Saturday, 2 February 2019

राशीनिहाय नव्हे तर समस्यानिहाय रत्न विषयक मार्गदर्शन

काल एकाच दिवशी मकर राशीच्या दोन व्यक्तींना रत्नविषयक मार्गदर्शन करण्याचा योग आला. त्या निमित्ताने रत्न चंद्र राशीवर नाही तर आपल्या जन्म कुंडलीमधील ग्रहस्थितींवर ठरते या सिद्धांताचे एक उत्तम उदाहरण मला आपल्या पुढे ठेवता येत आहे. दोन्ही व्यक्तींच्या जन्म कुंडली सोबत जोडल्या आहेत. पहिली व्यक्ती खासगी कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर आहे, तर दुसरी व्यक्ती खासगी कंपनीमध्ये प्लॅन्ट मॅनेजर आहे. मात्र दोघांच्या अडचणी, गरजा विभिन्न आहेत.

आपण पहिली जन्म कुंडली पाहुयात. या व्यक्तीला भरमसाठ असे वैयक्तिक स्वरूपाचे कर्ज झाले आहे व त्याचीच चिंता त्याला सतावत आहे. यातून काही मार्ग निघावा यासाठी या व्यक्तीने आपल्याकडून रत्न विषयक मार्गदर्शन घेतले. या व्यक्तीच्या जन्म कुंडलीमध्ये गुरु ग्रह दशमेश आहे. तो तृतीयामध्ये अग्नी तत्वाच्या राशीमध्ये आपल्या उच्च नवमांशी आहे. गुरुची भाग्य स्थान व लाभ स्थानावर दृष्टी आहे. सध्या जन्म कुंडलीमध्ये गुरु महादशा बुध अंतर्दशा आहे. बुध लग्नेश असला तरी तो षष्ठात शत्रू राशीचा आहे. बुधानंतर केतू व केतू नंतर शुक्र अंतर्दशा आहे. शुक्र हा कर्ज स्थानाचा कारक असून शुभ स्थितीमध्ये आहे. त्यामुळे शुक्र अंतर्दशेमध्ये कर्जांचे योग्य नियोजन होऊन चिंता कमी होतील. मात्र तो पर्यंत काय? वादळात तर पाय रोवून उभे रहावेच लागतेना.

यासाठी जातकाला गुरु ग्रहाचे सिट्रिन हे रत्न सुचविले. हे रत्न कर्ज सोडवू शकत नाही. पण त्यासाठीचे नियोजन करायला जातकाला नक्कीच मदत करेल. ज्यामुळे शुक्र अंतर्दशा येऊन परिस्थिती स्थिर होई पर्यंत जातक टिकाव धरु शकेल.

आता दुसऱ्या जन्म कुंडली विषयी. ह्या जातकाने कंपनीमध्ये अनुकूल वातावरण व्हावे, गुप्त शत्रूंवर मात करता यावी व या सगळ्या पातळ्यांवर लढता लढता आर्थिक प्रगती व्हावी यासाठी आपाल्याकडून रत्न विषयक मार्गदर्शन घेतले. ह्या जातकाच्या भाग्य स्थानामध्ये बुधाची कन्या रास असून बुध लग्न स्थानामध्ये राजयोगी व उच्च नवमांशी आहे. बुध नोकरी स्थानाचा कारक देखील आहे. सध्या जातकाच्या जन्म कुंडलीमध्ये शनि महादशा शनि अंतर्दशा चालु आहे. तर नजीकच्या काळामध्ये बुध अंतर्दशा सुरु होत आहे.

यासाठी जातकाला बुध ग्रहाचे जेड रत्न सुचविले. हे रत्न जातकाला नियोजनातून यश मिळवण्यासाठी मदत करेल. या रत्नाने जातकाची संवाद क्षमता वाढेल. ज्यामुळे सहकाऱ्यांमध्ये संपर्क वाढून कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण निर्माण होईल. ज्याचा उपयोग गुप्त शत्रूंवर मात करण्यासाठी तसेच पुढील आर्थिक प्रगतीसाठी होईल.

या दोन जन्म कुंडल्यांचे उदाहरण आपल्या समोर मांडण्याचे कारण म्हणजे आपण आपल्या समस्यांनुसार गरजांनुसार तसेच ग्रहस्थितीनुसार रत्न धारण केल्यास येणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करायला रत्न आपल्याला निश्चितच मदत करु शकते.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७
info.bhagyank@gmail.com | https://www.facebook.com/BhagyankJyotishVVastushastraSallaKendra/ | https://www.facebook.com/PerfectlyMatchingGemstone/