्नाचे पेंडंट आपल्याकडुन बनवून घेतले.

या लेखाचा उहापोह करण्याचा उद्देश इतकाच कि आपणही करिअरमधील महत्वाचे निर्णय घेताना, एखादी संधी स्वीकारताना अथवा नाकारताना एकदा मार्गदर्शन जरुर घ्यावे.




- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र वास्तुशास्त्र रमलशास्त्र होराशास्त्र हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://www.facebook.com/BhagyankJyotishVVastushastraSallaKendra/